58) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भुतांच्या देहात असणारा हा अक्षय जीवात्मा



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी

58) भुतांच्या देहात असणारा हा अक्षय जीवात्मा

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षKति ॥ १५.७ ॥

शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ।
गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् ॥ १५.८ ॥

श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च ।
अधिष्ठायं मनश्चायं विषयानुपसेवते ॥ १५.९ ॥

उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम् ।
विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः ॥ १५.१० ॥

यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थि
तम् ।
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ १५.११ ॥

या सर्व भुतांच्या देहात असणारा हा अक्षय जीवात्मा माझाच अंश आहे प्रकृतीच्या संसर्गामुळे तो प्रकृतीच्या ६ इंद्रियांशी मन आणि पंचेंद्रिये यांच्याशी संघर्ष करत असतो. जसा वारा एखाद्या वस्तूचा गंध स्वतःबरोबर घेऊन जातो तसाच जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतांना, त्या शरीरातून मनासहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो. आधुनिक जगात याला रासायनिक प्रक्रियेद्वारे समजने सोपे होऊ शकेल. जसे लिबूं आणि पाणी एकत्र मिसळल्यावर लिंबाचे मूळ रूप व स्वरूप बदलते आणि आपल्याला लिंबाचा नवीन तत्त्वासोबत शरबतरुपी पुनःजन्म होतो. घनद्रवरूपातून द्रवरूपात बदलतांना देखील पदार्थ आपले काही तत्व सोबत घेऊन जाते आणि पुढे ती तत्वे वेगवेगळ्या तत्त्वासोबत प्रक्रिया झाल्यानंतर नवनवीन रूप घेतात. पण प्रबळ मूळ तत्वे ( अणू रेणू ) आपल्याला नव्या पदार्थात सापडतात पण यासाठी व्यक्ती हा रसायनशास्त्राचा जाणकार हवा. अज्ञानी व्यक्तीला कोळशापासून हिरा बनला आहे, हे समजणे अवघड आहे. हे आपण सगळेच जाणतो. आत्मारुपी चेतना ( ऊर्जा ) एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात असते आणि सोबतच आपले काही तत्व हि नव्या शरीरात नेत असते. शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहात असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तीन गुणांनी युक्त असताही (त्या आत्मस्वरूपाला) अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूपी दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्त्वतः ओळखतात. याचप्रमाणे जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन इ. विशिष्ठ इंद्रियांची नव्या देहामध्ये प्राप्ती करून त्यांच्या सहायाने विविध भौतिक वस्तूंचा उपभोग घेतो. म्हणजेच जसे भौतिकशास्त्र आणि रसायनशात्रात ऊर्जेच्या एका तत्वातून दुसऱ्या तत्वात जाण्याचे नियम आहेत. उदा. लिंबू आणि पाणी मिश्रित करून आपल्याला वरणभात मिळणार नाही किंवा दुधापासून आपल्याला विशिष्ट प्रक्रिया केल्याने विशिष्ट पदार्थ प्राप्त होतात, तसेच जीवात्मा रुपी चेतना चे सुद्धा पुढील रूपात जाण्याचे नियम आहेत. 

हे नियम सामान्य मानवी बुद्धीच्या पलीकडील असल्यामुळे सामान्य मनुष्याला उमजत नाहीत. केवळ ज्ञानीच जीवांचा त्यांच्या प्राकृतिक गुणांच्या प्रभावाने कोणत्या देहात प्रवास होणार आहे हे जाणू शकतात. अध्यात्मिक दिव्याज्ञान मिळवून आत्मसाक्षात्कार झालेले योगिजन हा जीवात्म्याचा एका योनीतुन दुसऱ्या योनीतील प्रवास स्पष्टपणे पाहू शकतात. पण अविकसित बुद्धी असलेले आणि आत्मसाक्षात्कार न झालेले लोक हे सत्य प्रयत्न करूनही जाणू शकत नाहीत.

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 57)- अध्याय १५ पुरुषोत्तम योग प्रारंभ- संसाररूपी शाश्वत वृक्ष

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ