7) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अथ द्वितीयोऽध्यायः ~ सांख्ययोग गीतेचे सार, प्रारंभ
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
7) अथ द्वितीयोऽध्यायः ~ सांख्ययोग
गीतेचे सार
भूमिका
मागील अध्यायाच्या शेवटी आपण पहिले कि परिस्थिती, मनस्थिती आणि भावनांच्या आधारे अर्जुन मार्गभ्रष्ट होत आहे आणि आता खरा कृष्ण-अर्जुन संवाद सुरु होत आहे. आतापर्यंत आपण हे पहिले कि मार्गदर्शक हा नेहमी शांत चित्ताने ऐकून घेणारा असतो जसे भगवद्गीता अध्याय १ मध्ये आपण भगवान कृष्णाला केवळ एक दर्शक व श्रोता रूपातच पहिले आणि हिच खरी शिकवण घेण्याची गरज आहे. आपण कदाचित एक मित्र असाल, पालक, शिक्षक किंवा मार्गदर्शक असाल या सगळ्या भूमिकेत पहिली पात्रता शांत चित्ताने ऐकून घेण्याचीच आहे, हेच भगवंतांनी त्यांच्या कृतीने दाखवून दिले आहे. इथे- जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः । ४:९ । चा आधार घेऊन आपण जाणून घेऊया. स्वयं भगवंतांनी सांगितले आहे कि जो कुणी माझ्या जन्म आणि कर्मांची दिव्यता जाणतो तो मला प्राप्त होतो. म्हणजेच श्रीभगवान कृष्णाच्या जन्मप्रवासाचे व वेगवेगळ्या परिस्थितीत, भूमिकांमध्ये भगवंतांनी केलेल्या कर्मांचे अध्ययन केले कि आपल्याला कळते कि आपण विशिष्ट परिस्थितीत कसे आचरण केले पाहिजे याचे सोदाहरण मार्गदर्शन मिळते. त्यामुळेच भगवद्गीता अध्ययन करत असतांना आपण भगवंताचे बोल आणि वेगवेगळ्या परिस्थितीत भगवंताने केलेले कर्म दोन्हीही विचारात घेऊन व स्वतःला पार्थ रूपात ठेऊन भगवंत या प्रसंगात मला काय मार्गदर्शन करत आहेत याबाबत मनन आणि चिंतन केल्यास आपोआपच मार्ग सापडतो असं बाबा मला नेहमी सांगतात आणि मागील काही महिन्यात मला याची वारंवार प्रचिती येत आहे आणि तुम्हाला सुद्धा याची प्रचिती येईल असा मला विश्वास आहे.
इथून पुढे संजयची वर्णन कर्ता म्हणून भूमिका कमी होत जाऊन केवळ विश्वरूप दर्शन आणि श्रीभगवद्गीता पूर्णतः वेळी संजयची उपस्थिती जाणवेल. म्हणजेच प्रत्यक्ष गुरु शिष्य संवाद आता भरात येत आहे. आता वाचकांनी पार्थ होऊन श्रवण किंवा वाचन करावे कारण तुमच्या माझ्या सारख्या ज्ञान याचक व्यक्तीला प्रत्यक्ष भगवान कृष्ण यापुढील संवादातून तसेच कृतीतून मार्गदर्शन करतील यात पार्थमनी किंचितही शंका नसावी.
'श्रीभगवान कृष्ण' द्वारा अर्जुनाच्या कायरतेवर टिप्पणीं
संजय उवाच:
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥२.१॥
सजंय धृतराष्ट्रास म्हणाला, अशा रीतीने करुणेने व्याप्त, आसवांनी भरलेल्या डोळे, व व्याकूळ मन झालेल्या अर्जुनाला मधुसूदन भगवान असे म्हणाले.
श्रीभगवानुवाच,
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥२.२॥
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥२.३॥
शोकाकुल अर्जुन जेव्हा आपल्या मनाच्या विकारांना बळी पडून निराश होऊन कर्म त्याग करण्याच्या भावनेने गांडीव धनुष्य खाली ठेऊन रथाच्या मागील बाजूस बसला तेव्हा भगवंत त्यास हिणवतांना दिसतात. भगवंत त्याला सौदाहरण ज्ञान देतात कि हे योग्य नाही आणि यामुळे तुझी कीर्ती नष्ट होईल आणि अशी नपुसंकता तुला शोभत नाही, त्यावर अर्जुन आणखी काही कारणे देतो कि…
अर्जुन उवाच,
कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥२.४॥
गुरूनहत्वा हि महानुभावा- ञ्छ्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥२.५॥
अर्जुन आणखी काही कारणे देतो कि, का युद्ध करणे योग्य नाही. अर्जुन म्हणतो कि मला पूजनीय असलेल्या भीष्म व द्रोण या गुरुसम जेष्ठावर मी कसा उलट बाण चालवू शकेल, असे कार्य करण्यापेक्षा मी भीक मागून जगणे अधिक श्रेष्ठ ठरेल. कारण याना मारून मी यांच्या रक्ताने माखलेले ऐश्वर्य मिळवू शकत नाही. मित्रानो आपल्या आयुष्यातही असेच होते. आपण अनेक अनेक कारणे शोधत असतो व स्वतःला कार्य न करण्यासाठी तयार करत असतो. मला शोभत नाही, लोक काय म्हणतील, मला जमेल का, माझी तयारी नाही, अजून मी निष्णात (परफेक्ट) नाही अश्या अनेक भावनांना बळी पडून आपण आपले नियत कर्तव्य कर्म करण्यापासून स्वतःला परावृत्त करत असतो. अश्यावेळी नेमकं काय करावं म्हणजे आपल्याला योग्य मार्ग व मार्गदर्शन मिळेल.
याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पुढील प्रसंग पुढील भागात जाणून घेऊया.
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 6)- अर्जुन विषाद
भाग 8) अर्जुन भगवंताला शरण जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो

सुंदर विवेचन निशा.
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर व सोप्या भाषेत 👌💐🙏💖
उत्तर द्याहटवा