32) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अथाष्टमोऽध्यायः- अक्षरब्रह्मयोग ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म ई. चे विषयानुसार अर्जुनाने विचारलेले सात प्रश्न
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
32) अथाष्टमोऽध्यायः- अक्षरब्रह्मयोग
ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म ई. चे विषयानुसार अर्जुनाने विचारलेले सात प्रश्न
अर्जुन उवाच,
किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते৷৷8.1৷৷
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥8.2৷৷
जसा जसा आपला अर्जुनरूपी श्रीभगवद्गीता अभ्यासाचा प्रवास पुढे जात आहे त्यानुसार अनेकानेक नवनवीन प्रश्न आणि त्याची अतिशय स्पष्ट उत्तरे आपल्यासमोर येतांना दिसत आहेत. याप्रमाणेच ८ व्या अध्यायाची सुरुवात अर्जुन सात अतिशय महत्वाच्या प्रश्नांनी करतोय.
आपण अर्जुन होऊयात आणि ती प्रश्न आणि त्यांची उत्तरे समजून घेऊयात. अर्जुनाने विचारले - हे पुरुषोत्तम! ब्रह्म म्हणजे नेमके काय ? अध्यात्म काय आहे? कर्म कशाला म्हणायचे? अधिभूत काय आहे? आणि अधिदेवता कुणाला म्हंटले जाते? अधियज्ञ म्हणजे कोण? आणि तो या शरीरात कसा वास करतो आणि भक्तीमध्ये लिन झालेले तुम्हाला अंतिमसमयी कसे समजू शकतात?
श्रीभगवानुवाच,
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः ৷৷8.3৷৷
अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ॥8.4৷৷
या प्रश्नाच्या उत्तराआधी "अधि" शब्द आणि या शब्दाचा इथे असलेला अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. मला उमजलेला या शब्दाचा येथील संदर्भ असा बकि 'अधि' म्हणजे प्रथम किंवा सर्वोत्तम.
आता आपण भगवंतांनी या प्रश्नांच्या उत्तरासंदर्भात दिलेले मार्गदर्शन जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अक्षर म्हणजेच कधी नाश न होणारा. म्हणजेच अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते. आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म म्हणतात. जीवांच्या भौतिक शरीराच्या संबंधित गतिविधीला कर्म किंवा सकाम कर्म म्हणतात.
म्हणजेच कधीही नष्ट न होणारी दिव्य ऊर्जा म्हणजेच ब्रम्ह आपण विज्ञानाचा अभ्यास करतांना हे जाणतो कि ENERGY CAN NEITHER BE CREATED NOR BE DISTROYED, IT CAN ONLY BE CONVERTED FROM ONE FORM TO ANOTHER. त्या ऊर्जेलाच ब्रम्ह म्हंटले आहे आणि तीचा नित्य परिवर्तनशील स्वभाव म्हणजेच परम सत्य किंवा अध्यात्म होय. आणि ऊर्जा भौतिक स्वरूपात असतांना जी कार्यें होतात किंवा केली जातात त्यांना कर्म जाणावे. आणि क्षरभाव असलेल्याना म्हणजेच नाशवंतांना अधिभूत जाणावे. जसे कि पंच महाभूतांच्या संसर्गातून निर्माण होणारी भौतिक प्रकृती आणि जीव. सूर्य चंद्र तथा विविध देवदेवतांचा समावेश ज्यामध्ये आहे त्या परमेश्वराला अधिदैव म्हणतात आणि प्रत्यक्ष जीवांमध्ये परमात्मा रूपाने वास करणाऱ्या मला ( श्रीकृष्ण भगवंत ) अधियज्ञ म्हणजेच सर्व यज्ञाचा अधिष्ठाता ( अध्यक्ष किंवा नियामक ) म्हंटले जाते.
अंतकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ৷৷8.5৷৷
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ৷৷8.6৷৷
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्ध च ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ৷৷8.7৷৷
या भागात तीन संदर्भ आहेत आधी आपण या तीन संदर्भाचा अर्थ पाहूया आणि मग जीवनातील त्याची उपयोगिता पाहूया.
जो मनुष्य अंतकाळी माझे स्मरण करतो तो निश्चितच मला प्राप्त होतो. हे कौंतेय मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाने मला स्मरण करतो निश्चितच मनुष्य त्या भावाला प्राप्त होतो. यामुळेच हे पार्थ मन विचलित न होऊ देता तू माझ्या मध्ये आपले ध्यान केंद्रित कर, माझे स्मरण कर आणि त्याबरोबरच तू तुझे युद्ध करण्याचे कर्तव्य सुद्धा पूर्ण कर. तू मला तुझे सारे कर्म अर्पित कर. असे केल्यास तुला निश्चितच माझी प्राप्ती होईल.
आता आपण आपल्या जीवनातील या शिकवणीची उपयोगिता पाहूया. भगवंत म्हणतात कि अंत काळी आपण जर परमचेतनारूपी भगवंताचा भाव मनात ठेवला तर आपल्याला नक्कीच भगवंत प्राप्ती होते. उदा. एखादे म्हणत्वाचे कार्य करत असतांना कार्य होईल कि नाही याची काळजी न करता भगवंत माझ्यासोबत आहे असा भाव ठेवला तर भगवंत रुपी यशप्राप्ती नक्की हे भगवंताचे वचन आहे.
यासोबतच महत्वाच्या कामाला निघताना काम होईल किंवा होणार नाही , सोपे आहे किंवा अवघड आहे असे विविध भाव जर आपण ठेवले तर नक्कीच आपला भाव आपली सत्यता ठरतो हे हि भगवंताचे वचन आहे. या सोबतच भगवंत म्हणतात कि सगळे कर्म मला अर्पित कर. यामुळे कामाच्या निमित्ताने येणार तणाव नाहीसा होईल आणि कार्य सिद्धीस जाईल हे हि आपण लक्षात घ्यावे. तणाव मुक्त कार्य करण्याची हि प्रणाली अतिशय उत्तम आहे. मी माझे काम व्यवस्थित करत आहे व माझ्याकडून हे कार्य भगवंत करून घेत आहेत आणि याचे फळ सुद्धा भगवंत इच्छेनुसार मिळेल. मला वैयक्तिक याचा अनेक महत्वाच्या कामामध्ये अनुभव आला आहे. काम पण होते आणि तणाव पण येत नाही. आवडल्यास तुम्ही पण असे करून पहा.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 31) भागवतांच्या महिमेला जाणणाऱ्यांची स्तुती तथा न जाणणाऱ्यांची निंदा
भाग 33) योग सिद्ध मनुष्याची गति

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा