56) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- जसे गुण तशी गती आणि आधुनिक मनुष्यासाठी गुण म्हणजेच सवयी ह्यावर भगवंताचे मार्गदर्शन



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

56) जसे गुण तशी गती आणि आधुनिक मनुष्यासाठी गुण म्हणजेच सवयी ह्यावर भगवंताचे मार्गदर्शन

कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम् ।
रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम् ॥ १४-१६ ॥

सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं रजसो लोभ एव च ।
प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥ १४-१७ ॥

ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः ।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥ १४-१८ ॥

श्रेष्ठ कर्माचे सात्त्विक म्हणजेच शुद्ध फळ असते जे सत्वगुणामध्ये असते. राजसकर्माचे फळ दुःख असते आणि तामस कर्माचे फळ अज्ञानातून उत्पन्न  मूर्खपणा असे सांगितले आहे. भगवंत पुढे सांगतात कि सत्त्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून लोभ व महत्वाकांक्षा उत्पन्न होते आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञानही उत्पन्न होते.  सत्त्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात. म्हणजेच आयुष्यात प्रगती करतात. रजोगुणात असलेले पुरुष मध्यलोकात म्हणजे सामान्य लोकात राहातात आणि तमोगुणाचे प्राबल्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादी सवयी ( गुण ) असलेले तामसी पुरुष अधोगतीला कीट, पशू इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात. म्हणजेच या सवयी असलेले मनुष्य अधोगतीला प्राप्त होतात. 

या भागात भगवंत सांगतात कि जसे गुण तशी गती आणि आधुनिक मनुष्यासाठी गुण म्हणजेच सवयी.

नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति । 
गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ॥ १४-१९ ॥

गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान् । 
जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ॥ १४-२० ॥

मनुष्याने हे जाणणे आवश्यक आहे कि सर्व कर्मांचा कर्ता केवळ प्रकृतीचे गुणच आहेत आणि आणि या गुणांखेरीज ( सवयींखेरीज ) इतर दुसरा कोणताही कर्ता नाही. आणि जो या गुणांच्या पलीकडील असणाऱ्या परमेश्वराला जाणतो तो भगवंताच्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो म्हणजेच परमशांतीला प्राप्त करतो. 

जेव्हा मनुष्य भौतिक शरीराशी संबंधित तीन गुणांच्या पलीकडे जातो. म्हणजेच गुणातीत होतो तेव्हा तो जीवनातील सर्व सुख दुःख आणि व्याधींच्या पलीकडे जातो आणि याच जीवनात मनस्वास्थ मनशांती आणि प्रगती रुपी अमृताचा उपभोग घेऊ शकतो.  इथे वाचक रुपी अर्जुनाने दखल घेणे आवश्यक आहे कि जीवनातील वाढलेल्या ताणतणाव आणि अस्थिरतेचा सामना करताना आधी सतोगुण ( आधीच्या श्लोकात सांगितलेल्या चांगल्या सवयी ) आणि नंतर  अध्यात्मिक स्वरूपाला प्राप्त करणे आवश्यक आहे.

अर्जुन उवाच;

कैर्लिङ्गैस्त्रीन्गुणानेतानतीतो भवति प्रभो । 
किमाचारः कथं चैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते ॥ १४-२१ ॥

मागील भागात भगवंतांनी उल्लेख केला कि त्रिगुणातीत होणे अधिक श्रेयस्कर आहे. याबाबत भगवद्गीता च्या सुरुवातीलाच भगवंतांनी अर्जुनाला सांगितले होते कि "त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन। निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्।।2.45।।" आणि आता सुद्धा भगवंत त्रिगुणांच्या पलीकडे जाण्याचा उपदेश देत आहे 
आणि यामुळे अर्जुनाची उत्सुकता वाढली आणि मग अर्जुनाने विचारले. अर्जुन म्हणाला, हे भगवंत तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कसा ओळखावा? त्याची लक्षणे काय आहेत? आणि त्याचे वागणे कश्या प्रकारचे असते? आणि हे प्रभू, मनुष्य कोणत्या उपायाने या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊ शकतो?

श्रीभगवानुवाच;

प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव । 
न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति ॥ १४-२२ ॥

उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते । 
गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते ॥ १४-२३ ॥

समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः ।
 तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः ॥ १४-२४ ॥

मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः ।
 सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥ १४-२५ ॥

त्रिगुणातीत मनुष्याचे लक्षण आणि आचरण सांगण्यास भगवंत सुरुवात करतात.
श्रीभगवान कृष्ण म्हणाले, हे पांडवा जो पुरुष सत्त्वगुणाचे ज्ञान, रजोगुणाची आसक्ती आणि तमोगुणाचा मोह हे प्राप्त झाल्यास आनंद किंवा विषाद मनात राखत नाही. जो साक्षीरूप राहून केवळ बघतो कि कश्याप्रकारे केवळ गुणच कार्य करत आहेत आणि तो या गुणांकडून विचलित होत नाही आणि स्थिर राहतो.  जो आत्म्यामध्ये स्थित आहे आणि दुःख-सुख समान मानतो, माती, दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला प्रिय किंवा अप्रिय असे काहीच नाही ज्याला निंदा व स्तुती समसमान वाटतात. 

आणखी माहिती देतांना भगवंत सांगतात कि जो मान व अपमान सामान मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, जो स्वतःला कर्ता मानत नाही आणि सर्व भौतिक कर्मांचा त्याग करतो. अश्या मनुष्याला त्रिगुणातीत म्हंटले जाते.

मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते । 
स गुणान्समतीत्यैतान्ब्रह्मभूयाय कल्पते ॥ १४-२६ ॥

ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्ययस्य च । 
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥ १४-२७ ॥

या अध्यायाच्या शेवटच्या भागात भगवंत सांगतात कि जो पुरुष अनन्य भक्तियोगाने मला निरंतर भजतो, तो सुद्धा या तिन्ही गुणांना सहजपणे पार करून मज सच्चिदानंदघन ब्रह्म तत्वाकडे मार्गस्थ होतो. म्हणजेच निष्काम कर्म करणारी किंवा सर्वकर्मफलत्यागी (सर्व कर्मफळ भगवंताला अर्पण करणारी) व्यक्ती असे करू शकतो. कारण त्या अविनाशी परब्रह्माचा, परमसुखाचा अनंत शाश्वत आश्रय मी आहे.

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे  गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 55)- विविध गुणांची लक्षणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ