13) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- कर्मयोग प्रारंभ



 माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- राजेेेश्वरी

13) कर्मयोग प्रारंभ

तृतीयोऽध्यायः- कर्मयोग


या अध्यायात आपण समजून घेणार आहोत:-

ज्ञानयोग आणि कर्मयोग करून अनासक्त भाव ठेवून नियत कर्म करण्याची आवश्यकता,

यज्ञ कर्म का आवश्यक आहे आणि यज्ञाची महिमा,

ज्ञानी, जेष्ठ आणि भगवंत यांनी सुद्धा नियत कर्म का करावीत याविषयी मार्गदर्शन,

अज्ञानी आणि ज्ञानी यातील फरक आणि राग द्वेष विरहित कर्म करण्यासाठी प्रेरणा,

सर्व अनिष्टांचे कारण असलेल्या काम रुपी शत्रू ला नष्ट करण्यासाठी उपदेश.

भूमिका

अध्याय दोन मधील भगवंताचा संदेश ऐकून अनेक जण भ्रमित होतांना दिसतात आणि अशीच अवस्था अर्जुनाची सुद्धा झाली आहे कारण भगवंतांनी प्रथम स्वधर्मानुसार कर्म करण्याचा मार्ग दाखवला आणि नंतर स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे सांगून स्थितप्रज्ञ म्हणजेच स्थिरबुद्धी होण्याचं सल्ला दिला. त्यामुळे भ्रमित झालेला अर्जुन तुमच्या माझ्या मनातील शंका प्रश्न रूपात भगवंतासमोर मांडतो

भाग १ ज्ञानयोग आणि कर्मयोग करून अनासक्त भाव ठेवून नियत कर्म करण्याची आवश्यकता


अर्जुन उवाच:

ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥3:1॥

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥3:2॥

अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं “हे जनार्धन, हे केशव आपण मला संगत आहात कि सकाम कर्म पेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, आणि आता बोलत आहात कि युद्ध कर, मग युद्धामध्ये ह्या सगळ्यांना मारून मला पाप नाही लागणार का? त्यापेक्षा मी भक्ती करतो आणि ह्या सगळ्या मधून मी मुक्त होऊन जातो.”

श्रीभगवानुवाच:

लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन साङ्ख्या नां कर्मयोगेन योगिनाम् ॥3:3॥

न कर्मणामनारंभान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥3:4॥

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥3:5॥

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥3:6॥

मग भगवान श्री कृष्ण म्हणाले:-

“हे निष्पाप अर्जुन, मी तुला हे आधी देखील सांगितले आहे तरी हि मी तुला पुन्हा सांगतो, मला प्राप्त करण्यासाठी भक्तजण दोन प्रकारे प्रयत्न करतात, असे मनुष्य ज्यांची शक्ती सातोगुणाच्या जास्त प्रभावामुळे क्षीण झाली आहे ते लोक मला ज्ञानयोग द्वारे ( यालाच संन्यासयोग कींवा सांख्ययोग सुद्धा म्हणतात.) प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, आणि इतर जण भक्तिमय सेवा करून मला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.

सांख्ययोगात (सन्यास / ज्ञान योग) प्रत्यक्ष कर्म तीन गुंणां द्वारा उत्पन्न झाल्याचे जाणून व माणून, स्वतःला कर्ता न मानता परमेश्वर कर्ता आहे असे मानून समर्पित राहणे. आणि दुसऱ्या प्रकारात परमेश्वर कृपेने प्राप्त क्षमता वापरून करून फळाची अपेक्षा न करता नियत कर्म करणे. इथे भगवंत स्पष्ट करतात कि केवळ कर्म न केल्यामुळे मनुष्य कर्म बंधनातून मुक्त होऊ शकत नाही तसेच केवळ सन्यास घेऊनही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. तसेच कोणताही जीव एक क्षण सुद्धा कर्म केल्या शिवाय राहू शकत नाही. आराम किंवा निद्रा सुद्धा एक क्रियाच आहे. आणि प्रत्येक मनुष्य प्रकृतीच्या तीन गुणांच्या प्रभावाने कर्म करत असतो. काही मनुष्य केवळ इंद्रिय संयमन करतात पण त्याविषयी चिंतन सुद्धा करत राहतात अश्या व्यक्तींना मूढ (मूर्ख ) म्हणत भगवंताने तेही स्वतःला फसवत आहेत असे घोषित केले आहे. आणि असे स्वतःला फसवणरे मनुष्य कधीही प्रगती करू शकत नाही. उदाहरणार्थ शरिराला संयमित मित्र, खेळ आणि इतर आवडीच्या गोष्टींचा त्याग करून अभ्यासाला बसणारे विद्यार्थी जर अभ्यास करतांना मित्र, खेळ आणि इतर आवडीच्या गोष्टींचे चिंतन करत असतील तर ते स्वतःला फसवत आहेत असे समजावे. आणखी एक उदाहरण बघता येईल. काही लोक नावडती व्यक्ती समोर आली कि जिभेवर नियंत्रण मिळवून त्या व्यक्तीशी अत्यंत प्रेमाने व चांगला संवाद करतात पण असा संवाद करतांना जर त्या व्यक्तीच्या मानात घृणा असेल तर ती व्यक्ती निश्चितच स्वतःला फसवत आहे आणि अश्या व्यक्तीला मनःशांती प्राप्त होत नाही. या उदाहरणातून बोध घेऊन व्यक्तीने कर्म आणि चिंतन दोन्ही पातळीवर पाच कर्म आणि पाच ज्ञानेंद्रिये संयमित करणे आवश्यक आहे अन्यथा ती व्यक्ती स्वतःला फसविण्याचा मूर्खपणा करत आहे असे समजावे.

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥3:7॥

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धयेदकर्मणः ॥3:8॥

वरील मुद्दे सांगिल्यानंतर भगवंत पुढे मार्गदर्शन करतात कि, याविरुद्ध जी व्यक्ती कुठलीही आसक्ती न ठेवता केवळ परमेश्वराकडून प्राप्त क्षमतेचा वापर नियत कर्म करण्यासाठी करत असते तीच व्यक्ती श्रेष्ठ आहे. यामुळेच हे अर्जुन तू तुझे नियत कर्म कर. कारण नियत कर्म करणे हे, कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्यावाचून मनुष्य आपल्या शरीराचा निर्वाह करू शकत नाही.
इथे वाचकांसाठी शिकवण हि आहे कि आपल्या क्षमतेला धरून नियत नित्य कर्म करत राहावे, न फळाची आसक्ती न कर्म केल्याचा अभिमान. केवळ नियत नित्य कर्म करून मनुष्य आपला शरीर निर्वाह उत्तम रीतीने करू शकतो. अनेक प्रपंचात लोक शंका व्यक्त करतात कि फळाची आसक्ती न ठेवता किंवा स्वतः कार्य केल्याचा समाधान ( अभिमान ) त्याग करून कसे जमेल आणि हे खरंच काम करते का ? तर अश्या व्यक्तींनी परमेश्वराच्या वचनाप्रती समर्पित होऊन शंका विरहित नित्य कर्म केले पाहिजे. जसे जसे आपण गीता अध्ययनात पुढे जाऊ तसे तसे याविषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत जेणे करून कर्म, अकर्म, सकाम कर्म ,विकर्म आणि निष्काम कर्म हे मुद्दे स्पष्ट होतील. आणि आपण साकारात्मपणे नियत नित्य कर्म करण्यास प्रवृत्त होऊ.

।। जय श्रीकृष्णा ।।

धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने

भाग 12)-
 स्थितप्रज्ञ / स्थिर बुद्धी व्यक्तीची लक्षणे आणि वैशिष्ट्ये

भाग 14)- ध्येय आणि ध्येयप्राप्ती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ