83) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- श्रीमदभगवद्गीतेतील भगवंताचा अंतिम कर्मनिर्देश
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
83) श्रीमदभगवद्गीतेतील भगवंताचा अंतिम कर्मनिर्देश
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽजुर्न तिष्ठति।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारुढानि मायया৷৷१८.६१৷৷
तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत।
तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्৷৷१८.६२৷৷
इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद्गुह्यतरं मया ।
विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ৷৷१८.६३৷৷
भगवंत पुढे सांगतात, हे अर्जुन! मी परमात्मा प्रत्येक जिवाच्या हृदयात वास करत असून, माझ्या मायेच्या शक्तीने सर्व जीवांना यंत्रवत चालवत आहे. किती सत्य आहे कि प्रत्येक जिवाच्या शरीरात असलेले हृदय आयुष्यभर अविरत चालत असते आणि हि ईश्वराची माया नव्हे तर दुसरे काय आहे, आता आपल्या आधुनिक विज्ञानाला हृदय स्पंदनांचे उगमस्थान उमगले आहे. पण ह्याचा नेमका उल्लेख हजारो वर्षांपूर्वी भगवद्गीतेच्या या श्लोकात असणे म्हणजे त्याकाळी मनुष्याला ईश्वर वाणीतून मिळालेले ज्ञान किती अचूक आहे याचा हा आणखी एक प्रत्यय श्रीमदभगवद्गीतेच्या या शेवटच्या चरणात आपल्याला येतो.
हे सर्व ज्ञान सांगितल्यावर भगवंत आपला श्रीमदभगवद्गीतेतील अंतिम कर्मनिर्देश सांगतात. भगवंत म्हणतात, हे भारता! तुझ्या हृदयस्पन्दनांच्या रूपाने तुझ्यामध्ये स्थित असलेली जीवन चेतन म्हणजेच जीवात्मा असलेल्या मला पूर्णपणे शरण ये माझ्या कृपेनेच तुला परमशांती म्हणजेच मनस्वास्थ मनशांतीसह प्रगती प्राप्त होईल.
आता मी तुला सांगितलेल्या ह्या अतिशयगुह्य ज्ञानावर पूर्णपणे शांतचित्ताने विचार कर आणि मग तुला जे योग्य वाटेल ते कर. इथे भगवंत स्वतः कर्मफळत्यागाचे उत्तम उदाहरण प्रकट करत आहेत. श्रीमदभगवद्गीतारुपी उपदेश केल्यानंतर स्वतः भगवंत देखील अर्जुनाकडून असे कर अथवा तसे कर अशी आशा करत नाहीत अन्यथा भगवद्गीता उपदेश एक सकाम कर्म ठरले असते.
ईश्वर गुणातीत आहेत हे भगवान कृष्णाच्या जीवन आचरणातून वारंवार सिद्ध होते. इथे जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः ।४:९। चा आधार घेऊन आपण जाणून घेऊया के स्वयं भगवंतांनी सांगितले आहे कि जो कुणी माझ्या जन्म आणि कर्मांची दिव्यता जाणतो तो मला प्राप्त होतो. त्यामुळेच भगवद्गीता अध्ययन करत असतांना आपण भगवंताचे बोल आणि वेगवेगळ्या परिस्थिती भगवंताने केलेले कर्म दोन्हीही विचारात घेऊन व स्वतःला पार्थ रूपात ठेऊन भगवंत या प्रसंगात मला काय मार्गदर्शन करत आहेत याबाबत मनन आणि चिंतन केल्यास आपोआपच मार्ग सापडतो.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 82)- भक्ति सहित कर्मयोग का विषय

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा