85) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- श्रीमद भगवद्गीतेचे महात्म्य
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
85) श्रीमद भगवद्गीतेचे महात्म्य
इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन ।
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति ৷৷१८.६७৷৷
य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति ।
भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यत्यसंशयः ৷৷१८.६८৷৷
न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः ।
भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ৷৷१८.६९৷৷
अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ।
ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टः स्यामिति मे मतिः ৷৷१८.७०৷৷
श्रद्धावाननसूयश्च श्रृणुयादपि यो नरः ।
सोऽपि मुक्तः शुभाँल्लोकान्प्राप्नुयात्पुण्यकर्मणाम् ৷৷१८.७१৷৷
आता भगवंत श्रीमद्भगवद्गीता महात्म्य सांगत आहेत कि, जे तप करत नाहीत, भगवंतांना मानत नाहीत, भग्नावतांचा द्वेष करणारे, भगवंत भक्तीमध्ये संलग्न नसलेले अश्या सर्व व्यक्तींना हे गुह्य असे गीतारहस्य कधीही सांगू नये.
इथे माझी भगवदगीता लिहितांना मी सुरुवातीलाच पात्रता हा विषय लिहिला आहे आणि त्यात ज्यांच्या ज्ञानावर मोहाचा पडदा पडला आहे अश्या धार्तराष्ट्र सम व्यक्तींना भगवद्गीता ऐकण्याची सर्वात ज्यास्त गरज आहे पण आपण सर्व जाणतो कि प्रथम तीन व्यक्तीमध्ये भगवद्गीता ऐकण्याचा सन्मान मिळूनही धार्तराष्ट्रांमध्ये काहीही बदल झाला नाही आणि त्यामुळेच श्रीमदभगवद्गीता अध्याय २.७ श्लोकानुसार जोपर्यंत मनुष्य समर्पित होत नाही तोपर्यंत त्याला हे परमगुह्य ज्ञान देऊ नये मग त्यांची गरज हि खूप ज्यास्त असली तरीही आणि हा भगवंतांचा आदेश आहे.
जी व्यक्ती भगवंत भक्तांना हे परमगुह्य ज्ञान सांगेल तो नक्कीच माझ्या कृपाप्रसाद प्राप्त करून मला प्राप्त करेल यात मुळीच शंका नाही. भगवंत भक्तांना हे परमगुह्य ज्ञान सांगणाऱ्या मनुष्यापेक्षा भगवंताचा अधिक प्रिय असा कोणीही भक्त नाही आणि असणारही नाही. भगवंतांच्या या वचनातूनच प्रेरणा घेऊन माझे गुरुवर्य, माझे बाबा यांनी भगवद्गीता सांगण्यास प्रारंभ केला आणि ते इच्छुक श्रोत्यांना, श्रुती सेवा देत आहेत आणि मी आता भगवंत भक्तांना सुलभ अश्या शब्दात भगवदगीता वाचता यावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भगवंत पुढे सांगतात कि त्यांच्या मते जी व्यक्ती या श्रीकृष्ण अर्जुन संवादाचे अध्ययन करते ती व्यक्ती भगवंताचीच भक्ती करत असते. जो मनुष्य श्रध्येने युक्त होऊन व मनात कोणतीही द्वेष भावना न करता श्रीमद्भगवद्गीतेचे श्रवण करतो तो सर्व पापांमधून मुक्त होतो आणि पुण्यकर्मे करून शुभलोकांमध्ये वास करतो. याच अर्थ असा आहे कि मानवी जीवनात मनस्वास्थ मनशांती आणि प्रगतीसाठी आवश्यक अशी सर्व मार्गदर्शक तत्वे असलेली हि श्रीमद्भगवद्गीता अडचणीतून मार्ग दाखवून प्रगतीपथावर नेते.
कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा ।
कच्चिदज्ञानसम्मोहः प्रनष्टस्ते धनञ्जय ৷৷18.72৷৷
श्रीमदभगवद्गीतेमधील श्रीभगवान कृष्णाचा अंतिम श्लोक सुद्धा खूप काही शिकवून जातो, भगवंत अर्जुनाला विचारतात हे पार्थ! हे धनंजय तू पुर्ण मन लावून माझा हा उपदेश ऐकला का आणि तुझा अज्ञानामुळे उत्पन्न संमोह दूर झाला का? इथे भगवंत किती दयाळू आहेत याची प्रचिती येते आणि पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक यांना हि शिकवण मार्गदर्शक ठरते नकी जोपर्यंत याचकाचे ( विद्यार्थ्यांचे) पूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत दात्याने (इथे ज्ञान दाता) संयमपूर्वक मार्गदर्शन करणे आवश्य आहे. इथे भगवंताना आपण सर्व अर्जुनांनी मनःपूर्वक धन्यवाद देऊया त्यांचे मनात स्मरण करून त्यांना नियत नित्य कर्म आणि या दिव्यज्ञानाचा सदुपयोग करण्याचे वचन देऊन आपण भगवंतांसमोर असलेल्या अर्जुनाची प्रतिक्रिया बघूया.
अर्जुन उवाच;
नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वप्रसादान्मयाच्युत ।
स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ৷৷18.73৷৷
अर्जुन म्हणाला, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती पुन्हा प्राप्त झाली. आता मी संशय मुक्त होऊन आपल्या आज्ञेचे पालन करीन. श्रीमदभगवद्गीता अध्याय २.७ मध्ये अर्जुनाने त्याची स्मृती भ्रमित झाली आहे असे सांगून शरण येऊन भगवंताला मार्गदर्शन करण्याची समर्पित भावाने विनंती केली होती आणि इथे हे सिद्ध होते कि संशय, संमोह किंवा अडचणी कितीही मोठया असोत श्रीकृष्ण भगवंताला शरण गेलेला व्यक्ती पूर्णतः संशयरहित होऊन आपल्या नित्य नियत कर्माला लागू शकतो. समर्पण हाच खरा प्रगतीचा महामार्ग होय.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 84) श्रीभगवानकृष्णांनी दिलेला अंतिम उपदेश

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा