54) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय १४ गुणत्रय विभाग योग



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

54) अध्याय १४ गुणत्रय विभाग योग

श्रीभगवानुवाच;

परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् ।
यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः ॥ १४-१ ॥

इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः ।
सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥ १४-२ ॥

मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन्गर्भं दधाम्यहम् ।
सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ १४-३ ॥

सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः ।
तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥ १४-४ ॥

आता भगवद्गीता माध्यमातून आपल्याला सत आणि असत, योग्य आणि अयोग्य अश्या बाबी अतिशय सहजतेने आणि स्पष्टपणे समजून घ्यायला मिळत आहे. जसे कि आपण सगळेच जाणतो कि अध्याय ११ नंतरची भगवद्गीता हि समर्पित भक्तांसाठी आणखी सोपी करून सांगितलेली जीवन मार्गदर्शक तत्वे आहेत.
या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ज्ञानांतीलही अती उत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो, हे या आधीच जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परम सिद्धी प्राप्त करू शकले आहेत. हे ज्ञान प्राप्त केलेला मनुष्य माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो आणि सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाहीत आणि प्रलयकाळीही व्यथित होत नाही. म्हणजेच जन्ममृत्यूच्या ( सुखदुःखाच्या) फेऱ्यातून मुक्त होतो.

हे भारता, माझी ब्रम्हरूपी मूळ प्रकृती संपूर्ण भूतांच्या जन्माचा स्रोत आहे. या ब्रम्हाला मी गर्भस्थ करतो आणि यामुळेच सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. आणि हे कौंतेय सर्व प्रकारच्या योनी ( प्राणिमात्र ) भौतिक प्रकृतीमध्ये उत्पन्न होतात, त्या सर्वाना बीज प्रदान करणारा पिता मीच आहे. भगवंतनी सांगितले आहे कि हे ज्ञान मी तुला आता पुन्हा सांगतो. 

तर सर्व भौतिक जीवांच्या उत्पत्तीचा स्रोत भगवंताची जड असलेली अष्टधा प्रकृती आहे. श्लोक ७:४ मध्ये याचा उल्लेख पाहायला मिळतो. आणि मीच सर्व भुतांचे बीज आहे भगवद्गीता श्लोक ७.१०. हा भाग पुन्हा वाचल्यास आपल्याला याबाबत अधिक स्पष्टता मिळेल.

सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः । 
निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥ १४-५ ॥

भगवंत पुढे म्हणाले; हे महाबाहो अर्जुन, सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तिन्ही गुण प्रकुतीचाच भाग आहेत अविनाशी जीवात्मा जेव्हा प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा तो या त्रिगुणांनी बांधला जातो. याचाच अर्थ हा कि देहधारी जीवात्म्याला त्रिगुणाच्या बंधनातून सहज सुटका नाही.

आता पुढील भागात भगवंत प्रकृतीच्या तिन्ही गुणांची विस्तारपूर्वक माहिती द्यायला सुरुवात करतात. यात तुलनात्मक रीतीने तिन्ही गुणांची वैशिष्ट्ये आणि त्यांचे परिणाम भगवंत सांगतात. ते आपण आता जाणून घेऊया, या भागात आपल्याला ज्ञान मिळेल कि कोणत्या गुणांचा म्हणजेच सवयीचा अवलंब करावा आणि कोणत्या सवयींपासून दूर राहावे. आणि ह्या सवयी मन, बुद्धी, वाचा, विचार आणि कृती या सर्व बाबतीत समजणे आवश्यक आहे.

तत्र सत्त्वं निर्मलत्वात्प्रकाशकमनामयम् । 
सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ ॥ १४-६ ॥

रजो रागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम् ।
 तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम् ॥ १४-७ ॥

तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् । 
प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥ १४-८ ॥

हे निष्पाप अर्जुना, सत्वगुण इतर गुणांपेक्षा प्रकाशदायी आणि निर्मळ आहे. हा मनुष्याला पापांपासून दूर ठेवतो. आणि सतोगुणी व्यक्ती हि नेहमी सुख आणि ज्ञान भावात वास करतात. हे कौंतेय अनेकानेक, अमर्याद इच्छा, वासना आणि महत्वाकांक्षा रजोगुणाचे उगमस्थान आहे. आणि त्यामुळे मनुष्य ( देहधारी जीव ) सकाम कर्माशी बांधला जातो. म्हणजेच रजोगुणी मनुष्य कायम वेगवेगळ्या इच्छा धरून त्यासाठी कार्य करत राहतो. इथे सुखापेक्षा ध्येयप्राप्ती महत्वाची आणि बहुदा रजोगुणी व्यक्ती ध्येयप्राप्तीनंतर प्राप्तीचे सुख न उपभोगता पुढील धेय्याकडे वाटचाल करतांना दिसते. आणि हा कधीही न संपणारा प्रवास आहे. 

भगवंत पुढे सांगतात हे भारता! अज्ञान हे तमोगुणाचे उगमस्थान आहे. आणि देहधारी जीवांचा मोह म्हणजेच तमोगुण आहे. मूर्खपणा, आळस आणि झोप हे तमोगुणाचे परिणाम आहेत आणि हे तमोगुणी व्यक्तीला आपल्यात बांधून ठेवतात. बंध याचा आपण इथे अर्थ सवयी असा घेऊया.

सत्त्वं सुखे सञ्जयति रजः कर्मणि भारत । ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे सञ्जयत्युत ॥ १४-९ ॥ 

रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत । रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा ॥ १४-१० ॥

हे भारता, सत्त्वगुण मनुष्याला सुखाशी बांधतो, रजोगुण मनुष्याला सकाम कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतो आणि तमोगुण मनुष्याचे ज्ञानहरण करून त्याला प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो.  

हे भारता त्रिगुणामध्ये वर्चस्वासाठी सतत स्पर्धा चालू असते. कधी कधी  रजोगुण आणि तमोगुण यापेक्षा सत्त्वगुण प्रभावी होतो. तर कधी सत्त्वगुण आणि तमोगुण यापेक्षा रजोगुण वाढतो. आणि यापध्दतीनेच कधीकधी सत्त्वगुण आणि रजोगुण यांना दडपून तमोगुण प्रभावी होतो. हि चालणारी निरंतर स्पर्धा, मनुष्याच्या आयुष्यातील ज्ञान आणि मौन याचे महत्व स्पष्ट करते. व्यस्त मनुष्य आपल्या गुणाचे अवलोकन करण्यास समर्थ नसतो आणि त्यामुळेच मनुष्याने आपल्या आयुष्यात मौन, ध्यान आणि प्रामाणिक गुरुची संगत धरली पाहिजे जेणेकरून आपल्या या भौतिक शरीरावरील विविध गुणांच्या प्रभावाचे (सवयी) अवलोकन करून इष्ट तो बदल करणे सोपे जाते. याची पद्धती भगवंत पुढे सांगतात....

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 53) मनुष्य कश्याप्रकारे भगवंताची अनुभूती घेऊ शकतात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ