43) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय अकरावा:- विश्वरूप दर्शन प्रारंभ; भक्तीभावाने समर्पित होणाऱ्या भक्ताला परमेश्वर किती प्रिय मानतात आणि त्याची इच्छा कशी पूर्ण करतात
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
अध्याय अकरावा:- विश्वरूप दर्शन
43) भक्तीभावाने समर्पित होणाऱ्या भक्ताला परमेश्वर किती प्रिय मानतात आणि त्याची इच्छा कशी पूर्ण करतात
मागील दोन अध्यायात भगवंतांनी जगाची उत्पत्ती-प्रलय, आणि श्रीभगवान विष्णूचे ऐश्वर्य वर्णन केले आणि एक अनन्यभक्तीने युक्त समर्पित भक्त म्हणून अर्जुन ( वाचक ) आता भगवंतांच्या रूपाच्या दर्शनासाठी उत्सुक झाला आणि त्याने भगवंताला विनंती केली ती अशी.
अर्जुन उवाच;
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसञ्ज्ञितम् ।
यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥ ११-१ ॥
भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥ ११-२ ॥
एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमेश्वर ।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥ ११-३ ॥
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् ॥ ११-४ ॥
अर्जुन म्हणाला, हे परमेश्वर माझ्यावर कृपा करून आपण जे अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक ज्ञान मला दिले आहे, त्याने माझा अज्ञान रुपी मोह नाहीसा झाला आहे. हे कमलनयना, मी आपल्याकडून जीवांच्या उत्पत्ती आणि प्रलयाविषयी विस्तारपूर्वक ऐकले आहे. तसेच मी तुमची माहिती सुद्धा ऐकली आहे.
हे परमेश्वर, हे पुरुषोत्तम मला तुमचे ज्ञान, ऐश्वर्य आणि तेज यांनी युक्त दिव्य ईश्वर स्वरूप प्रत्यक्ष पाहाण्याची इच्छा आहे. हे प्रभो, जर मी आपले ते रूप पाहण्यास पात्र आहे असे आपल्याला वाटत असेल, तर हे योगेश्वर भगवंत, त्या अविनाशी, विराट स्वरूपाचे मला दर्शन दाखवा.
श्रीभगवानुवाच
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः ।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ ११-५ ॥
पश्यादित्यान्वसून्रुद्रानश्विनौ मरुतस्तथा ।
बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥ ११-६ ॥
इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।
मम देहे गुडाकेश यच्चान्यद्द्रष्टुमिच्छसि ॥ ११-७ ॥
न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा ।
दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ॥ ११-८ ॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, आता तू माझे ऐश्वर्य पहा, माझी हजारो प्रकारची, नाना रंगांची आणि आकारांची अलौकिक रूपे पाहा.
हे भारत, माझ्यामध्ये सर्व ३३ प्रकारच्या (३३ कोटी) देवतांना जसे कि, अदितीच्या बारा पुत्रांना, आठ वसूंना, अकरा रुद्रांना, दोन्ही अश्विनीकुमारांना आणि मरुद्गणांना पहा.
आणखीही पुष्कळशी यापूर्वी कुणीही मनुष्याने न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पाहा. हे अर्जुना, आता या माझ्या शरीरात सामावलेले संपूर्ण जगत तू पहा. तुला इच्छा असेल ते सर्वकाही तू माझ्या रूपात पहा आणि भविष्यातील कोणतीही घटना तू माझ्या रूपामध्ये पाहू शकतोस. तसेच इतरही जे
काही तुला पाहण्याची इच्छा असेल, ते पहा. परंतु मला तू या तुझ्या मनुष्यरूपातील डोळ्यांनी ( दृष्टीने ) हे दिव्या विराट रूप पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. तिच्या सहाय्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पहा.
अनन्य भक्तीभावाने श्रीभगवंताला समर्पित होणाऱ्या भक्ताला परमेश्वर किती प्रिय मानतात आणि त्याची इच्छा कशी पूर्ण करतात याचा येथे प्रत्यय येतो. आता आपण अर्जुन होऊन भगवंताचे विराट रूप दर्शन घेऊया आणि त्याचे संजय व अर्जुनाकडून सविस्तर वर्णन देखील जाणून घेऊया.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 42) भगवंताच्या विभूती ची माहिती
(भाग 2)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा