16)- माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सर्व पापांचे मूळ असलेल्या इच्छा (काम) शत्रूला नष्ट करण्यासाठी मार्गदर्शन.
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
16)- सर्व पापांचे मूळ असलेल्या इच्छा (काम)
शत्रूला नष्ट करण्यासाठी मार्गदर्शन.
प्रकृतेर्गुणसम्मूढ़ाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत् ॥3:29॥
मयि सर्वाणि कर्माणि सन्नयस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥3:30॥
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽति कर्मभिः ॥3:31॥
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥3:32॥
मागील भागात आपण शिकलो कि
थोडक्यात सगळा खेळ परिस्थिती आणि मनस्थिती व त्याच्या मेलचा आहे आणि यातील एक किंवा दोन्हीही बदलले कि माणूस बदलला हे वेगळे सांगावे लागू नये. आणि म्हणूनच आपण आसक्त न होता केवळ नियत नित्य कर्म केले पाहिजे. परंतु अज्ञानी लोक हे या प्रकृतीच्या गुणांनाच "मी" समजून कार्य करतात आणि बरेचदा त्यांना आपण 'मी असाच आहे' , 'मी अशीच आहे' असे बोलतांना बघतो. मुळात म्हणजे मी कोण तर गुण आणि कर्म याच्या संयोगातून उत्पन्न झालेली व्यक्तिरेखा आहे पण अज्ञानी लोक याबाबत अनभिज्ञ असतात आणि ज्ञानी लोकांनी अश्या अज्ञानी लोकांना विचलित करवून ज्ञान बोध देण्याचा प्रयास करू नये. ज्ञानी लोकांनी केवळ परमात्मा परमेश्वर भगवान श्रीकृष्णांला आपले सगळे कर्म व कर्म फळ अर्पण करून केवळ आपल्या क्षमतांच्या आधारे लोककल्याणार्थ कार्य करत राहावे. इथे न तर आशा, न तर ममता किंवा नको संताप. कोणतीही भावना मध्ये न आणता केवळ प्रभू सेवेसाठी ( लोककल्याणार्थ ) युद्ध ( नियत नित्य कर्म) केले पाहिजे. आणि जो व्यक्ती कुठलेली चांगले किंवा वाईट भाव मनामध्ये न आणता केवळ धर्मासाठी ( धर्म = प्रभू सेवा = लोककल्याणार्थ क्षमतेनुरूप कार्य करणे ) करतात ते संपूर्ण क्रमातून व त्यातून उत्पन्न कर्मफळापासून मुक्त होतात. आणि जे असे करत नाहीत ते त्यांना मूर्ख मानून त्यांचा प्रवास नष्ट होण्याच्या दिशेने चालत आहे असे समजावे.
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥3:33॥
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥3:34॥
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥35॥
ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या प्रकृतीनुसार कार्य करत असतो, कारण प्रत्येकजण प्रकृतीनुसार, प्राप्त गुणांनुसार कार्य करत असतो आणि बळेच निग्रह केल्याने काही कसे साध्य होईल? इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय याबाबत मनुष्य आसक्ती आणि विरक्ती या चक्रात अडकलेला असतो आणि प्रत्येक इंद्रियांच्या नियमनाची पद्धती आहे पण इंद्रियांना वश करणे हे अशक्यप्राय आहे. तरी ज्ञानी व्यक्तीने आसक्ती आणि विरक्ती या चक्रात अडकू नये त्यामुळे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात अडथळे निर्माण होतात.
इथे महत्वाचे हे कि मनुष्याने स्वताला इंद्रिय आणि इंद्रियविषयापासून तटस्थ केले पाहिजे व आपले नियत नित्य कर्म करत राहिले पाहिजे. नियत नित्य कर्म म्हणजेच स्वधर्म, होय. उदा. धर्मासाठी युद्ध करणे हे अर्जुनाचे एक क्षत्रिय म्हणून नियत नित्य कर्म होतं. इथे भगवंत स्पष्ट करतात कि व्यक्तीने स्वधर्माचे पालन केले पाहिजे आणि त्यानुसार नियत नित्य कर्म केले पाहिजे. तसेच स्वतःचे नियत नित्य कर्म त्रुटीपूर्ण पद्धतीने केलेले सुद्धा इतर कुणाचे कार्य चांगल्या पद्धतीने करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण हे भयावह आहे म्हणजेच पुढे चालून आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो किंवा क्षती पोहचू शकते.
अर्जुन उवाच:
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥3:36॥
श्रीभगवानुवाच:
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्धयेनमिह वैरिणम् ॥3:37॥
धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च।
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥3:38॥
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥3:39॥
सर्व पापांचे मूळ असलेल्या इच्छा (काम)
शत्रूला नष्ट करण्यासाठी मार्गदर्शन.
अर्जुनाने आता तुमच्या माझ्या मनातील महत्वाचा प्रश्न विचारला , अर्जुन म्हणाला का इच्छा नसतानांही मनुष्य पाप कर्म करायला प्रेरित होतो?
यावर भगवंत अतिशय सुंदर मार्गदर्शन करत सांगतात...
इच्छा ( काम ) हा रजोगुणातून उत्पन्न होतो आणि नंतर त्याचे रूपांतर हे क्रोधात होते. आणि हा काम आणि क्रोधच व्यक्ती, तसेच जगताचा महान शत्रू आहेत असे भगवंत सांगतात. काम क्रोध हि जशी मागील भागातील आसक्ती आणि विरक्ती या भावनांना पूरक आहेत. ज्याप्रमाणे धुळीने आरसा, वारेने गर्भ वेष्टीला जातो त्याप्रमाणेच जीव ‘कामा’ द्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. आणि यामुळेच मनुष्य आपली चेतना विसरून नियत नित्य कर्म बाजूला सारतो व कधीही पूर्ण न होणाऱ्या काम अग्नी मध्ये कायम जळत राहतो. कधी शांत न होणारा काम हाच खरा शत्रू आहे हे जो जाणतो तोच मनस्वास्थ, मनशांती आणि प्रगतीच्या मार्गावर चालायला लागतो
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥40॥
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥3:41॥
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥3:42॥
एवं बुद्धेः परं बुद्धवा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥3:43॥
आता वाचकांच्या प्रगतीसाठी महत्वाचे. इंद्रिये, मन आणि बुद्धी हि ‘कामा’ची निवासस्थाने आहेत आणि त्याद्वारे उत्पन्न इच्छा ( काम ) आत्म्याच्या शुद्ध चेतनेला आच्छादित करून भ्रमित करत असतो. आणि त्यामुळेच इंद्रियांचे नियमन करून म्हणजेच वेगवेगळया इच्छा आणि त्याविषयीचे कर्म यांना तटस्थेने पाहून त्यात गुंतून न जाता त्यांना सुरुवातीलाच थांबवले पाहिजे आणि याद्वारे मनुष्याच्या प्रगतीला हानिकारक असलेल्या विविध इच्छांचा समूळ नाश केला पाहिजे. इंद्रिय हे प्रकृती पेक्षा श्रेष्ठ आहेत, मन इंद्रियांपेक्षा पेक्षा श्रेष्ठ आहे, बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आत्मा (परम चेतना) हि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजेच आपण स्वतः भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी पेक्षा श्रेष्ठ आहोत हे जाणून मनुष्याने अध्यात्मिक शक्तीद्वारे कामरुपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे.
।। जय श्रीकृष्णा ।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योग शास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥3॥
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 15)-ज्येष्ठांने नियत नित्य कर्म करने का गरजेचे आहे
भाग 17)-अध्याय ४-ज्ञानकर्मसंन्यासयोग: दिव्य ज्ञान

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा