36) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- नास्तिक व्यक्ती त्यांची विचारधारा व फळ, आस्तिक व्यक्ती आणि त्यांची विविध श्रद्धा



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-

राजेश्वरी

36) नास्तिक व्यक्ती, त्यांची विचारधारा व फळ आणि आस्तिक व्यक्ती, त्यांची विविध श्रद्धा

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ९.११ ॥

मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ ९.१२ ॥

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः ।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ ९.१३ ॥

सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः ।
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ ९.१४ ॥

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥ ९.१५ ॥

या भागात अतिशय सुलभ पद्धीतीने इथे भगवंत नास्तिक व्यक्ती त्यांची विचारधारा व फळ आस्तिक व्यक्ती आणि त्यांची विविध  श्रद्धा समजून सांगतात. परमेश्वर म्हणतात माझ्या परम भावाला न जाणणारे मूढ लोक मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला महान ईश्वराला तुच्छ समजून उपहास करतात. 

अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात वावरणाऱ्या मज परमेश्वराचे सामान्य मनुष्य रूप पाहताना त्यांना माझ्या दिव्य स्वरूपाची जाण होत नाही. मायेच्या प्रभावाने मोहित झालेले असे अज्ञानी लोक राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहातात. त्यांची कर्में आणि ज्ञान दोन्ही निष्फळ आहे असे तू जाण. 

हे पार्था  याविरुद्ध, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले पुरुष ( महात्मे ) मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन माझी भक्ती करतात. ते दृढनिश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. तसेच वारंवार मला प्रणाम करीत भक्तिभावाने ध्यानात मग्न होऊन अनन्य भावाने माझी उपासना करतात. 

दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाने, एकमेवद्वितीय भावाने पूजा करीत माझी उपासना करतात आणि दुसरे काही जण, अनेक रूपांनी युक्त असलेल्या माझ्या विराटविश्वरूपी स्वरूपात मज परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात.


अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम्‌ । 
मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्‌ ॥ ९-१६ ॥

पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः । 
वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च ॥ ९-१७ ॥

गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्‌ । 
प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्‌ ॥ ९-१८ ॥

तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च । अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ ९-१९ ॥


आस्तिक आणि नास्तिक व्यक्तींचे 'भाव' सांगितल्यावर भगवंत सत्य काय आहे ते सांगतात,  


भगवंत म्हणाले यज्ञ मी आहे, कर्मकांड मी आहे, पितृयज्ञ मी आहे, वनस्पती, अन्न व औषध मी आहे. तूप, मंत्र आणि अग्नीही मीच आहे. हवनाची क्रियाही मीच आहे.

या जगाला धारण करणारा व कर्मफळ देणारा, पिता, माता, पितामह, पवित्र ॐ कार, तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. 

प्राप्त होण्याजोगे परमधाम, पालन-पोषण करणारा, सर्वस्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचा आधार आणि विश्रामस्थान आणि ज्याचा अंत नाही असे बीज मीच आहे.  

प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ती-प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे.  मीच सूर्यरूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षून घेतो व त्याचा वर्षाव करतो. हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू आहे, आणि सत्‌ व असत्‌ सुद्धा मीच आहे.

।।जय श्री कृष्णा।।

धन्यवाद🙏🏻😇

निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 35) अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ