11) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- कर्मयोग काय आहे? याविषयी मार्गदर्शन
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
कर्मयोग काय आहे?
याविषयी मार्गदर्शन
एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां श्रृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥२.३९॥
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवातो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥२.४०॥
जगातील परम सत्याची सांख्य / पृथकरणात्मक म्हणजेच विश्लेषणात्मक माहिती दिल्यानंतर भगवंत कृष्ण अर्जुनाला म्हणतात कि आता मी तुला निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो. आणि जर तू या ज्ञानाच्या आधारे कर्म केले तर तू कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. या मार्गाचा विलंब केल्याने कोठेही नुकसान किंवा ह्रास होत नाही, याउलट या मार्गावर केलेली थोडीशी प्रगती सुद्धा व्यक्तीचे महान भयापासून संरक्षण करू शकते.
वाचक मित्रांनो श्रीमद भगवद्गीतेचे सार असलेल्या या अध्यायातील प्रत्येक टप्प्यावर अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन मिळतांना आपणास दिसत आहे.
आता या भागात सध्याच्या जगात पसरलेले भय, निराशा, भीती, तणाव यावर मुक्तीचा हा रामबाण उपाय आपल्याला या टप्प्यात पाहावयास मिळत आहे. तरी माझी वाचक गण व श्रोते गणास विनंती आहे कि भगवद्गीता अध्याय २ हा आपल्या दैनंदिन जीवनात श्रवण किंवा पठणासाठी घ्यावा.
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाका ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥२.४१॥
जे व्यक्ती निष्काम कर्म करतात ते दृढनिश्चयी व्यक्ती आपले सगळे ध्यान एकाच विषयात केंद्रित करतात आणि प्रगती करतात. तर डळमळीत वृत्तीचे व्यक्ती आपले ध्यान अनेकानेक विषयात गुंतवत असतात आणि अश्या व्यक्तीच्या बुद्धीला अनेक फाटे असतात व अश्या व्यक्तीला प्रगती करणे अवघड असते. त्यामुळे आपल्या भगवंतांनी दिलेल्या क्षमतेनुसार निःकाम भावनेने ध्यान एकाच विषयात केंद्रित करून नियत नित्य कर्म करत राहणे हेच श्रेयस्कर आहे.
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥२.४२॥
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविश्लेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥२.४३॥
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥२.४४॥
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥२.४५॥
यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥२.४६॥
या जगतातील बहुतांश मनुष्याना लागू होणारे हे तत्व इथे सांगितले आहे, इथे भगवंत त्या सर्व लोकांना अल्पज्ञ म्हणतात, जे कि वेदांमधील आलंकारिक शब्दांना भूरळून जाऊन स्वर्ग प्राप्ती तसेच भौतिक जगतात प्रगती करण्यासाठी सकाम कर्म करतात. ऐश्वर्यपूर्ण जीवन व इंद्रियतृप्ती याचा ध्यास असल्यामुळे ते सकाम कर्म करतांना याहून अधिक महत्वाचे काहीच नाही असे मानत असतात. आणि अश्या लोकांच्या मनात भगवंताची भक्तिपूर्ण सेवा करण्याचा दृढनिश्चिय होऊ शकत नाही.
वेद आणि प्रचलित ज्ञानग्रहण पद्धती ह्या प्रकृतीच्या तीन गुणाचे वर्णन करतात आणि ज्ञानी व्यक्तीने हे जाणणे महत्वाचे आहे कि या तीन गुणांच्या पलीकडे स्थित होऊन भौतिक प्रकृतीत बध्य करणाऱ्या कर्म आणि फळ प्राप्ती या गुंत्याच्या पलीकडे जा णे आवश्यक आहे आणि तेव्हाच व्यक्ती या सुख दुःख आणि भावसागरास पार करू शकेल. इथे अतिशय उत्तम असे उदाहरण देत भागात कृष्ण प्रभू भक्तीचे महत्व सांगतात कि जे कार्य एखादी लहान विहीर करू शकते ते कार्य एक विशाल जलाशय तर नक्कीच अगदी सहजतेने करू शकतो आणि त्याच प्रमाणे मनुष्य विविध कार्य करत असतांना छोट्या मोठ्या इंद्रियतृप्तीच्या साधंनाना प्राप्त करण्यात वेळ व ऊर्जा गमावून बसतो आणि मनस्वास्थ, मनशांती आणि दिव्य प्रगतीचे सर्वोत्तम साधन असलेली कृष्णभक्ती मागे पडते. खरं पहिले तर कृष्णभक्ती हि त्या मोठ्या जलाशयाप्रमाणे आहे जी कि व्यक्तीच्या सर्व ज्ञात आणि अज्ञात इच्छा सहज पूर्ण करते.
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥२.४७॥
योगस्थः कुरु कर्माणि संग त्यक्त्वा धनंजय ।
सिद्धयसिद्धयोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥२.४८॥
मनस्वास्थ आणि मनःशांतीपूर्वक उन्नतीसाठी भगवंतांनी हा सर्वोत्तम मार्ग संगीतला आहे, ||२.४७|| कि नियत कर्म करणे मनुष्याच्या अधिकारात आहे आणि त्या कर्माच्या फळावर मात्र मनुष्याचा अधिकार नाही. भगवंत स्पष्ट करतात कि कोणताही मनुष्य हा त्याच्या कर्मफलास कारणीभूत नसतो तो केवळ कर्म करू शकतो आणि त्याने स्वतःला कर्म आणि कर्मफळाचा अधिकारी समजून नये तसेच कर्म न करण्याचा विचार सुद्धा करू नये किंवा कर्म न करण्याच्या मोहात सुद्धा पडू नये. ||२.४७||
आता भगवान तणावमुक्त जीवनाचे रहस्य सांगत आहेत, यश आणि अपयश याचा विचार न करता आणि फळाप्रती आसक्ती न ठेवता कर्म करणे हेच श्रेयस्कर आहे आणि अश्या समभावालाच योग म्हंटले आहे. प्राचीन काळापासून योग हा तणावमुक्त जीवांसाठी उपयुक्त आहे हे आपण जाणतो आणि इथे कर्म करतांना योग म्हणजेच कर्मयोग भगवंतांनी सांगितलेला आपल्याला आढळतो. |2:48|
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥२.४९॥
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥२.५०॥
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥२.५१॥
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥२.५२॥
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥२.५३॥
कर्म करण्याची पद्धती व कर्म करणारा योगी याविषयी सांगितल्यावर भगवंत हे हि सांगतात कि वाचकांनी सदैव निंदनीय (गुण व क्षमतेला न शोभणाऱ्या) कर्मापासून दूर राहून, कृष्णभक्तीच्या मार्गावर स्थिर होणेच इष्ट आहे. जे मनुष्य कर्म करून आपल्या कर्मफलाचा उपभोग घेऊ इच्छितात त्यांना लोभी समजावे व असे मनुष्य मनस्वास्थ, मनःशांती आणि ध्येयप्राप्ती हे त्रिकूट प्राप्त करू शकत नाहीत.
जे मनुष्य भगवन भक्तीमध्ये संलग्न होऊन कार्य करतात ते त्यांच्या कर्माच्या चांगल्या आणि वाईट अश्या दोन्ही प्रकारच्या फळापासून मुक्त होतात आणि त्यांना चिरशांती प्राप्त होते. म्हणूनच स्वतःला कर्मफलापासून वेगळे करून कर्म करणे म्हणजेच कर्म योग साधनेच योग्य आहे. आणि असा योग साधने हेच खरे कर्मातील कौशल्य आहे. उदाहरणार्थ: कल्पना करा कि तुम्ही संध्याकाळच्या वेळी सहज चालायला निघालात. तुम्ही एकटे आहात आणि शांत आणि प्रसन्न चित्ताने तुम्ही तुमच्या चालण्याचा आनंद घेत आहात. आता एक वृद्ध व्यक्ती तुमच्या मागून येते आणि तुमच्याकडे पाहत पाहत तुमच्या पेक्षा अधिक वेगाने पुढे जाते. आता तुमच्या मनात काय विचार येत आहेत. इतका वेळ केवळ चालण्याचा आनंद घेणारी व्यक्ती जर चालण्याच्या स्पर्धेत पुढे जाण्याचा विचार करू लागली तर नक्कीच मूळ क्रियेतील आनंदही घेता येणार आणि स्वास्थवर्धक आधी चालण्याची क्रिया मनाच्या 00विकारांमुळे तणाव उत्पत्तीस कारणीभूत ठरेल.
येथे भगवान कृष्ण संदर्भ देत सांगतात कि या पद्धतीचा अवलंब करून अनेक महान ऋषीमुनी तसेच भक्तगण भौतिक जगातील कर्मफळातून मुक्त झाले आहेत आणि जन्म मृत्यू तसेच सुख दुःखाच्या चक्रातून मुक्त झाले आहेत. वाचक रुपी पार्थाला सुद्धा हेच सांगणे आहे कि सुख प्राप्ती साठी किंवा ध्येय प्राप्तीसाठी कर्म करणे सोडून फळाची आशा न करता नियत कर्म करणेच श्रेयस्कर आहे. जिथे फल प्राप्तीचा आनंद आहे तेथे प्राप्ती न झाल्यास किंवा प्रमाण अथवा अपेक्षित वेळी न झाल्यास दुःख सुद्धा होणारच तसेच फल प्राप्ती होईल कि नाही या आशंकेने मन तथा जीवनात निर्माण होणारा तणाव व कार्यातील कमी झालेले लक्ष / ध्यान हे देखील मनुष्याला दुःखदायी ठरते.
त्यामुळेच योगयुक्त होऊन कार्य करणेच श्रेष्ठ आहे.
जेव्हा मनुष्य कर्मयोग साध्य करतो आणि त्याची बुद्धी या प्रचलित जगातील कर्म फळाच्या मोहजाल रुपी घनदाट वनातून पार होते तेव्हा तो मनुष्य वेवेगवेगळ्या माध्यमातून अतिशय आलंकारिक भाषेत सांगितलेल्या कर्म आणि कर्मफळाविषयीच्या रोचक, आशादायी तसेच मोहग्रस्त होत नाही आणि या सगळ्या कथा तसेच मान्यतांना अतिशय उदासिन पणे पाहू शकतो. आणि जेव्हा मनुष्य या अवस्थेस प्राप्त होतो तेव्हा तो सुख दुःख, फळ प्राप्ती तसेच आयुष्यात घडणाऱ्या विविध घटनांना समतेच्या दृष्टीने पाहून आत्मसाक्षात्कारात स्थिर होऊन मनस्वास्थ आणि मनशांती प्राप्त करतो व जीवनातील खऱ्या धेय्याकडे अग्रेसर होतो.
।। जय श्रीकृष्णा ।।
पुढील भागात आपण स्थितप्रज्ञ / स्थिर बुद्धी व्यक्तीची लक्षणे आणि वैशिष्ट्ये
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग) 10- क्षत्रिय धर्मानुसार युद्ध करण्याच्या आवश्यकतेचे वर्णन
भाग 12) स्थितप्रज्ञ / स्थिर बुद्धी व्यक्तीची लक्षणे आणि वैशिष्ट्ये

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा