53) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- मनुष्य कश्याप्रकारे भगवंताची अनुभूती घेऊ शकतात



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

53) मनुष्य कश्याप्रकारे भगवंताची अनुभूती घेऊ शकतात

ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना ।
अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥ १३-२५ ॥

अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते ।
तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः ॥ १३-२६ ॥

यावत्सञ्जायते किञ्चित्सत्त्वं स्थावरजङ्गमम् ।
क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥ १३-२७ ॥

समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्‌ । 
विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ १३-२८ ॥

समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् । 
न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ १३--२९॥

आता भगवंत मनुष्य कश्याप्रकारे त्यांची अनुभूती घेतात याविषयी मार्गदर्शन करतात. याचे तीन मुख्य प्रकार येथे वर्णिले आहेत . ध्यान करणारे ध्यानयोगी, दुसरे ज्ञान उपासना करणारे सांख्ययोगी, तिसरे निष्काम कर्मयोगी.  याव्यतिरिक्त असेही मनुष्य आहेत कि जे स्वतः अध्यात्मिक ज्ञानात पारंगत नाहीत परंतु ते दुसऱ्या तत्त्वज्ञानी पुरुषांकडून ऐकून त्यानुसार उपासना करतात त्यांच्या मार्गदर्शनानुसार मार्गक्रमण करतात. ते श्रुतीद्वारा ( जेष्ठ जाणकारांचे ऐकून ) निष्ठेने उपासना करतात आणि त्यामुळे असे पुरुषसुद्धा मृत्युरूप संसारसागर खात्रीने तरून जातात. हे भरतर्षभा संसारातील सर्वच चराचर हे केवळ क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न होतात, असे तू जाण. आणि जो पुरुष  नाशिवंत सर्व प्राणीमात्रात अविनाशी परमात्मा समभावाने स्थित असलेला पाहतो, तोच खरे सत्य पाहतो. आणि असा पुरुष मनाच्या चांचलतेमुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. आणि यामुळे तो परमगतीला प्राप्त होतो.

प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः ।
 यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥ १३-३० ॥

यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति ।
 तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा ॥ १३-३१ ॥

अनादित्वान्निर्गुणत्वात्परमात्मायमव्ययः । 
शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥ १३-३२ ॥

यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते । 
सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥ १३-३३ ॥

यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः ।
 क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥ १३-३४ ॥

क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा । 
भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॥ १३-३५ ॥

या भागात भगवंत जीवामध्ये परम आत्म्याचे ( परमात्मा ) अस्तित्व आणि कार्य प्रणाली समजून सांगतात, भगवंत सांगतात कि जो पुरुष हे जाणतो कि सर्व कर्मे केवळ प्रकृतीकडून केली जातात,  आणि वेगवेगळे सर्व जीव कसे केवळ प्रकृतीच्या गुणांमुळेच कार्यरत असतात तोच निश्चितच तात्काल सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होतो. 

जो प्रकृती आणि पुरुष यांचे अनादी स्वरूप जाणतो, त्यासोबतच अव्ययी आत्मा हा परमात्म्याचा अंश असून तो दिव्य शाश्वत आणि त्रिगुणातीत आहे.  

हे अर्जुन आत्मा शरीराच्या संपर्कांत येऊनसुद्धा काहीही करत नाही आणि कोणत्याही स्वरूपात शरीरसंबंधी गतिविधीमध्ये भाग घेत नाही. आजच्या भाषेत आत्मा हा मोबाईल च्या बॅटरीतील रिचार्ज सारखा आहे. बॅटरी चार्ज केली कि मोबाईल ला ऊर्जा मिळते तो चालायला लागतो आणि कालांतराने हि ऊर्जा संपते आणि पुढे निघू जाते, चार्ज झालेली बॅटरी मोबाईलच्या उपयोगाशी कसल्याही प्रकारे संबंधित नसते आणि मोबाईल चा उपयोग हा पूर्णतः मोबाईलच्या भौतिक बनावटीवर व त्यामध्ये असलेल्या विविध कार्यक्रमावर अवलंबून असतो. 

तसेच आत्मा हा सदा सर्वदा तटस्थ असतो आणि आत्मा अकर्ता आहे, हे जो मनुष्य जाणतो तोच खरे सत्य जाणतो. ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्याकारणाने कोणत्याही भौतिक प्रकृतीशी लिप्त होत नाही ( त्याचा भाग बनत नाही )  त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा तटस्थ असल्याकारणाने देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही. हे भारता, ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला आपल्या चेतनेद्वारे प्रकाशित करतो. जो मनुष्य आपल्या दिव्य ज्ञानाद्वारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांतील भेद जाणून क्षेत्राच्या नैसर्गिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग अवलंबवतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 52) ज्ञेय (जाणण्यायोग्य) काय आहे ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ