18) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भगवंत अवतार का घेतात, कधी घेतात व त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते?




माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी


18) भगवंत अवतार का घेतात, कधी घेतात व त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते?


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥४:७॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥४:८॥

जेव्हा जेव्हा धर्मा पेक्षा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी स्वतः अवतरित होतो. साधू संतांचा उद्धार करायला, विनाशासाठी दुष्कर्म करणाऱ्या दुष्टांचा नाश करायला आणि धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी मी प्रतयेक युगा युगा मध्ये येतो. म्हणजेच भगवंताने इथे त्यांचा परम उद्देश सांगितला आहे आणि तो म्हणजे जगाचे सूसंचलन. इथे काही महत्वाचे शब्द आपण लक्षात घेऊया. धर्म म्हणजे मानवांचे वसुंधरेला जपून मनःस्वाथ, मनशांतीसह प्रगती करण्यासाठी उपयुक्त मार्ग किंवा आचरण. याविपरीत आचरण म्हणजेच अधर्म. साधू संत म्हणजेच सतोगुणी, सत आचरण करणे होय.

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः ।
त्यक्तवा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥४:९॥

भगवंत सर्वोच्य शक्ती असूनही त्यांनी अनेकदा जन्म घेऊन व त्या जन्मामध्ये विविध कर्म करून मानवाला उत्तम पद्धतीने जगण्यासाठी नीतिमूल्ये निर्धारित करून दिली आहेत आणि जो या नीतिमूल्याना जाणतो तो व्यक्ती नक्कीच परमेश्वराला प्राप्त करतो. त्याला चिरंतन मनस्वास्थ मनःशांती आणि प्रगती लाभते. इथे उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण भगवंताच्या अवतारांचा विचार करूया. भगवान राम चक्रवर्ती राज्याच्या घरी जन्माला आले आणि दुष्टांचा नाश करून विश्वात शांती प्रस्थापित करण्यासाठी त्यानी वनवासात १४ वर्षे व्यतीत केली, परशुराम रूपात ब्राम्हण घरी जन्म घेऊन भगवंतांनी मुजोर क्षत्रियांचा नाश केला तर कृष्ण जन्मात भगवंतानी पार्थ अर्जुन याचे सारथ्य करून दुष्टांचा नाश केला. या तिन्ही जन्मात भगवंत त्यांच्या कर्माचे स्वरूप .बदलतांना दिसतात. राम जन्मात राजपुत्र ते साधी राहणी असणारा वनवासी. परशुराम अवतारात ब्राम्हण ते रक्ताचा तलाव भरणारा क्षत्रिय आणि कृष्णा जन्मात, कारागृहात जन्मलेला, जन्माचा क्षत्रिय, बालपणीचा आर्यवैश्य, मोठेपणीच द्वारकाधीश आणि नंतरच्या टप्प्यात गीता सांगून मार्गदर्शन करणारा गुरु-ब्राम्हण. मी पण बाजूला ठेवून अर्जुनाचे सारथ्य करणारा सेवक. आणि एवढी रूपे कशासाठी तर जगाला जीवनाचा खरा मार्ग दाखवण्यासाठी.
जन्माने परिस्थिती कशीही असो मनुष्य विविध कर्मनुसार आपले नियत कर्म करत जगाचा उद्धार करू शकतो. तुमच्या माझ्यासाठी आणखी महत्वाचे हेहि कि या जन्मात भगवंतानी त्यांच्या जीवन कर्माने व श्रीमद् भगवद्गीता द्वारे तुम्हा आम्हा सारख्यावर आता जगाच्या संचलनासाठी कार्य करण्याची जबाबदारी टाकलेली आहे, म्हणजेच प्रत्येक गीता अभ्यासक हा पार्थ आहे आणि त्यावर जबादारी आहे भगवद्गीतेतील मार्गदर्शक तत्वे समजून घेऊन त्या तत्वानुसार स्वतः आचरण करण्याची व जगालाही दिशा देण्याची. आणि जी व्यक्ती असे करण्यात यशस्वी होते ती व्यक्ती भगवंताला प्राप्त होते . म्हणजेच मनस्वास्थ, मनशांती आणि प्रगती साधते.

वीतरागभय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥४:१०॥

ये यथा माँ प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥४:११॥

काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥४:१२॥

भगवंत पुढे मार्गदर्शन करत सांगतात कि ज्या मनुष्यांनी आसक्ती, भय आणि क्रोध याचा त्याग करून मी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्य केले असे अनेक लोक याधीच माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. आणि जो परमेश्वराला ज्या प्रमाणे भजतो परमेश्वरही त्याला त्याच प्रमाणे भजतो. म्हणजेच जैसी करणी वैसी... उदाहरणार्थ. शाळेतील वर्गामध्ये अनेक विद्यार्थी असतात आणि ते गुरुजींना वेगवेगळा प्रतिसाद देत असतात आणि त्यांच्या प्रतिसादावर त्या प्रत्येकाला गुरुजी वेगवेगळ्या रूपात आणि प्रतिसादाच्या समप्रमाणात लाभतात. आणि अश्या प्रकारे प्रतिसाद आणि परिणाम वेगळा असला तरी प्रत्यक्ष विद्यार्थी हा गुरुजींकडून शिकतच असतो. आणि जो ज्या विषयात किंवा कार्यात रस घेतो त्याला त्या विषयात प्रगती साधते.
त्याचप्रमाणे मनुष्यलोकात देखील लोक इष्ट फळ प्राप्तीसाठी त्या फळाच्या अनुरूप इष्ट देवतांची पूजा करतात आणि त्यांना त्या कार्यात फळाची लवकर प्राप्ती होते. उदाहरणार्थ: कुणी शक्ती साठी हनुमान भगवंताची पूजा करतात, ज्ञान मिळविण्यासाठी कुणी सरस्वती देवीची पूजा करतात व त्यांची पूजा ( मन एकाग्र करून केलेलं कर्म ) त्यांना इष्ट फळ लवकरच प्राप्त करून देते.

यावर पुढे भगवंतांनी मार्गदर्शन केले आहे.

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विद्धयकर्तारमव्ययम् ॥४:१३॥
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥४:१४॥
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मैव तस्मात्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥४:१५॥
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विद्धयकर्तारमव्ययम् ॥४:१३॥

हा भग्वदगीतेतील एक अतिशय महत्वाचा श्लोक आहे. इथे भगवंत स्पष्ट सांगतात कि चातुर्वर्ण्यं त्यांनीच निर्माण केला आहे आणि त्याची विभागणी हि गुणकर्मविभागशः गुण आणि कर्मानुसार केलेली आहे. म्हणजेच प्रकृतीचे तीन गुण रज-सत-तम आणि कर्म यानुसार मनुष्याचे वर्ण केलेले आहेत आणि याच जन्मानुसार असलेल्या वर्णाशी संबंध नाही.
मागील श्लोकांमध्ये विवेचनात आपण पहिले सुद्धा कि कश्या प्रकारे स्वयं भगवंत देखील एकाच मनुष्य जन्मात विविध वर्ण कर्म करत होते. आता याबाबत अतिशय सहज सोपे ज्ञान जे कि ज्ञानी लोक सहज स्वीकारतात आणि स्वार्थी लोक याचा सतत विरोध करतात. भगवंतानी स्वतः सांगितले आहे कि चारही वर्ण मी निर्माण केले आहेत आणि त्यांची विभागणी सुद्धा गुण आणि कर्मानुसार केली आहे. ती कशी ते आता समजावून घेऊ.
सुरुवात ब्राम्हण वर्णापासून करूया, ब्राम्हण वर्ण श्रेष्ठ वर्ण मानला जातो. मनुष्याच्या बुद्धीचा विकास इतर सर्व प्राणिमात्रांपासून वेगळा आहे आणि त्याचे वेगळे पण बुद्धीचा विकास आणि त्याद्वारे ज्ञान घेऊन केलेली प्रगती आहे. जी व्यक्ती बुद्धीचा वापर करते व सतत सातोगुणांमध्ये स्थिर असते तिला ब्राम्हण म्हणतात. आणि या विरुद्ध जी व्यक्ती बुद्धीचा वापर न करता जड शरीराचा वापर करून अंग मेहनत करतो तो शूद्र आहे असे जाणावे. जसे कि प्राणीमात्र करतात. या प्रकाराच्या व्यक्तीमध्ये तमोगुणांचा प्रभाव ज्यास्त असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये रजोगुण आणि तमोगुण दोन्हीही दिसून येतात आणि ती व्यक्ती शारीरिक मेहनत घेऊन आणि थोडीशी बुद्धीवापरून व्यापार करते त्या व्यक्तीला वैश्य असे म्हणावे. आणि जिथे राजेगुणाचा प्रभाव अधिक असल्यामुळे महत्वाकांशा आणि सत्ता, संपत्ती सामर्थ्य वापरून राज्य करण्याची किंवा नेतृत्व करणयाची वृत्ती दिसून येते अशी व्यक्ती क्षत्रिय समाजावी. गुणकर्म आणि त्यानुसार आचरण हेच वर्ण आहेत आणि भगवंत स्पष्ट करतात कि प्रत्येक व्यक्ती हि प्रगती करून माझ्या स्वरूपाला प्राप्त होते.
गुणकर्म यानुसार मनुष्याचे चार विभाग जरी परमेश्वराने निर्माण केले असले आणि सर्व मनुष्य याद्वारे आचरण करत असले तरी याचा रचियेता भगवंत मात्र या सगळ्याचा कर्ता असूनही ‘अ’कर्ताच आहे त्याचे कारण भगवंत श्लोक १४ मध्ये स्पष्ट करतात कि कर्माच्या फळामध्ये मला कोणतीही आसक्ती नसल्यामुळे, मी कोणत्याही कर्मबंधनात बांधला जात नाही आणि जो व्यक्ती हे सत्य जाणतो तो व्यक्ती सुद्धा कर्मबंधनातून मुक्त होतो. इथे श्लोक १५ मध्ये परमेश्वर अश्या प्रकारे मुमुक्षुनी ( मोक्ष प्राप्तीची इच्छा असलेले ) कर्म करून मोक्ष प्राप्ती केली आहे ( मोक्ष - मनस्वास्थ, मनशांती आणि प्रगती ) आणि आपणही त्यांचेच आचरण करून कर्म केले पाहिजे.
इथे आजच्या समाजाला एक अत्यंत महत्वाचा बोध घेण्याची आवश्यकता दिसून येते कि आपल्या प्राचीन संस्कृतीतील अनेक उत्तमोत्तम परंपरा आहेत त्यांचे पालन आपल्यासाठी हितकर आहे. आजकाल नवी पिढी आपल्या परंपरा सोडून आचरणाचे विविध नवीन मार्ग धरतांना दिसून येते. इथे समाज भौतिक प्रगती करतांना दिसत आहे. बहुतांश लोकांकडे घर गाडी मोबाईल टीव्ही इ. साधने आली आहेत पण त्यासोबहत समाजात, वाढलेला रक्तदाब, मधुमेह, नैराश्य, ताणतणाव, हृदयरोग, स्त्रियांचे विविध रोग आणि शारीरिक व्याधी याचा वाढलेला आकडा सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. ज्या वेगाने आपण आपल्या चांगल्या परंपरा पासून दूर जात आहोत त्याच वेगाने आपण व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर देखील वाढलेल्या विविध समस्यांना सामोरे जात आहोत.

।।जय श्री कृष्णा।।

धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 17)-अध्याय ४-ज्ञानकर्मसंन्यासयोग: दिव्य ज्ञान


भाग 19) कर्म विकर्म अकर्म

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ