26) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- ध्यान साधकासाठी आवश्यक माहिती आणि समाधी ची व्याख्या




माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-

राजेश्वरी

26) ध्यान साधकासाठी आवश्यक माहिती आणि समाधी
ची व्याख्या


शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥११॥

तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।
उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥१२॥

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।
सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ॥१३॥

प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥१४॥

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।
शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥१५॥

मागील भागात आपण पहिले कि योगी व्यक्तीने एकांत स्थानी राहून काळजीपूर्वक मनाला संयमित करावे. आणि असे करताना त्याने कोणतीही आशा किंवा स्वामित्व भाव ठेऊ नये. याबाबतच आणखी विधी भगवंत इथे स्पष्ट करतात. यात प्रथम कुठे बसावे मार्गदर्शन करतांना भगवंत सांगतात कि व्यक्तीने जमिनीवर कुशासन अंथरावे व त्यावर मृगचर्म, किंवा मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन अधिक उंच किंवा खालीही असू नये. आसन हे पवित्र स्थळी असावे. आसन तयार झाल्यावर योगीने त्यावर दृढनिश्चिय पूर्वक बसावे. हा टप्पा खूप महत्वाचा आहे. कोणतेही कार्य सुरु करण्याआधी मनाचा संकल्प खूप महत्वाचा असतो. आणि अश्या स्थितीत योगी व्यक्तीने मन आणि इंद्रिय संयमित करून आत्मसक्षात्कारासाठी योग करावा. बसण्याची विधी अशी कि मनुष्याने शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याचप्रमाणे स्थिर आणि संयमित मनाने भयरहित होऊन सर्व इच्छा व आसक्तीपासून मुक्त होऊन केवळ परमेश्वराचे ध्यान करावे आणि परमेश्वरालाच जीवनाचे लक्ष मानावे. आणि या पद्धतीने शरीर मन आणि क्रिया यांच्या संयमाचा सर्व करून मन संयमित झालेला योगी मनःस्वाथ मनशांती आणि प्राप्त करतो. वाचक शालेय विद्यार्थी असो का जीवन विद्यर्थी असो. ध्यान किंवा एकाग्रचित्त हि यशासाठी अत्याआवश्यक बाबा आहे आणि इथेच जीवनात मनःस्वाथ मनशांती राखून प्रगती करता येते.

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥१६॥

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥१७॥

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।
निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥१८॥

यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता ।
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥१९॥

याव्यतिरिक ध्यान साधकासाठी काही आवश्यक बाबींची भगवान कृष्ण माहिती देतात. भगवंत म्हणाले कि योगी पुरुष काकृतिशीलता व निद्रा दोन्हीही योग्य प्रमाणात घेतो. न ज्यास्त आहार न कमी. न ज्यास्त झोप न कमी. जो मनुष्य एक प्रकाचे नियमित आयुष्य जगतो, आपल्या सगळ्या कामात (आहार, विहार, निद्रा आणि नियत कर्म) नियमित असतो तो व्यक्ती योग अभ्यासाद्वारे दुःखांवर मात करू शकतो. याचा फायदा जीवनातील सर्वच कर्मात होतो. लक्षात घेण्यासारखे हे कि निसर्ग अतिशय नियमित आहे. सूर्य, चंद्र, पृथ्वी, ऋतू ई. नियमितपणा हाच खरा सुखाचा मूलमंत्र आहे. अश्या प्रकारे योग्य अभ्यास करतांना जेव्हा मनुष्य आपल्या मनाला (विचारांना) नियमित करू शकतो व भौतिक इच्छा व आकांक्षा पासून मुक्त होऊन आत्म्यामध्ये चित्त स्थिर करतो तोच व्यक्ती योगी झाला आहे असे म्हंटले जाते. योगी व्यक्तीचे मन वारा नसल्यावर स्थिर होणाऱ्या दीपासारखे असते. योगी मनुष्य मनातील विकार व विचार शांत झाल्यामुळे सदैव अत्यंत स्थिर राहतो.

यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥२०॥

सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥२१॥

यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥२२॥

तं विद्याद् दुःखसंयोगवियोगं योगसञ्ज्ञितम्।
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥२३॥

जेव्हा मनुष्य सर्व सांसारिक आणि मानसिक क्रियापासून पूर्णपणे संयमित होतो तेव्हा त्या अवस्थेला समाधी असे म्हणतात. समाधीस्थ मनुष्य शुद्ध मनाद्वारे केवळ आत्म्याचे ( सत चेतनेचे ) अवलोकन करत आत्म्यामध्येच स्थिर होऊन आनंद घेण्यात समर्थ होतो. या अवस्थेत दिव्य इंद्रियांद्वारे आत्मसाक्षात्कार झाल्याने अमर्याद अश्या दिव्य सुखांमध्ये मनुष्य स्थित होतो. येथे लक्षात घेणे आवश्यक आहे कि भौतिक क्रियाकालापातून उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक सुखाची दुसरी बाजू दुःख आहे आणि हा सुख दुःखाचा कधीही न संपणारा पसारा भौतिक सुख शोधताना व्यक्ती सांभाळत असतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर मनुष्य सत्यापासून कधीही ढळत नाही आणि सत्य प्राप्त करून याहून काहीही श्रेष्ठ नाही, हे तो जाणतो. (येथे सत काय आणि असत काय हे समजणे आवश्यक आहे.) अश्या अवस्थेस पोहचलेला योगी मनुष्य मोठमोठया दुख्खाने विचलित होत नाही किंवा भौतिक क्रियाकलापाच्या संगतीमुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून कायम मुक्त राहतो.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇

निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 25) अध्याय ६- आत्मसंयमयोग प्रारंभ

भाग 27) योगी कोण आहे ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ