37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
37) या भागात भगवंत सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ या विषयी मार्गदर्शन करतात.
त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥ ९-२० ॥
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ ९-२१ ॥
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ ९-२२ ॥
येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः । तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥ ९-२३ ॥
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।
न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥ ९-२४ ॥
यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रताः ।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥ ९-२५ ॥
तिन्ही वेदात सांगितलेली कर्मे करणारे, सोमरस पिणारे,पापमुक्त लोक यज्ञांनी माझी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात; ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या इंद्रलोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात. ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेतात आणि कालांतराने पुण्याई संपल्यावर पुन्हा मृत्युलोकात परत येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या, तिन्ही वेदात सांगितलेल्या, सकाम कर्मांचे अनुष्ठान करून स्वर्ग सुख भोगणारे पुरुष वारंवार ये-जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात.
म्हणजेच स्वर्ग हे मुक्तीचे नाही तर तात्पुरत्या विश्रामाचे स्थळ आहे. मानवी जिंवनात मनुष्य खूप मेहनत घेऊन विविध सुखे विकत घेतो आणि नंतर ती सुखे कालबाह्य होतात. आणि मनुष्य पुन्हा नव्या सुखाच्या प्राप्तीसाठी कर्म करायला लागतो. म्हणजेच अंतहीन अशा सुखप्राप्तीच्या चक्रव्ह्यूहात अडकतो. असे असले तरी एक उपाय आहे आणि तो म्हणजे जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांच्या सर्व गरज मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो.
आता आपण बहुतांश मनुष्यांना माहित नसलेले सत्य जाणून घेऊया. भगवंत म्हणतात, हे कौन्तेया जे भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवांची पूजा करतात, तेही माझीच पूजा करतात. परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक ( सकाम ) असते. कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे. पण ते मला परमेश्वराला तत्त्वतः जाणत नसल्याने हि त्रुटीपूर्ण भक्ती करत असतात आणि त्यामुळेच वारंवार पुनर्जन्म घेतात. (पुनर्जन्म घेणे म्हणजेच सुखदुःख्खाच्या फेऱ्यात अडकणे.)
देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही. त्यामुळेच माझी अनन्य भक्ती हाच मुक्तीचा एकमेव महामार्ग आहे.
पत्रं पुष्पं फलं तोयं ये मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ ९-२६ ॥
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् । यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ ९-२७ ॥
शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ ९-२८ ॥
समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ ९-२९ ॥
या भागात भगवंत निष्काम भगवद् भक्तीचा महिमा सांगतात.
भगवंत म्हणाले, जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध भक्ताने प्रेमाने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी स्वीकार करतो. हे कौन्तेया, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. हेच तुझ्यासाठी श्रेयस्कर आहे. अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला अर्पण केल्याने, तू या शुभाशुभफळरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील.
मी सर्व भूतमात्रात समभावाने व्यापून आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय. परंतु जो भक्त मला प्रेमाने भजतो तो माझा मित्र आहे, ते माझ्या ठायी वास करतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 36) नास्तिक व्यक्ती, त्यांची विचारधारा व फळ आणि आस्तिक व्यक्ती, त्यांची विविध श्रद्धा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा