48) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय १२ भक्तियोग प्रारंभ




माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी


अध्याय १२ भक्तियोग
48) प्रारंभ

या अध्यायाच्या सुरुवातीलाच वाचक रूपी पार्थचे मनपूर्वक अभिनंदन. मागील ३ अध्यायात आपण भगवंताची अगाध महिमा पहिली.
● अध्याय ९ मध्ये उत्पत्ती आणि प्रलय जाणून घेतला.
● अध्याय १० मध्ये भगवंताचे ऐश्वर्य जाणून घेतले आणि
● अध्याय ११ मध्ये सर्वव्यापी भगवंताचे विराट विश्वरूप दर्शन, चतुर्भुज दर्शन घेतले.

हा प्रवास एवढा अदभूत आहे कि इथपर्यत आलेला भक्त हा भगवंताला शरण जाणून भगवंताची अनन्य भक्ती करायला लागतो. आणि या भक्तिरंगावर पुढे जाण्यासाठीचे मार्गदर्शन आपल्याला भक्तियोग या अध्याय १२ मध्ये मिळते.

तर मग सुरुवात करूया या भक्तिमार्गाला समजून घेण्याची.

अर्जुनाने या अध्यायाच्या सुरुवातीलाच प्रश्न केला कि भगवंताचे साकार आणि निराकार उपासना करणारे भक्त आहेत आणि त्यांची गती कशी होते.

अर्जुन उवाच;

एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १२-१ ॥

श्रीभगवानुवाच;

मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ १२-२ ॥

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ॥ १२-३ ॥

सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ १२-४ ॥

अर्जुनाने विचारले; हे भगवंत, जे अनन्यप्रेमी भक्तजन योग्य रीतीने ध्यानात निरंतर मग्न राहून आपणा सगुणरूप परमेश्वराशी संलग्न झाले आहेत आणि दुसरे जे केवळ अव्यक्त, अविनाशी सच्चिदानंदघन निराकार ब्रह्माचीच भक्तीभावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अधिक उत्तम मार्ग कोणता?

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या साकार रुपाला भजतात ते भक्तजन माझ्यामते श्रेष्ठ योगी आहेत. परंतु जे पुरुष, इंद्रिये नियंत्रित करून, मन, बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या, सर्वव्यापी, अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य, अचल, निराकार, अविनाशी अश्या निर्विशेष रूपाची ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी तत्पर राहून आणि सर्वांच्या प्रति समभाव ठेवतात ते योगी सुद्धा मलाच येऊन मिळतात.


या भागात भगवंत सांगतात कि साकार भगवंताची भक्ती करणे ( निश्चित स्वरूपाच्या ध्येय्यासाठी प्रयत्न करणे ) सदैव श्रेष्ठ आहे.

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ १२-५ ॥

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ १२-६ ॥

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ १२-७ ॥

मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥ १२-८ ॥

निर्विकार रूपातील भगवंताची भक्ती करणाऱ्या पुरुषांची परमेश्वर ( धेय्य ) प्राप्ती अधिक कष्टदायक आहे. देहधारी जीवांसाठी म्हणजेच मनुष्यासाठी हा मार्ग नेहमीच अधिक दुष्कर असतो. परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे मला अर्पण करून माझी अनन्यभावाने भक्ती करतात, हे पार्था, त्या माझ्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ या संसारसागरातून उद्धार करतो. त्यामूळेच तू ( वाचक रुपी पार्थ ) मज पुरूषोत्तम भगवंतावर मन केंद्रित कर आणि तुझी बुद्धी माझ्यावर स्थिर कर या रीतीने तू नक्कीच माझ्यातच स्थित राहशील, यात संशय नाही.

या भागात भगवंत स्वतः, भगवंतप्राप्ती साठीच्या पद्धतीचे वर्णन करत आहे आणि वाचक रुपी पार्थ हे नियम सर्व प्रकारच्या ध्येय प्राप्तीसाठी वापरू शकतात आणि इथे अंतिम धेय्य मनस्वास्थ, मनशांती आणि प्रगती आहे, हे आपण सर्व जण जाणतोच.

भगवंत सहज सुंदर मार्गदर्शन करतांना सांगतात कि निश्चित धेय्य, निश्चित पद्धती आणि निश्चित वेळ असेल तर धेय्य प्राप्ती सुलभ आहे आणि याविरुद्ध जर कुणीतरी मला काहीतरी खूप मोठे काम करायचे असे म्हणता वेगवेगळ्या स्वरूपात मोठमोठे प्रयत्न करत असेल तर त्याला देखील ध्येय मिळते पण प्रवास हा कठीण आहे, क्लेशदायक आहे.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇

निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 47) भगवंताचे विराट रूप पाहण्यासाठी पात्रता काय आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ