59) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- जाणून घेऊ भगवंताचे मुलतत्व आणखी कुठे कुठे आहेत



माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-राजेश्वरी

59) जाणून घेऊ भगवंताचे मुलतत्व आणखी कुठे कुठे आहेत

यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् ।
यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् ॥ १५.१२ ॥

गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा ।
पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥ १५.१३ ॥

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ १५.१४ ॥

सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५.१५ ॥

जीवात्म्याचा विस्मयकारक प्रवास समजावून सांगितल्यावर भगवंत त्यांचे मुलतत्व आणखी कुठे कुठे आहे ते सांगतात.
भगवंत म्हणाले; सर्व जगाला ऊर्जा देणारे आणि प्रकाशित करणारे सूर्याचे तेज माझ्यापासूनच निर्माण होते. चंद्र आणि अग्नीचे तेजही माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहे. मीच विविध सृष्टीमध्ये माझ्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो, माझ्यामुळेच समस्त सृष्टी आपल्या कक्षेत स्थिर आहे. इथे सृष्टी मध्ये ग्रह, नक्षत्र, धूमकेतू, तारे तर आहेतच आणि वाचक कल्पना करू शकतात कि ब्रह्मांडातील विविध आकाशगंगांना आपल्या कक्षेत स्थिर ठेवणारे गुरूत्वाकर्षण बल म्हणजेच पुरुषोत्तमाचे दिव्य बल किती महान असेल.

भगवंत सांगतात कि मीच चंद्राप्रमाणे सौम्यरस होऊन वनस्पतींचे पोषण करतो. चंद्राचा वनस्पतीच्या वाढीवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी वाचक स्वतः नेटवर moon gardening या विषयी संशोधन करू शकतात. हे ज्ञान हजारो वर्षे आधी सांगितले गेले होते हे समजून मी नतमस्तक होऊन आपल्या संस्कृतीच्या प्रचारास समर्पित आहे.
भगवंत पुढे आपली चेतना आणि महिमा सांगतात. भगवंत म्हणतात मीच जठराग्नी असून प्राण व अपान वायूच्या संयोगाने अग्निरूप घेऊन चार प्रकारचे अन्न पचवितो. चार प्रकारचे अन्न. 1) चाटून प्राशन केले जाणारे, 2) चावून खाल्ले जाणारे, 3) चोखून खाल्ले जाणारे आणि 4) गिळकृंत केले जाणारे असे चारही प्रकारचे अन्न पचविण्यासाठी ऊर्जा मीच प्रदान करतो. मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात परमसाक्षी रूपात स्थित आहे आणि  माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांचे अध्ययन करून जाणून घेण्यासारखा मीच आहे. वेदांचा ज्ञाता असल्याने वेदांमधील ज्ञान माझ्याकडूनच आले आहे आणि सर्वथा जाणण्यास योग्य मीच आहे.

द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।
 क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥ १५-१६ ॥

उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः ।
 यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥ १५-१७ ॥

यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः । 
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ १५-१८ ॥

यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम्‌ । 
स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥ १५-१९ ॥

गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ । 
एतद्‌बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत ॥ १५-२० ॥

या भागात भगवंत जीवांचे प्रकार त्यांची चेतना आणि स्वतःचे पुरुषोत्तम रूप याविषयी माहिती देतात.
भगवंत सांगतात कि या विश्वात क्षर ( नाशवंत )  आणि अक्षर ( अविनाशी ) असे दोन प्रकारचे जीव आहेत. भौतिक प्रकृतीतील सर्व चराचर जीव हे नाशवंत आहेत. जीव नाशवंत म्हणजे त्यांचे भौतिक प्रकृतीने बनलेले शरीर हा नाशवान आणि अध्यात्मिक जगातून ( परा प्रकृतीतून अध्याय ७.५ ) प्राप्त झालेली चेतना /  जीवात्मा हा अविनाशी म्हटला जातो. परंतु या दोन्हींपेक्षाही एक उत्तम पुरुष आहे, जो त्रिलोक धारण करू त्यांचे धारण ( पालनपोषण ) करत आहेत, या अविनाशी परमेश्वराला म्हणजे मलाच परमात्मा तथा पुरुषोत्तम असे म्हटले जाते. मी नाशवंत आणि अविनाशी या दोहोंचाही पलीकडील आहे. मी अजन्मा, दिव्य आणि सर्वोत्तम आहे आणि जो पुरुष मला या जगतात पुरुषोत्तम म्हणून जाणतो, तोच सारे काही जाणतो. म्हणूनच हे अर्जुना ( वाचक रुपी अर्जुन ) माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे रममाण होऊन माझी अनन्यभावाने भक्ती कर. हे निष्पाप भारता, हे अतिशयमौल्यवान आणि गुप्त असे शास्त्र मी तुला सांगितले आहे, याचे तत्त्वतः ज्ञान घेतल्याने मनुष्य बुद्धिमान होतो आणि भगवंत प्राप्तीच्या आपल्या धेय्याला सिध्द करतो.

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥

।।जय श्री कृष्णा।।


धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने


भाग 58) भुतांच्या देहात असणारा हा अक्षय जीवात्मा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

35) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय ९ राजविद्या राजगुह्य योग

अध्याय ९- राजविद्या राजगुह्य योग- माझी भगवद्गीता राजेश्वरी- आजच्या संदर्भात

37) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- सकाम आणि निष्काम उपासना आणि त्याचे फळ