70) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- त्याग आणि संन्यास
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
70) अध्याय १८ मोक्षसंन्यास योग
त्याग आणि संन्यास
अर्जुन उवाच;
सन्न्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् ।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन ৷৷१८-१৷৷
काम्यानां कर्मणा न्यासं सन्न्यासं कवयो विदुः ।
सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ৷৷१८-२৷
त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः ।
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यमिति चापरे ৷৷१८-३৷৷
निश्चयं श्रृणु में तत्र त्यागे भरतसत्तम ।
त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविधः सम्प्रकीर्तितः ৷৷१८-४৷৷
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् ।
यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम् ৷৷१८-५৷৷
एतान्यपि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च ।
कर्तव्यानीति में पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ৷৷१८-६৷৷
अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हे हृषीकेश, हे केशीनिसुदन, मला त्याग आणि संन्यास तत्वत: जाणण्याची इच्छा आहे. अध्यायात पुढे जाण्याआधी अर्जुनाने हा प्रश्न का विचारला याविषयी समज वाढवणे गरजेचे आहे. अनेक वाचकरूपी पार्थ श्रीभगवान कृष्णाची वाणी असलेली श्रीमदभगवद्गीता वाचन तर करतात, पण संसार आणि भगवद्भक्ती याच्या द्वंद्वामध्ये फसतात. एका बाजूला भगवंताची अनन्यभक्ती आणि दुसऱ्या बाजूला या जन्माचे कारण आणि त्या कारणाशी संलग्न कर्मे. इथे हे हि पुन्हा लक्षात घेणे आवश्यक आहे कि भगवंत स्वतः जेव्हा अवतार घेतात किंवा कोणत्याही भुताला ( जीवाला ) जन्माला घालतात तेव्हा त्यांचे काहीतरी विशिष्ट प्रयोजन असते. आणि ह्याच प्रयोजनातून नरश्रेष्ठ अर्जुन कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर उभा आहे. क्षणासाठी तो कर्म आणि धर्मभ्रष्ट्र झाला आणि त्याला पुन्हा धर्माच्या मार्गावर आणून नियोजित नियत कर्म करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी भगवंतांनी स्वतःची वाणी असलेली गीता ऐकवली. मग अर्जुन युद्धास तयार झाला आणि पुढे काय झाले हे सुजाण वाचकांना माहित आहेच. याचप्रमाणे वाचकरूपी अर्जुन योग्य दिशा घेऊन कश्या प्रकारे आपले नियत कर्म करू शकेल याबाबाबत मार्गदर्शन मिळण्याच्या लालसेनेच हा प्रश्न विचारला गेला आहे असे माझे मत आहे.
श्रीभगवान म्हणाले; अनेक विद्वान, भौतिक इच्छापूर्तीसाठी केल्या जाणाऱ्या कर्माच्या त्यागाला सन्यास असे म्हणतात. तर सर्व कर्मफलाच्या त्यागाला इतर ज्ञानीजण त्याग म्हणतात. आणखी काही विद्वानजन म्हणतात कि सर्व प्रकारची सकाम कार्ये दोषपूर्ण आहेत असे जाणून त्या सर्व सकाम कर्माचा त्याग केला पाहिजे तर काही मोठे विचारवंत असे म्हणतात कि यज्ञकर्म, ज्ञान आराधना व दान आणि तपस्या अश्या कर्माचा कधीच त्याग करू नये. साहजिकच आहे कि असे विविध ज्ञानी लोकांचे मत ऐकल्यावर वाचकरूपी पार्थ गोंधळून जाईल आणि काय करावे हे त्याला सुचणार नाही त्यामुळेच भगवंत आता अर्जुनाला ( वाचकाला ) सांगतात. हे नरशार्दूल, आता तू त्यागाविषयीचे माझे निर्णायक मत ऐक.
भगवंत पुढे सांगतात कि शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या त्यागाचा उल्लेख आहे. यज्ञ दान आणि तप या पुण्य कर्मांचा कधीही त्याग करू नये. हि कर्मे सामान्य मनुष्यच काय पण महर्षीनाही पवित्र करणारी आहेत. आणि हे पार्थ! हि तिन्ही कर्मे करताना कोणत्याही प्रकारची फलाची आसक्ती किंवा इच्छा न ठेवता केली पाहिजेत. हि कर्मे केवळ कर्तव्य म्हणूनच करावीत हे माझे श्रेष्ठ असते निश्चित मत आहे.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 69) ॐ तत् सत् ची माहिती आणि महात्म

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा