82) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- भक्ति सहित कर्मयोग चा विषय
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
82) भक्ति सहित कर्मयोग चा विषय
सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः।
मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्৷৷१८.५६৷৷
चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः।
बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव৷৷१८.५७৷৷
मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि।
अथ चेत्वमहाङ्कारान्न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि৷৷१८.५८৷৷
यदहङ्कारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे ।
मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ৷৷१८.५९৷৷
स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा ।
कर्तुं नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशोऽपि तत् ৷৷१८.६०৷৷
श्रीमद्भगवद्गीतेच्या अंतिम चरणात आता भगवंत अर्जुनाला ( म्हणजेच वाचक रुपी पार्थाला नेमके काय केले पाहिजे याचा उपदेश देतात) तो आता आपण सर्वजण शांत आणि एकाग्रचित्ताने समजून घेऊया. भगवंत म्हणले सर्व प्रकारची नियत कर्में मला अर्पित कर आणि माझ्या आश्रयाखाली कर्म करत रहा, असे केल्याने तुला माझे शाश्वतधाम, म्हणजेच मनस्वास्थ मनशांती आणि प्रगती प्राप्त होईल. सर्व कर्मांमध्ये माझाच आश्रय घे म्हणजेच हे लक्षात ठेव कि सर्व यज्ञाचा भोक्ता मीच आहे आणि तू तुझी सर्व कर्मे स्वामित्वाचा भाव सोडून मला अर्पित कर अश्या तर्हेने माझ्या भक्तियोगात (निष्काम कर्मयोगात ) युक्त हो. इथे हे महत्वाचे आहे कि भगवंत स्वतः संरक्षण देत आहेत आणि हे संरक्षण प्राप्त करण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे मी कर्ता असल्याचा स्वामित्व भाव त्याग करणे. जर तू असे करू शकलास तर माझ्या संरक्षण रुपी कृपेने तू सर्व संकटे सहज पार करशील आणि कोणत्याही कर्मबंधनात अडकणार नाहीत. आणि जर तू स्वामित्व भावाचा म्हणजेच स्वतःला कर्ता मानण्याचा अहंकार सोडला नाहीस तू नष्ट होशील म्हणजेच सुख, दुःख, जन्ममृत्यू च्या चक्रात सारखा अडकून राहशील.
हे सगळे ऐकून आणि समजूनही जर तू माझ्या निर्देशानुसार आपले नियत कर्म ( अर्जुनासाठी युद्ध आणि आपल्यासाठी आपल्या पात्रतेनुसार कर्तव्य कर्म ) केले नाही तरी तुला सुटका नाहीच कारण सर्व मनुष्य प्रकृतीच्या तीन गुणांनी बांधला गेलेले आहेत आणि तुझे स्वभावजन्य गुण तुला युद्ध करायला भाग पडतील.
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३.५॥
पण त्यामध्ये कर्मबंधन असेल जे तुझ्या अधःपतनाला कारणीभूत ठरेल. ह्याक्षणी इंद्रियप्रेरणेने परिस्थिती आणि मनस्थिती ला शरण जाऊन तू माझ्या आज्ञेनुसार नियत नित्य कर्म ( कर्तव्य ) करण्याचे टाळत आहेस परंतु तुझ्या स्वभावधर्माला अनुसरून तू हे कार्य निश्चितच करशील. इथे कल्पना करावी लागेल कि जे अर्जुन खरंच शस्त्र टाकून युद्ध ना करण्याचे ठरवून युद्धभूमी सोडायला निघाला असता तर काय झाले असते? कुणी त्याच्यावर प्रहार केला असता किंवा त्याच्या प्रिय भावांचा वध केला असता आणि मग क्षत्रीय रक्त उचंबळून आले असते आणि अर्जुनाला नक्कीच गांडीव उचलावे लागले असते. पण त्यावेळी अर्जुन स्व आणि स्वपरिवार रक्षणार्थ किंवा सूड बुद्धीने लढला असता आणि मग त्याचे कर्म बंधन निर्माण करणारे सकाम कर्म झाले असते त्याला धर्मयुद्ध म्हणणे सयुक्तिक ठरले नसते आणि अर्जुन पाप आणि पश्चातापाचा धनी झाला असता. म्हणूनच इंद्रियप्रेरणेने परिस्थिती आणि मनस्थिती ला शरण जाऊन सकाम कर्म न करता मनुष्याने आपले कर्तव्य नियत कर्म रूपाने आसक्तिरहित होऊन केले पाहिजे. मजबुरीमुळे केलेले कर्म तणाव, दुःख आणि यातनादायी असते तर कर्तव्य म्हणून केलेले कर्म परमसुख देणारे असते म्हणजेच मनस्वास्थ, मनःशांती सह प्रगतीकारक ठरते.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 81) दिव्यज्ञान आणि परमेश्वर प्राप्ती विषयक मार्गदर्शन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा