55) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- विविध गुणांची लक्षणे
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
55) विविध गुणांची लक्षणे
सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्प्रकाश उपजायते ।
ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ॥ १४-११ ॥
लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमः स्पृहा ।
रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ ॥ १४-१२ ॥
अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च ।
तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन ॥ १४-१३ ॥
या भागात भगवंत विविध गुणांची लक्षणे सांगतात ( आधुनिक जगात गुण समजण्यासाठी, त्रुटीपूर्ण पण सोयींचा असा "गुण म्हणजे सवयी" असा अर्थ लावायला हरकत नाही असे माझे ( निशा चान्ने ) प्रांजळ मत आहे.
ज्यावेळी या देहात सर्व द्वारे ज्ञानानेयुक्त होतात, त्यावेळी असे समजावे की, सत्त्वगुणाचा मनुष्याला अनुभव येतो. इथे आपण श्रीमद्भगवद्गीता ५. ३ श्लोकाचा ( सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी। नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्।।5.13।।) संदर्भ घेतला तर शरिर आणि त्याच्या नऊ द्वारांचे संयमन काय व कसे ते अधिक स्पष्ट होईल.
भगवंत पुढे हे भरतर्षभा, रजोगुण वाढल्यावर अतिलोभ, भौतिक ऐश्वर्य मिळविण्याच्या आणि जमविण्याच्या धेय्याने प्रेरित होऊन सकाम कर्मांचा आरंभ होतो आणि त्यामुळे मनुष्य अशांतीला प्राप्त होतो आणि विषयभोगांच्या लालसा उत्पन्न होतात.
आता तमोगुणाविषयी भगवंत सांगतात हे कुरुनंदना, तमोगुण वाढल्यावर मन आणि बुद्धी अंधःकाराने (अज्ञानाने) ग्रासली जाते, कर्तव्य कर्मांत रस नसणे, निष्क्रियता, आळस आणि अनियंत्रित झोप इत्यादी गुण (सवयी) प्रकट होतात.
यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् ।
तदोत्तमविदां लोकानमलान्प्रतिपद्यते ॥ १४-१४ ॥
रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते ।
तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते ॥ १४-१५ ॥
जेव्हा हा मनुष्य सत्त्वगुणांचे प्राबल्य असतांना मरण पावतो, तेव्हा तो उत्तम महर्षींच्या, उच्च आणि पवित्र दिव्य लोकांत जातो. रजोगुणांचे प्राबल्य असता मरण पावल्यास तो सतत सकाम कर्मामध्ये आसक्त असणाऱ्या मनुष्यांत जन्मतो. तसेच तमोगुण प्राबल्य असलेल्या समयी मेलेला मनुष्य पशू जातींत जन्मतो.
इथे थोडे काळजीपूर्वक समजून घेण्याची गरज आहे कि पुढील जन्म हा शब्द ऐकला कि आधुनिक मनुष्य हे माझ्यासाठी नाही असे म्हणून त्या विषयाकडे दुर्लक्ष करतो. सनातन धर्मात पुनर्जन्म हा काळाच्या विविध टप्प्यावर आधारित असावा असा माझ्या बाबांचा कयास आहे. त्यांचे म्हणणे हे आहे मनुष्याचे पुथ्वी ची स्व:गती ( दिवस ), चंद्र परिक्रमा गती ( मास ) आणि पृथ्वीची सूर्यगती ( साल ), गुरुगती ( १२ वर्षे किंवा तप ) आणि आत्म्याची गती ( जन्म आणि मृत्यू ) असे सांगायचे टप्पे आहेत आणि या प्रत्येक टप्प्यावर आपण पुनर्जन्म अनुभव करत असतो.
पुनर्जन्मांची हि व्याख्या आपण पुन्हा कधी जाणून घेऊया पण आता इथे मी यासंदर्भात सयुक्तिक असे एक उदाहरण देऊ इच्छिते ते असे कि समजा एक मनुष्य वरील पैकी कोणतीही एक गती एक विशिष्ट गुणात राहिला तर तो पुढील गतीमध्ये कोणत्या अवस्थे जाईल? जसे कि कल्पना करा राम नावाचा मनुष्य महिनाभर ( चंद्रगती ) सतोगुणामध्ये प्रबळ राहिला आणि महिना संपल्यावर साहजिकच त्याची संगत हि महर्षींची असेल, या सम जर तो रजोगुणात राहिला तर त्याची संगत हि महत्वाकांक्षी लोकांची असेल आणि जर तो पूर्ण मास तमोगुणात राहिला तर साहजिकच आहे आळस झोप प्रमाद यामुळे त्याची सांगत आणि अवस्था हि पशुसामान होईल.
जेवढ्या मोठया प्रमाणात ( काळासाठी ) गुणाचा प्रभाव मनुष्याच्या जीवनात राहतो तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला पुढील टप्प्यामध्ये त्याचे शुभाशुभ भोग भोगावे लागतात, यात मुळीच शंका नाही त्यामुळेच मनुष्याने दररोज आपल्यावर असलेल्या गुणांच्या प्राबल्याचा आढावा घ्यावा आणि लवकर इष्ट ते बदल करावे जेणे करून योग्य मार्ग राखणे सोपे जाईल व त्यानुसार मनुष्याला फळ मिळेल.
त्याविषयी मार्गदर्शनभगवंत पुढील भागात करतात ते आपण जाणून घेऊया.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 54) अध्याय १४ गुणत्रय विभाग योग

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा