30) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भगवंत भक्तांची स्तुती व नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांची निंदा
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
30) भगवंत भक्तांची स्तुती व
नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांची निंदा
त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् ।
मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥१३॥
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥१४॥
न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः ।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥१५॥
चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन ।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥१६॥
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥१७॥
उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।
आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥१८॥
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥१९॥
त्रिगुणांनी मोहित झालेले हे जग म्हणजेच त्रिगुणांच्या प्रभावाखाली कार्य करणारे सर्व जगत, मला गुणातीत आणि अविनाशी अश्या परमेश्वराला जाणत नाहीत.
तीन दैवी गुणांनी युक्त माझी दैवी शक्ती आहे आणि हि मायाशक्ती एवढी प्रबळ आहे कि तिला पार करणे कोणत्याही जीवाला अतिशय कठीण आहे पण जे मला शरण येतात ते या मायेला सहज पार करतात. इथे भगवंत सांगतात कि जे लोक हे सत्य जाणतात कि प्रत्येक जीव परा व अपरा प्रकृती द्वारा बनलेले आणि परमेश्वरचा अंश असून ते तीन गुणांच्या आधीन आहेत. ज्यांना हे कळते त्यांना स्वीकार करणे, सोडून देणे, माफ करणे, माफी मागणे सहज शक्य होते आणि ते या मोहजाळाला बळी पडत नाहीत.
पण नकारात्मक, दुष्ट आणि मूर्ख लोक ज्यांच्यावर मोह आणि अज्ञानाचे प्रभुत्व आहे ते मला ( भगवंताला ) शरण येत नाहीत.
आता परमेश्वर भगवंत भक्ती करणारे चार प्रकारचे पुण्यात्मा वर्णित करतात. ते चार प्रकार आहेत, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. यामध्ये गरजू, लाभाची इच्छा असलेले आणि जिज्ञासू हे त्यांच्या व्यक्तिगत कारणामुळे भगवंताला भजतात पण केवळ ज्ञानीच परमेश्वराला सर्व कारणांचे कारण आणि सर्व बीजांचे बीज जाणून शरण येतात व भगवंताला भजतात आणि अश्या साऱ्या व्यक्तीला परमेश्वर अतिशय प्रिय असतात आणि असा ज्ञानी परमेश्वराला अत्यंत प्रिय असतो. त्यामुळेच जरी हे चारी प्रकारचे भक्त उदार असले तरी जो माझ्या (भगवंताच्या) ज्ञानामध्ये स्थिर होतो त्याला मी स्वतःप्रमाणेच मानतो. आणि असा पुरुष नक्कीच माझी, सर्वोच्य आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो.
अनेकानेक जन्ममृत्यू नंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते आणि भक्तीत युक्त होऊन ज्ञानाच्या प्रभावाने जो परमेश्वरालाच सर्वांचे परम कारण जाणतो असा महात्मा दुर्लभ आहे. म्हणजेच काय तर त्रिगुणरुपी मायेमुळे बहुतांश मनुष्य कळते पण वळत नाही अश्या स्थितीत राहतात असे भगवंतांनी इथे सांगितले आहे.
अन्य देवतांची उपासना आणि त्याचे फळ
कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः ।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥२०॥
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥२१॥
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥२२॥
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् । देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥२३॥
ज्यांचे ज्ञान भौतिक इच्छानी हिरावून घेतलेले आहे ते अन्य देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार इष्ट देवतांची विधिपूर्वक पूजा आराधना करतात. मी परमात्मा रूपाने प्रत्येक मनुष्याच्या हृदयात स्थिर आहे आणि जेव्हा मनुष्य आपल्या स्वभावानुसार इष्ट देवतांची विधिपूर्वक पूजा आराधना करतात तेव्हा मी त्यांची श्रद्धा त्या इष्ट देवतांवर दृढ करतो आणि त्यामुळे ते स्वतःला इष्ट देवतेप्रती समर्पित करू शकतात. आणि अश्या प्रकारे हे भक्त जण आपल्या इष्ट देवतेची कृपा प्राप्त करून आपले इच्छित भोग प्राप्त करतात आणि सत्य हे कि, हे फळ सुद्धा मीच प्रदान करत असतो. असे असले तरी भगवंत हे सुद्धा स्पष्ट करतात कि केवळ अल्प बुद्धी लोकच दैवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे सुद्धा मर्यादित असतात. देवतांचे उपासक देवलोकाची प्राप्ती करतात तर माझे भक्त परम धमाची प्राप्ती करतात.
आता वरील भाग काही उदाहरणासह समजून घेऊया.
यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥2.46॥
जे कार्य एखादी लहान विहीर करू शकते ते कार्य एक विशाल जलाशय तर नक्कीच अगदी सहजतेने करू शकतो. भगवंत परमात्मा आहेत आणि देवता सुद्धा त्यांच्यापासून उत्पन्न झालेले आहेत त्यामुळे देवतांची भक्ती हि भगवंत श्रीकृष्णांची अर्धवट भक्ती ठरते. जसे कि कुणी धनासाठी, कुणी शक्तीसाठी, कुणी विद्या मिळविण्यासाठी, कुणी पाण्यासाठी, कुणी भोजनासाठी इष्ट देवतांची पूजा करून केवळ तीच गोष्ट किंवा सिद्धी प्राप्त करतात. अश्या मनुष्याला भगवंत अल्पबुद्धी म्हणतात कारण केवळ भावात कृष्ण भक्तीच मनुष्याला सर्वांगीण फळ म्हणजेच मनस्वास्थ, मनःशांती आणि प्रगती देऊ शकते. बाकी सगळी भक्ती अपूर्ण ठरते.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
29) अध्याय 7 प्रारंभ :- विज्ञान सहित ज्ञानाचा विषय, इश्वराची व्यापकता
भाग 31) भागवतांच्या महिमेला जाणणाऱ्यांची स्तुती तथा न जाणणाऱ्यांची निंदा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा