14) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भाग २ यज्ञकर्म का आवश्यक आहे ? आणि यज्ञाची महिमा
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
14) भाग २ यज्ञकर्म का आवश्यक आहे ? आणि यज्ञाची महिमा
श्लोक ९ ते १६
या भागात पुढे जाण्याआधी हे यज्ञ म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया, आपल्याला लक्षात असेलच कि आपण कर्म योग हा अध्याय अभ्यास करत आहोत आणि यात यज्ञ आणि यज्ञकर्म हा एक मोठा भाग आहे. अनेक लोक यज्ञ हा एक धार्मिक विधी मानून आता या आधुनिक जगात कशाला करायचं यज्ञ असा विचार करतात मग भगवद्गीता केवळ एक धार्मिक आणि अध्यात्मिक ग्रंथ बनून राहतो. त्यामुळेच भागातील श्लोक समजून घेण्याआधी आपण यज्ञ म्हणे नेमकं काय ते समजून घेण्याचं प्रयत्न करूया.
यज्ञ:- भगवद्गीते मध्ये भगवान श्री कृष्ण ने यज्ञ कसं करायचं ह्याचं विश्लेषण दिलेले आहे. यज्ञ म्हणजे नक्की काय? यज्ञ एखाद्या कर्माच्या पूर्ती साठी केले जाते. उदाहरण:- महाराज युधीष्ठीर ने चक्रवर्ती सम्राट बनण्यासाठी राजसूय यज्ञ केलं, ह्याच उदाहरणासोबत यज्ञ पुढे समजून घेऊ. यज्ञ करण्या साठी काय-काय लागतं?
यज्ञ करतांना सगळ्यात आधी यज्ञ कश्यासाठी करायचंय हे निश्चित केलं पाहिजे.
-प्रयोजन .
ज्या स्थळी यज्ञ करायचंय तिथे सकारात्मकता आणि पवित्रता हवी नाही तर चित्त स्थिर होत नाही.
- चांगले वातावरण व संगती.
जे काही अडथळे येण्याची शक्यता आहे त्या अडथळ्यांना नष्ट करून टाकणे आवश्यक आहे, जसं कि महाराज युधीष्टीर ने देशभरातल्या राजांसोबत संगत करून आणि जर सोबत नाहीत त्यांना परास्त करून यज्ञकर्म पूर्ण केले.
-अडचणींवर मात करून साधने जुळवणे.
यज्ञ करतांना ऋषी मुनी आणि ज्येष्ठ जन सोबत हवे जे मार्गदर्शन करू शकतील
- योग्य गुरुकडून मार्गदर्शन घेणे.
शरीराची आणि मनाची शांती अति आवश्यक आहे. नाहीतर लक्ष विचलित होते.
- शारीरिक आणि मानसिक तयारी.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा यज्ञ सुरु केलं कि ते अर्धवट सोडून द्यायचे नाही.
- दृढनिश्यच.
आता यज्ञ म्हणजे ध्येय आणि यज्ञकर्म म्हणजे ध्येयप्राप्ती साठी केलेले कार्य असे समजून घेऊ. ध्येय निश्चित करतांना ध्येय काय आहे ते एकदम स्पष्ट ठरवून लिहून ठेवणे महत्वाचे आहे. ध्येय निश्चित झाल्यावर जिथे कर्म करायचंय ती जागा पवित्र आणि सकारात्मक असली पाहिजे. त्या जागेवर येऊन ऊर्जा अजून वाढली पाहिजे. मन प्रसन्न करणारी जागा असायला हवी.
ज्या काही गोष्टी मन विचलित करू शकतात त्या गोष्टी नष्ट करून टाकायच्या. जर त्या महत्वाच्या असतील तर तात्पुरत्या बाजूला करून ठेवायच्या.
ध्येया प्रति कर्म करतांना अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन करून घेणे त्यांच मत जाणून घेणे आणि त्या प्रमाणे अनुगमन करणे लाभदायी ठरतं. शारीरिक आणि मानसिक तयारी. ध्येय निश्चित केल्यावर ते अर्धवट सोडून द्यायचे नाही हा यज्ञाचा नियम देखील ध्येयप्राप्तीसाठी खूप लाभदायक ठरतो. आंब्याची कोय लावल्यावर लगेच आंबा मिळत नाही. संयम ठेऊन कर्म करण्याची प्रेरणा यज्ञ कर्म देते.
यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर ॥3:9॥
सहयज्ञाः प्रजाः सृष्टा पुरोवाचप्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥3:10॥
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥3:11॥
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः ॥3:12॥
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः ।
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥3:13॥
आता श्लोक समजून घेऊया. भगवंत सुरुवातीलाच सांगतात कि यज्ञविधी सोडून म्हणजेच ध्येयसंगत कर्म सोडून कर्म करणारा मनुष्य हा सामुदायिक कर्मबंधनात अडकत जातो यामुळे मनुष्याने इतर संगाच्या आसक्ती मध्ये न अडकता केवळ यज्ञ कर्म ( ध्येयसंगत कर्म ) करण्यावर लक्ष केंद्रित करावे.
प्रजापति ब्रम्हाने संसाराच्या निर्मिती समयीच मानवासोबतच यज्ञाची निर्मिती केली आणि मनुष्याला सांगितले कि तुम्ही यज्ञ कर्म करा. याद्वारे तुम्हाला इच्छित फळ मिळेल. इथे आतापर्यंत आपण समजलेला यज्ञ पुन्हा एकदा स्पष्ट समोर मांडते कि यज्ञ कर्म म्हणजे परमेश्वराने प्रदान केलेल्या क्षमतेनुसर निर्धारित ध्येय्यासाठी ध्येयसंगत कर्म.
पुढे सांगितले आहे हि या यज्ञाचे फळ तुम्ही देवतांना अर्पण करावे म्हणजेच स्वामीत्व भावाचा त्याग करावा, देवता प्रसन्न होऊन तुम्हाला संतुष्ट करतील आणि परस्पर सहयोगाने सर्वत्र समृद्धीचे समज पसरेल. इथे दोन मुद्दे महत्वाचे आहेत. स्वामित्व भाव सोडला की बंधन मुक्ती मिळते व आयुष्यात तणाव निर्माण होत नाही. दुसरी बाब जो देण्याची वृत्ती ठेवतो त्याची समृद्धी आपोआपच होते.
इथे देवता कोण हा प्रश्न महत्वाचा आहे ?
अनेक जण मानतात कि हिंदू धर्मा नुसार ३३ कोटी देवता आहेत. म्हणजेच ३३ प्रकारचे देवता आहेत आणि या देवतांचा नीट विचार केला तर आपलयाला कळेल कि यामध्ये 12 आदित्य, 8 वसु , 11 रुद्र आणि इन्द्र व प्रजापति ब्रह्मा आहेत.
12 आदित्य - सूर्य चक्राशी संबंधित म्हणजेच काळाशी निगडित आहेत.
8 वसु - हे सृष्टीशी निगडित आहेत.
11 रुद्र - हे प्राण वायुशी निगडित आहेत.
आणि इन्द्र हा देवांचा राजा आणि इंद्रियांचा राजा आहे याचा संबंध मन सयमांशी आहे.
व प्रजापति ब्रम्हा हे रचियता आहेत.
म्हणजेच आपले यज्ञ ( ध्येय ) हे सर्वप्रथम कालानुरूप असावेत तसेच याचा नैसर्गिक समतोलावर सकारात्मक परिणाम असावा, नंतर हे ध्येय आपल्या शरीर नियमन तसेच मन नियमन आणि ज्यामुळे आपले अस्तीत्व आहे त्या सर्वांप्रती धन्यवाद भाव ठेवूनच असावेत. अश्या प्रकारचं यज्ञ ( ध्येय ) श्रेष्ठ आहे.
आता आपल्याला लक्षात येईल कि काल गती, वसुंधरा (सृष्टी संवर्धन), शरीर संवर्धन, मन आणि उत्पत्ती, कर्ता याविषयी समर्पण भाव हेच यज्ञाचे प्रयोजन आहे आणि जो मनुष्य या दृष्टीने यज्ञ कर्म करतो तो निश्चितच ध्येय प्राप्ती करतो. आणि जो या सर्व बाबींचा विचार न करता केवळ स्वतःच्या फायद्यासाठी यज्ञकर्म करतो तो निश्चितच स्वार्थी, चोर तथा पापी आहे असे भगवंताने इथे स्पष्ट केले आहे.
पुढील मार्गदर्शनात भगवंतानी सांगितलेले आहे कि जे लोक योग्य प्रकारे यज्ञ करून त्याचे फळ हे काळ व स्थितीनुसार अर्पण करतात आणि मग शेवटी स्वतःसाठी घेतात ते पुण्यात्मा आहेत आणि त्यांना मनस्वास्थ मनशांती आणि प्रगती लाभते, त्यांना कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही. पाप म्हणजे नेमकं काय याची व्याख्या ।२:३३। मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. याचा आपण असाही विचार करू शकतो कि सध्या जगासमोर असलेले विविध संकटे जसे कि जागतिक तापमान वाढ, विविध नैसर्गिक आपदा या सर्वांच्या मुळाशी मनुष्य प्रजाती आपले नियत कर्म न करता स्वार्थापोटी नैसर्गिक संपदांचा केलेला गैर वापर आहे. इथे ८ वसुंचा झालेला अपमान दिसून येतो (८ वसू - पृथ्वी, जल, वायू , अग्नी, आकाश, सूर्य, चंद्र आणि नक्षत्र.)
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥3:14॥
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥3:15॥
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥3:16॥
नियत कर्म का करत राहावे याबाबत सुद्धा इथे मार्गर्शन लाभते. सगळे जीव अन्नावर आश्रीत आहेत आणि अन्न हे वर्षा (पाऊस) यावर आधारित आहे, पाऊस हा यज्ञकर्मावर आधारित आहे यज्ञ हा नियत कर्म केल्याने पूर्ण होतो. म्हणजेच मनुष्याने जर नियत नित्य कर्म केले तर यज्ञ आपोआपच पूर्ण होऊन समृद्धी रुपी वर्षा उत्पन्न करतो आणि त्यामुळे प्राणिमात्रांचे पालनपोषण होते. आपल्या संसकृतीनुसार वेदांमध्ये नित्य नियत कर्म काय आहेत व ते कसे करावेत याबाबत मार्गदर्शन उपलब्द आहे आणि नित्य नियत कर्म केल्याने मनुष्याचा नक्कीच उद्धार म्हणजेच प्रगती होते. आणि त्यामुळेच मनुष्याने आपले नित्य नियत कर्म केले पाहिजेत आणि असे न करणारा मनुष्य पापाचा धनी होतो. अशी व्यक्ती आपले जीवन हे व्यर्थ वाया घालत आहे आणि कधीही पूर्ण न होणाऱ्या इंद्रियतृप्तीसाठी तो जगत असतो.
।। जय श्रीकृष्णा ।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 13)- कर्मयोग प्रारंभ
भाग 15)-ज्येष्ठांने नियत नित्य कर्म करने का गरजेचे आहे

मला ह्या आगोदर ची पण माहीती हवी आहे plz कुठे मीळेल
उत्तर द्याहटवाAny link or joining any group
Very nice.fulfilled by yagnya vivechan.
उत्तर द्याहटवा