10) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- क्षत्रिय धर्मानुसार युद्ध करण्याच्या आवश्यकतेचे वर्णन
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
10) क्षत्रिय धर्मानुसार युद्ध करण्याच्या आवश्यकतेचे वर्णन
मृत्यू हेच जर अंतिम सत्य आहे तर मग कशाला काही करायचे? एक दिवस जर मारायचे आहेच तर मग मजा करूया असा युक्तिवाद करत अनेक जण आळसाला जवळ करत नित्य नियत कर्म न करण्याचे समर्थन करताना दिसतात. पण या भागात आपल्याला लक्षात येईल कि नेमकं काय करणे अपेक्षित आहे आणि भगवंतानी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार या अमूल्य अश्या मानव जीवनाचा पुरेपूर उपयोग जीवनात समाधान व यश प्राप्ती आणि मोक्ष (अंतिम ध्येय) प्राप्तीसाठी कसा करता येईल.
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥२.३१॥
वरील श्लोकात भगवान अर्जुनाला सांगतात की क्षत्रिय या नात्याने धर्मतत्वांसाठी युद्ध करणे या व्यतिरिक्त इतर कोणतेही श्रेष्ठ कर्तव्य (कर्म) नाही. म्हणजेच आपल्या धर्मानुसार नित्य नियत कर्म करण्याचा उपदेश भगवंत करतांना दिसून येत आहेत. आता इथे धर्माची व्याख्या मानवनिर्मित गृहीत न धारता भगवंताच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लक्षात घेणे आवश्यक आहे. अनॆक मनुष्य आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी जन्मावर आधारित धर्म आणि वर्ण संस्थेचे समर्थन करतांना दिसून येतात. इथे दोन मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. पहिला भगवंत केवळ मानवाची निर्मिती करून मानवासाठी मर्यादीत तत्वांची गोष्ट करत नाहीत तर भगवंत चराचर आणि अष्टधा प्रकृती तसेच त्या पलीकडील परा प्रकृती चे देखील संचालक आहेत आणि इथे मानव वगळता इतर कुठल्याही चराचरात जन्माने धर्म ठरत नाही, मग मानवासाठी तरी असे कसे होईल? यासाठीच भगवंतांची वाणी म्हणजचेच श्रीमद भगवद्गीता ।४:१३।
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।४:१३।
मध्ये देखील स्पष्ट उल्लेख आहे कि मनुष्याचे वर्ण हे गुण आणि कर्म यावर आधारित असून यानुसारच त्याचा धर्म म्हणजे समाजासाठी (जगत कल्याणासाठी) त्याने करावयाचे कार्य ठरते. ( याविषयी अधिक माहिती आपण अध्याय ४ आणि १८ मध्ये जाणून घेणार आहोत. ) म्हणजेच मनुष्याने त्याच्या विशिष्ट गुणांनुसार नित्य नियत कर्म करत राहावे असे मार्गदर्शन करतांना भगवंत इथे दिसतात. म्हणजेच जसे अर्जुनाने धर्मतत्वांसाठी युद्ध करणे श्रेष्ठ कर्तव्य आहे तसेच आपण सर्वांनीही आपल्या गुणांनुसार समाज उपयोगी कर्म करत राहणेच श्रेष्ठ आहे असे भगवंत सांगत आहेत.
यदृच्छया चोपपन्नां स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥२.३२॥
इथे भगवंत अर्जुनाला सांगतात कि क्षत्रियाला अशी धर्म युद्धाची संधी मिळणे म्हणजेच आपोआपच स्वर्ग सुख मिळाल्यासारखेच आहे. यातून आपणही हा बोध घ्यावा कि आपण सुद्धा आपल्या गुणांनुसार समाजोपयोगी कार्य करण्याची संधी गमावू नये. आपल्या गुणांनुसार समाजोपयोगी कार्य करण्याची संधी म्हणजेच स्वर्ग सुखाची द्वारे खुली करणारे साधन आहे.
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥२.३४॥
मनुष्याने कोणते कार्य करणे श्रेयस्कर आहे हे सांगितल्यावर भगवान कृष्ण अतिशय स्पष्ट सांगतात कि असे न केल्यास काय परीणाम होतील. खरं पाहता मनुष्य याबाबत अनुभवी आहे व समाजात अनेक ज्ञानी लोक याबाबत चर्चा करताना सुद्धा दिसतात. पण भागवतांनी सांगितल्याप्रमाणे 'कळते पण वळत नाही' अशी बहुतांश व्यक्तींची अवस्था झाल्याची अनेक उदाहराणे आपण दैनंदिन जीवनात पाहतो.
समजून घेऊया कि आपल्याला निसर्गत: प्राप्त गुणांनुसार / क्षमतेनुसार कर्म न केल्याने काय परिणाम होतात. पहिला मुद्दा हा कि अश्या धर्मभ्रष्ट (नित्य नियत कर्म न करणाऱ्या) व्यक्तीला पाप लागते. आता आधुनिक युगातील ज्ञानी लोक पाप हा शब्द हसण्यावर नेतात. पाप वगैरे काही लागत नसते असे काही नसतेच असे म्हणतात. पण मला असे वाटते कि या व्यक्तींना पाप या शब्दाची संकल्पना पूर्णतः माहित नसावी. उदा. कल्पना करा कि तुम्ही जाणतेपणी तुमच्या जवळच्या मित्रांची पेन / वही पळवली किंवा नष्ट केली आणि थोड्या वेळेने तुमचा मित्र आल्यावर त्याने चौकशी केली आणि पाहणारे कुणी नसल्यामुळे तुम्ही त्याला म्हणालात कि मला माहित नाही. तुमच्या मित्राने तुमच्यावर विश्वास ठेऊन अत्यंत दुखी कष्टी होऊन त्या पेन चा शोध घ्यायला सुरुवात केली. अतिशय केविलवाणा झालेला तुमचं मित्र रडत आहे. त्याला बक्षीस म्हणून मिळालेलं हे पेन त्याला खूप प्रिय होते. काळ पुढे गेला आणि मित्र ती घटना विसरला. आता विचार करा. तुम्ही ती घटना विसराल का? आयुष्यात जेव्हा जेव्हा मित्र आणि पेन हा विषय समोर येईल तुमची अंतरात्मा तुम्हाला या घटनेची आठवण करून देईल व तुमच्या मनात कायम एक अपराधी भाव उत्पन्न होत राहील. ज्ञानी महात्मे असे म्हणतात कि परमेश्वर सर्वसाक्षी आत्मारूपात सदैव आपल्या सोबत राहतो व तो सर्व साक्षी आहे त्यामुळेच बघणारे कुणीही नसतांना सुद्धा आपल्याला हा अपराधी भाव आयुष्यभर मनातल्या मनात खात राहतो आणि हा भाव म्हणजेच पाप लागणे.
क्षमता असूनही कर्तव्य पूर्ण न करणारी व्यक्ती सुद्धा याच प्रकारे पापाची धनी होते या आयुष्यभर आपराधीभाव व पश्चातापाच्या अग्निमध्ये जळत राहते किंवा अश्या व्यक्तीला दुर्भाग्यशाली व त्रुटीपूर्ण जीवन जगण्याशिवाय पर्याय राहत नाही.
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।
सम्भावितस्य चाकीर्ति-र्मरणादतिरिच्यते ॥२.३४॥
भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥२.३५॥
अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥२.३६॥
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥२.३७॥
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥२.३८॥
भगवंत पुढे सांगतात कि अशी व्यक्ती जगात अकिर्तीला प्राप्त होते म्हणजेच निंदनीय ठरते आणि सन्माननीय व्यक्तीसाठी अकिर्ती किंवा अश्या प्रकारची सामाजिक निंदा मृत्यूपेक्षाही वाईट असते. आधी स्तुती करणारे लोकच तुमची निंदा करतील व ते तुम्हाला पळपुटा मानतील. ना ना प्रकारे अपमान करतील. आणि असहनीय असे दुःख प्राप्त होईल. म्ह्णूनच भगवंत सांगतात कि,
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥२.३७॥
आपल्या गुण व क्षमतेनुसार नियत कर्म करत राहणेच श्रेष्ठ आहे. या प्रयत्नात पराभव झाले तरी स्वर्ग प्राप्ती आहे आणि जिंकला तर तिन्ही लोकांचे ऐश्वर्य आहे. म्हणूनच हे अर्जुन उठ आणि कार्य (युद्ध ) कर.
आजकाल अनेक जण विशेषतः नवयुवक मी काय करावे याबाबत संभ्रमात पडलेले दिसतात. त्या सर्वांसाठी श्रीमद भगवद्गीतेतील हा भाग अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शन देणारा ठरू शकतो. आपल्या क्षमतेनुसार प्रयत्न करणे / नित्य नियत कर्म करणे हेच श्रेष्ठ आहे.
याच मुद्याला अनुसरून आणखी एक महत्त्वपूर्ण बाब श्लोक ३८ मध्ये सांगितली आहे आणि ती म्हणजे जय-पराजय, लाभ-हानि, सुख-दुख समान मानून केवळ आपल्या क्षमतेनुसार आणि धर्मनुसार नित्य नियत कर्म करणे आवश्यक आहे. असे केल्याने आपल्याला कोणतेही पाप लागत नाही. मनात अपराधी भाव सुद्धा येत नाही. आणि सामाजिक स्तरावर आपली अकीर्तीसुद्धा होत नाही. म्हणूनच आपल्या गुण आणि कर्मानुसार नियत कर्म करावे.....
याबाबत आणखी अधिक माहिती पुढील भागात भगवंत देतात
।। जय श्रीकृष्णा ।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 9)-जीवनातील परम सत्य
भाग 11)- कर्मयोग काय आहे? याविषयी मार्गदर्शन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा