81) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- दिव्यज्ञान आणि परमेश्वर प्राप्ती विषयक मार्गदर्शन
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
81) दिव्यज्ञान आणि परमेश्वर प्राप्ती विषयक मार्गदर्शन
असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगतस्पृहः।
नैष्कर्म्यसिद्धिं परमां सन्न्यासेनाधिगच्छति৷৷18.49৷৷
सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे।
समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा৷৷18.50৷৷
बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च।
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च৷৷18.51৷৷
विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानस।
ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः৷৷18.52৷৷
अहङकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते৷৷18.53৷৷
ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति।
समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्৷৷18.54৷৷
भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्৷৷18.55৷৷
आता भगवंत मनुष्यासाठी सर्वोत्तम अशी मुक्तीची (बंधनमुक्त) अवस्था प्राप्त होण्यासाठी मार्गदर्शन करतात, भगवंत सांगतात जो सर्व भौतिक भोगांना महत्व न देता हिन लेखतो, जो आत्मसंयमनाद्वारे सर्व इंद्रियभोगांच्या ईच्छाप्रती अनासक्त भाव ठेवतो तो मनुष्य संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी मनुष्यासाठी मुक्तीची सर्वोच्य दिव्य अवस्था प्राप्त करतो. इथे भगवंत कुठेही भगवे वस्त्र परिधान करून, जटा वाढवून, जंगल किंवा हिमालयात जाण्याचा उल्लेख करत नाहीत, तर स्वधर्माचे अनासक्त होऊन पालन कारण्यालाच संन्यास आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या विरक्तीला संन्यासाद्वारे प्राप्त परम बंधनमुक्तता म्हणतात. आणि हे कौंतेया ज्या विधिद्वारे दिव्य ज्ञानरूपी सिद्धीची ( ब्रम्हज्ञान) प्राप्त होते, ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे.
विशुद्ध बुद्धीने निश्चयाने आत्मसंयमान करून जो व्यक्ती इंद्रियतृप्तीच्या विषयांचा त्याग करून रद्द आणि द्वेषाचा त्याग करून एकांती म्हणजे स्वतःचे नियत कर्म सोडून इतर विषयापासून अलिप्त राहतो, जो मोजकेच खातो, शरीर, मन आणि वाणी संयमित ठेवतो. जो सदैव नियत कर्म रुपी समाधीत निष्काम भावाने मग्न असतो, जो अहंकार, बल, गर्व, इच्छारुपी काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा संग्रह यापासून विरक्त होऊन स्वामित्व भावाचा त्याग करून सदैव शान्त असतो तो निश्चितच परमशांती म्हणजेच मनस्वास्थ मनशांती आणि प्रगती प्राप्त करतो.
याप्रमाणे परमानंद स्थिती प्राप्त केलेल्या मानुषयाला दिव्य ब्रह्मज्ञान प्राप्त योगी जाणावा. असा व्यक्ती कायम परमानंद अनुभवत असतो. तो कशीही दुःख अथवा शोक करत नाही आणि कशाचाही लोभ धरत नाही किंवा कोणतीही आसक्ती बाळगत नाही. असा व्यक्ती सर्व भूताना, चाराचारांना समभावाने पाहतो. आणि या अवस्थेतच त्याला माझी (भगवानाची) शुद्धपरमभक्ती प्राप्त होते. अश्या अवस्थेत माझा तो शुद्ध भक्त, तो मज परमात्म्याला माझ्या अलौकिक स्वरूपासह तत्त्वतः जाणतो, तसेच त्या भक्तीने मला प्राप्त होतो.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 80) वेगवेगळे वर्ण असले तरी आपापल्या गुणाचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी कसा प्राप्त करू शकतो

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा