52) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- ज्ञेय ( जाणण्यायोग्य ) काय आहे ?



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

52) ज्ञेय ( जाणण्यायोग्य ) काय आहे ?

ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वामृतमश्नुते ।
अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥ १३-१३ ॥

सर्वतःपाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम् ।
सर्वतःश्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥ १३-१४ ॥

सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् ।
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥ १३-१५ ॥

ज्ञेय ( जाणण्यायोग्य ) काय आहे ?

श्लोक १२ पर्यंत भगवंत शरीराची व्याख्या करतात आणि ज्ञान काय आहे हे स्पष्ट करतात. आणि पुढे ज्ञेय काय आहे याबाबत सांगतांना भगवंत म्हणतात ज्ञेय म्हणजे काय हे मी आता तुला सांगतो हे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो, अनादी परम ब्रह्म सत्‌ आणि असत् या दोहोंच्या रूपातील भौतिक जगताच्या परे आहे. 
ते सर्व बाजूंनी हात-पाय, डोळे, डोकी व तोंडे आणि कान असलेले परमात्मा सर्व जगाला व्यापून आहेत. म्हणजेच भगवंत सर्व रूपात यत्र तत्र सर्वत्र सर्वसाक्षी रूपात आहेत. अश्याप्रकारे परमात्मा सर्व इंद्रियांचे उगमस्थान आहे आणि असे असले तरी परमात्मा स्वतः इंद्रियारहित आहे. परमात्मा सर्व जीवनाचा पालनकर्ता असला तरी माता पित्याच्या विरुद्धभावाचा हा परमात्मा कश्यातच आसक्त नाही. 

परमातमा प्राकृतिक गुणांचा स्वामी असूनही तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे.

बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च ।
 सूक्ष्मात्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ १३-१६ ॥

अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् ।
 भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥ १३-१७ ॥

ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ।
 ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् ॥ १३-१८॥

इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः । 
मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥ १३-१९ ॥

परमसत्य परमात्मा सर्व चराचरांच्या आत आणि बाहेर परिपूर्ण भरले आहे. 

अतिसूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांद्वारे परमात्मा कळण्यास दुर्लभ आहेत. तसेच सर्व भुतांच्या अतिशय दूर आणि जवळही आहेत. परमात्म्याला सर्व जीवांमध्ये विभक्त स्वरूपात पहिले जात असले तरी तो कधीच विभक्त होत नाही. जसे आईचे प्रेम लेकरांवर असतानाही, ते पूर्ण प्रेम सदैव तिच्याठायी सुद्धा असतेच. हे ही इथे लक्षात घेतले पाहिजे कि परमेश्वर सर्व जीवनाचा पालनकर्ता आहेच आणि त्यासोबतच सर्वांच्या प्रलयाचे कारण म्हणजेच, सर्वांचा विनाशकर्ता देखील परमात्माच आहे. सर्व प्रकाशमान वास्तूमधील प्रकाशाचे स्त्रोत स्वतः परमात्माच आहे. मग तो प्रकाश भौतिक असो वा अध्यात्म ज्ञानरूपी असो. असा हा परब्रह्म परमात्मा अंधकार आणि अज्ञानाच्या पलीकडील आहे. तोच ज्ञान आहे आणि ज्ञानस्वरूप परमात्मा  जाणण्यास योग्य आणि तत्त्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे. तसेच सर्वांच्या हृदयात विशेषरूपाने राहिलेला आहे. म्हणजेच इथे भगवंत स्पष्ट करतात कि ते स्वतःच ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञानियांचा परम ध्येय आहेत. 

भगवंत म्हणतात कि या प्रकाराने क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय याचे थोडक्यात वर्णन मी तुला सांगितले आहे आणि केवळ माझा अनन्य भक्त हे सर्व पूर्णपणे जाणून मला प्राप्त होऊ शकतो. 

प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि । 
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान् ॥ १३-२० ॥

कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।
 पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ १३-२१ ॥

पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान्गुणान् । 
कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥ १३-२२ ॥

उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः । 
परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन्पुरुषः परः ॥ १३-२३ ॥

भौतिक प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत, असे तू समज आणि त्यांचे विविध मोह, राग, द्वेष, आळस, प्रमाद, मत्सर आदी विकार आणि रज, तमो, सतो हे त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. 

प्रकृती सर्व कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि जीव आपल्या प्रकृतीनुसार या संसारातील सुख दुःख भोग घेत असतो. प्रकृतीत राहिलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणाचा भोग घेतो आणि या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बऱ्या-वाईट योनींत जन्म मिळण्याला कारण आहे. इथे संसर्ग महत्वाचा ठरतो जसे आपण प्रयोगशाळेत प्रयोग करतांना बघतो कि प्रत्येक पदार्थ हा संसर्गानुसार वेगवेगळी क्रिया करत असतो. तसेच मनुष्याचेही आहे. आणि भगवंत भक्तिसारखा दुसरा उत्तम संग नाही. हे सारे काही घडत असतांना देखील या जीवांमध्ये एक दुसरा परमभोक्ता असतो जो कि महान असा ईश्वर ( महेश्वर ) असून तो सर्व साक्षी, अनादी आणि आणि अनुमती देणारा सुद्धा आहे. तोच शुद्ध सच्चिदानंदघन असल्यामुळे परमात्मा मानला जातो.

य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह । सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥ १३-२४ ॥

अशा रितीने जो भौतिक प्रकृती, जीवात्मा आणि प्रकृतीच्या गुणांना जाणतो   त्यालाच तत्वतः सर्व ज्ञान आहे आणि असा ज्ञानी मनुष्य त्याची सद्यस्तिथी काहीही  असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 51)- अध्याय १३ क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग प्रारंभ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ