39) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय दहावा:- विभूतियोग प्रारंभ




माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी


39) अध्याय दहावा:- विभूतियोग

मागील अध्यायात आपण परम गोपनीय ज्ञान, जगाची उत्पत्ती व अंत, आस्तिक आणि नास्तिक प्रवृत्ती, सत्य नेमकं काय आहे, सकाम आणि निष्काम करम करण्याचे फळ, देवतांची उपासना, अनन्यभावाने निष्काम भगवद्भक्तीची महिमा याविषयी भगवंतांची वाणी ऐकली.
आता या अध्यायात भगवंताच्या विभूतींविषयी जाणून घेऊया.

श्रीभगवानुवाच;


भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १०.१ ॥

न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ॥ १०.२ ॥

यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।
असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ १०.३ ॥

बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ १०.४ ॥

अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ १०.५ ॥

महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा । मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ १०.६ ॥

एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ १०.७ ॥

या अध्यायाच्या पहिल्याच चरणात भगवंत, भगवंताचे स्वरूप समजणे कसे अवघड आहे ते सांगून सुरुवात करतात.

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक, तू माझा प्रिय मित्र असल्याने मी तुला पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ असे ज्ञान सांगतो.
अतिशय प्रिय अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे. इथे हे ज्ञान प्राप्त करण्यासाठीची पात्रता भगवंताने स्प्ष्ट केली आहे कि तू माझा मित्र असल्यामुळे हे ज्ञान मी तुला सांगतो. मित्र कोण हे आपण अध्याय ।। ९.२९ ।। मध्ये पहिले आहे आणि केवळ भगवंताचा मित्रच हे ज्ञान जाणून घेऊन आणि समजून शकतो. भगवंत म्हणाले, माझी उत्पत्ती अर्थात लीलेने प्रकट होणे, ना देव जाणतात ना महर्षी. किती सत्य आहे न कि आपण सगळ्यांची उत्पत्ती जाणतो पण सुरुवात समजने अजूनही मानवाच्या बुद्धीपलीकडील बाब आहे. जेव्हा जग नव्हते तेव्हा काय होते आणि त्या 'काही' चे अस्तिव आणि त्यापासून जग कसे उत्पन्न झाले याबाबत बुद्धिमान मनुष्य अनेकानेक तर्क वितर्क करत असतात तरीही हि बाब समजणे त्यांना शक्य झालेले नाही.

भगवंत देखील हेच सांगतात कि मला ना देव जाणतात ना महर्षी. कारण मी सर्व प्रकारे देवांचे व महर्षींचे आदिकारण आहे. माझ्यापासून सर्वांची उत्पत्ती झाली आहे. जो मला वास्तविक जन्मरहित, अनादी आणि जगताचा स्वामी असे तत्त्वतः जाणतो, तो मनुष्यांत ज्ञानी असणारा सर्व पापांपासून होतो.

परमेश्वर पुढे सांगतात कि, निर्णयशक्ती, यथार्थ ज्ञान, असंमूढता, क्षमा, सत्य, इंद्रियनिग्रह, मनोनिग्रह, सुख.दुःख, उत्पत्ति.प्रलय, भय.अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती.अपकीर्ती, असे हे भूतांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. सप्तर्षी गण, त्यांच्या पूर्वी असणारे चार प्रजापती ( मनू ), माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहेत आणि या जगतात वास करणारे सर्व चराचर हि त्यांचीच प्रजा ( उत्पत्ती ) आहे.

म्हणजेच मीच सर्व जगाच्या उत्पन्नत्तीचा कारण आहे.
जो व्यक्ती माझ्या या ऐश्वर्याला, विभूतीला आणि योगशक्तीला तत्त्वतः माणतो, तो सहजपणे अनन्य भक्तियोगाने युक्त होतो, यात मुळीच शंका नाही.

इथे एक गोष्ट लक्षात येते कि जो भगवंताला तत्वतः जाणतो व अजन्मा, अनादी आणि जगताचा स्वामी मानतो तोच या मार्गावर प्रगती करू शकतो बाकी अज्ञानी लोकांना हा मार्ग दुष्कर आहे. आणि तो सुकर व्हावा म्हणून भगवंत पुढील भागात आणखी मार्गदर्शन करतात व त्यांच्या विभूतींविषयी सांगतात...


अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ १०.८ ॥

मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् । 
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ १०.९ ॥

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्‌ । 
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०-१० ॥

तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः । 
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ १०.११ ॥


भगवंत म्हणाले.; मी वासुदेवच, सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगाच्या उत्पत्तीकर्ता आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील आहे. जे मनुष्य हे सत्य जाणतात ते श्रद्धा व भक्ती यांनी युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वराशी संलग्न होऊन नेहमी मला अंतःकरणपूर्वक भजतात. माझे शुद्ध भक्त निरंतर व माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच चित्त अर्पण करतात. ते भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परांत माझ्या प्रभावाचा बोध तसेच चर्चा करीत निरंतर संतुष्ट होतात. 

अश्या सतत अनन्य भक्ती करणाऱ्या भक्तांना मी ज्ञान देतो त्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्त्वज्ञानरूपी तेजस्वी दिपाने नाहीसा करतो.

याचाच साधा सरळ अर्थ आहे कि भक्ताने केवळ अनन्य भावाने भक्ती करायची बाकी मार्ग दाखवणे, ज्ञान देणे व भक्ताला अंतिम धेय्यापर्यन्त पोहचवणे हे सगळं स्वयं भगवंत करतात, वाह.... 

।। जय श्रीकृष्णा ।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 38)भक्तीचा दुराचारी व्यक्तीवरील प्रभाव आणि भगवंताचे अनन्य भावाने भक्तीकरणाऱ्या भक्ताला वचन.

भाग 40) कोणकोणत्या विविध भावात भगवंताचे स्मरण आणि चिंतन करावे?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ