40) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- कोणकोणत्या विविध भावात भगवंताचे स्मरण आणि चिंतन करावे?
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
कोणकोणत्या विविध भावात भगवंताचे स्मरण आणि चिंतन करावे?
अर्जुन उवाच
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १०.१२ ॥
आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा ।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १०.१३ ॥
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन्व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १०.१४ ॥
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेष देवदेव जगत्पते ॥ १०.१५ ॥
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः ।
याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १०.१६ ॥
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १०.१७ ॥
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १०.१८ ॥
भगवंताचे बोल ऐकून अर्जुन म्हणाला; हे भगवंत, आपण परम ब्रह्म परमेश्वर, परम धाम, आणि परम पवित्र व अंतिम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, सनातन, आदिपुरुष, अजन्मा, आहात. इथे अर्जुन श्रुती ज्ञान ( जेष्ठाकडून ऐकलेले ) सांगतो. अर्जुन म्हणाला कि मी हे सर्व सत्य मानतो, कारण देवर्षी नारद, असित, देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तसेच सांगत आहात.
हे केशव, जे काही मला आपण सांगितले आहे ते सर्व मी पूर्णसत्य मानतो. हे भगवन् आपल्या लीलामय स्वरूपाला देवता तसेच दानव जाणू शकत नाहीत. हे भूतांना उत्पन्न करणारे, हे भुतेश, हे देवाधिदेव, हे जगतस्वामी, हे पुरुषोत्तम, केवळ तुम्हीच स्वतःला, आपल्या अंतरंगा शक्तीने जाणू शकता. म्हणून ज्या विभूतींच्या योगाने आपण या तिन्ही लोक व्यापले आहेत, त्या आपल्या दिव्य विभूतीविषयी ( परमेश्वराचे अलौकिक ऐश्वर्य ) कृपया मला सविस्तर सांगा.
अर्जुनाने अधिक ज्ञान देण्याची विनंती केली आणि त्यासोबतच अर्जुन म्हणाला कि हे योगेश्वरा, मी कशाप्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे आणि हे भगवन्, कोणकोणत्या विविध भावांत मी तुमचे स्मरण आणि चिंतन करावे? हे जनार्दना, तुमच्याविषयी ऐकून माझे मन कधीही तृप्त होत नाही त्यामुळे कृपया मला तुमची योगशक्ती आणि विभूती पुन्हा विस्ताराने सांगा.
श्रीभगवानुवाच;
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥
१०.१९ ॥
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ १०.२० ॥
अर्जुनाची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कुरुश्रेष्ठा!, आता मी तुला केवळ माझ्या मुख्य मुख्य विभूतींची माहिती देत आहे, कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही. हे गुडाकेशा, मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे. तसेच सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंतही मीच आहे.
म्हणजेच इथे दोन मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत अर्जुनाने मागील श्लोकात विचारलेला प्रश्न कि मी तुमचे ( भगवान श्रीकृष्णांची ) कोणकोणत्या विविध भावात मी स्मरण आणि चिंतन करावे? यावर भगवंतांनी दोन उत्तरे दिली आहेत. पहिले कि मी सर्व भुतांचा (जीवांचा ) आत्मा, आदी, मध्य तथा अंत आहे. म्हणजेच भगवंताची भक्ती आणि स्मरण हे सर्व चराचरामध्ये भगवंताला स्मरण करावे म्हणजेच प्रत्यक्ष जीव, वस्तू, विचार, क्षण हा भगवंत दर्शनाचा आहे. दुसरा भाग भगवंतांनी सांगितला कि या जगात जे काही आहे त्याचे सर्वश्रेष्ठ रूप म्हणजे मीच आहे आणि तू ( वाचक रुपी अर्जुन ) माझे स्मरण या सर्व रूपात करू शकतोस. याची काही उदाहरणे भगवंतांनी पुढील श्लोकांमध्ये दिली आहेत. ती आपण पुढील भागा मध्ये जाणून घेऊ.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 39) अध्याय दहावा:- विभूतियोग प्रारंभ

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा