35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९ च्या सुरुवातीला भगवंत अर्जुनाला सांगतात कि मी आता तुला परम गोपनीय ज्ञान उपदेश करणार आहे.

श्रीभगवानुवाच;

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्॥9.1॥

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥9.2॥

अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥9.3॥

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेषवस्थितः ॥9.4॥

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥9.5॥

यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् । 
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥9.6॥

श्रीभगवान म्हणाले, तू माझा कधीच द्वेष करत नाहीस आणि तू माझा समर्पित भक्त असल्याने हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासून मुक्त होशील. इथे हे ज्ञान समजण्यासाठीची पात्रता आपल्याला कळते. केवळ समर्पित भक्तच हे ज्ञान समजू शकतो. हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिपवित्र, अतिउत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त, आणि प्राप्त करण्यास फार सोपे आहे. हे अविनाशी ज्ञान आहे आणि कालातीत आहे.

भगवंत पुढे सांगतात हे परंतप अर्जुना, श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्युरूपी संसारचक्रात फिरत राहतात. जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते, तसेच मी निराकार परमात्मा हे सर्व जग पूर्ण व्यापून आहे. सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत. पण मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही. सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत. 

हे अर्जुना माझी ईश्वरी योगशक्ती पाहा की, जीवभूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे भरण पोषण करणारा असूनही मी वास्तविकपणे त्यांच्या ठिकाणी नाही. जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र वावरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहातो, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते माझ्यात राहातात. म्हणजेच मी सर्व व्यापी असून सर्व जीव माझ्या मध्ये आहेत पण मी त्यांच्यामध्ये नाही.

जगाच्या उत्पत्ती आणि प्रलयाची माहिती

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् । 
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ९.७ ॥

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः । 
 भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् ॥ ९.८ ॥

न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय । 
 उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९.९ ॥

मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् । 
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ ९.१० ॥

या भागात भगवंत सांगतात कि हि प्रकृती माझ्या अनेकानेक प्रकृती पैकी एक आहे आणि माझ्या अध्यक्षतेत कार्यरत असते. 
हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), या प्रकृतीमध्ये कल्पाच्या शेवटी ( प्रलय काली ) सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मीच पुन्हा उत्पन्न करतो. माझ्या मायारुपी प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे सर्व भूत माझ्यावर आधीन आहेत आणि ह्या भूतसमुदायाला मी वारंवार त्यांच्या कर्मांनुसार उत्पन्न करतो. इथे त्यांच्या कर्मानुसार हि संकल्पना फार महत्वाची आहे.  हे धनंजया (अर्थात अर्जुना), त्या कर्मांत आसक्ती नसलेल्या व उदासीनाप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधानकारक होत नाहीत. हे कौन्तेया, माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते. याच कारणाने हे संसारचक्र फिरत आहे.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇

निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 34) प्रगतीच्या शुक्ल आणि कृष्ण मार्गांचे वर्णन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ