13) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- कर्मयोग प्रारंभ
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेेेश्वरी 13) कर्मयोग प्रारंभ तृतीयोऽध्यायः- कर्मयोग या अध्यायात आपण समजून घेणार आहोत:- ज्ञानयोग आणि कर्मयोग करून अनासक्त भाव ठेवून नियत कर्म करण्याची आवश्यकता, यज्ञ कर्म का आवश्यक आहे आणि यज्ञाची महिमा, ज्ञानी, जेष्ठ आणि भगवंत यांनी सुद्धा नियत कर्म का करावीत याविषयी मार्गदर्शन, अज्ञानी आणि ज्ञानी यातील फरक आणि राग द्वेष विरहित कर्म करण्यासाठी प्रेरणा, सर्व अनिष्टांचे कारण असलेल्या काम रुपी शत्रू ला नष्ट करण्यासाठी उपदेश. भूमिका अध्याय दोन मधील भगवंताचा संदेश ऐकून अनेक जण भ्रमित होतांना दिसतात आणि अशीच अवस्था अर्जुनाची सुद्धा झाली आहे कारण भगवंतांनी प्रथम स्वधर्मानुसार कर्म करण्याचा मार्ग दाखवला आणि नंतर स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे सांगून स्थितप्रज्ञ म्हणजेच स्थिरबुद्धी होण्याचं सल्ला दिला. त्यामुळे भ्रमित झालेला अर्जुन तुमच्या माझ्या मनातील शंका प्रश्न रूपात भगवंतासमोर मांडतो भाग १ ज्ञानयोग आणि कर्मयोग करून अनासक्त भाव ठेवून नियत कर्म करण्याची आवश्यकता अर्जुन उवाच : ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव...