24) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- या जगात सुखी राहण्याचा मंत्र समजून घेऊया
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
या जगात सुखी राहण्याचा मंत्र समजून घेऊया
विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥१८॥
इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः ॥१९॥
न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।
स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥२०॥
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥२१॥
ज्ञानी व्यक्ती सर्व चराचरांना समभावाने पाहतो मग तो विद्याविनय संपन्न ब्राम्हण असो, गाय, हत्ती, कुत्रा किंवा चांडाळ असो. ज्ञानी व्यक्तीसाठी हे सर्व सामान आहेत. आणि याप्रमाणे समत्व प्राप्त केलेला मनुष्य हा जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर विजय प्राप्त केलेला असा आहे आणि तो ब्रह्मप्रमाणेच निर्दोष तथा पवित्र आहे आणि अशी व्यक्ती आत्मसाक्षात्कार झालेली आहे असे जाणावे. आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचे लक्षण आणखी एकदा सांगतांना भगवंत सांगतात कि असा मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षित होत नाही किंवा अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक सुद्धा करत नाही. जो मोहविरहित आहे. व भगवंत महिमा (जगातील चेतनेचे खरे ज्ञान) जाणतो तो आत्मसाक्षात्कार आहे. असा मनुष्य बाह्य तसेच भौतिक सुखांची अभिलाषा बाळगत आणि. तो स्वतःमध्येच सुखानुभव (आत्मसुख) घेत असतो.
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते । आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥२२॥
शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥२३॥
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥२४॥
ज्ञानी मनुष्य इंद्रियांच्या संयोगातून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणात भाग घेत नाही. हे कौंतेय! अशा सुखांना आरंभ आणि अंत असल्याने बुद्धिमान व्यक्ती त्यात आनंद घेत नाही. श्लोक २२ च्या पहिल्या भागात दुःख आणि दुसऱ्या भागात सुख हा उल्लेख खूपच महत्वाचा आहे. सर्व सुखाची कारणेच शेवटी दुःखाची कारणे बनतात कारण प्रत्यक्ष सुखाला आदी आणि अंत असतो आणि सुखाचा अंत हीच दुःखाची सुरुवात असते. उदा. जेव्हा मनुष्य एखादी नवी गाडी घेतो ठेव्हा गाडी घेण्याची कल्पनाच मनुष्याला सुखाचा अनूभव करून देते आणि हे सुख गाडी घेतल्यावर वाढत जाते. पुढे जर कुणी त्या गाडीविषयी नकारात्मक टीका केली कि दुःखाची सुरुवात होते, त्या गाडीवर करावे लागणारे खर्च, गेलेला कलर, दबलेले द्वार, इ. नंतर दुःखाचे कारण बनतात. सुख दुःख निर्मिती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जो सुखाचा अभिलाषी आहे त्याला न मागता सुद्धा दुःख प्राप्त होणार कारण सुख संपले म्हणजेच दुःख सुरु होते.
आता स्वयं प्रभूच्या वाणीतून या जगात सुखी राहण्याचा मंत्र समजून घेऊया ।।५:२३।। व ।।५:२४।। शरीर त्यागकारण्यापूर्वी, म्हणजेच मृत्यूपूर्वी जो व्यक्ती इंद्रियांच्या वेगावर नियंत्रण मिळवितो आणि काम आणि क्रोध दूर सारून जो स्थिर होतो तोच या जगात सुखी राहतो. जो अंतकरणात सुखी आहे, सक्रिय आहे आणि त्याचाच आनंद अनुभवतो. व ज्याचे ध्यान सदैव अंतरात आहे ( अंतर्मुखी ) तोच खरा योगी आहे आणि तोच कोणत्याही बंधनात न अडकता शेवटी ब्रम्हाची प्राप्ती करतो. म्हणजेच मनस्वास्थ मनशांतीयुक्त प्रगती प्राप्त करतो.
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥२५॥
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥२६॥
अतिशय महत्वाचं संदेश इथे भगवंत देत आहेत. सर्व चराचर भगवंताच्याच चेतनेचा म्हणजेच भगवंताचा भाग आहेत, हे जाणणारे मनात कोणतीही शंका न बाळगता व सर्व द्वंद्वाच्या पलीकडे असलेले (द्वंद्: काम-क्रोध, आसक्ती-विरक्ती ई.) मन अंतःकरणात रममाण झालेले, जे लोक जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये सदासर्वदा व्यस्त असतात आणि जे पापांपासून मुक्त आहेत तेच ब्रम्हाची प्राप्ती करतात. म्हणजेच मनस्वास्थ मनशांतीयुक्त प्रगती प्राप्त करतात जे क्रोध आणि भौतिक इच्छापासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कार आहेत, आत्मसंयमन आचरतात ते निकट भविष्यात निश्चितच मुक्ती प्राप्त करतात.
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥२७॥
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥२८॥
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥२९॥
अध्याय ५ च्या शेवटच्या भागात प्रभू
सर्व बाह्य इंद्रियाचे विषय बाजूला सारून दोन भुवयांच्यामध्ये मन दृष्टी एकाग्र करून, नाकपुढ्यांमध्ये प्राण व अपान वायूंना रोखून म्हणजेच प्राणायाम विधी करून मन, बुद्धी संयमित केल्याने मोक्ष (ध्येयप्राप्ती ) साठी प्रयत्न करणारा मुनी ( व्यक्ती ) इच्छा, भय व क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नियमितपणे या अवस्थेत असतो तो निश्चितच बंधनातून मुक्त होतो.
परमेश्वर पुढे सांगतात कि मी सर्व यज्ञांचा आणि तापस्यांचा परमभोक्ता आहे. मी सर्व लोकांचा परमेश्वर आहे. सर्व जीवांचा हितकर्ता आहे आणि सर्वांचे कल्याण करणारा आहे. आणि जो मनुष्य हे जाणतो तो सर्व सुखदुःखाच्या पलीकडे स्थित होऊन शांती प्राप्त करतो. सामान्य जीवनातही हे दोन तत्व पाळून मनुष्य इच्छा, भय व क्रोधापासून मुक्त होऊ शकतो. पहिले तत्व आहे प्राणायाम आणि दुसरे तत्व आहे स्वीकार. स्वीकार याचा कि परमेश्वर हीच सर्वोच्य शक्ती आहे आणि जे काही चालले आहे ते त्याच्या चेतनने व प्रेरणेने होत आहे व त्यामुळेच मनुष्याने स्वतःला अकर्ता मानून लोककल्याणार्थ नियत कर्म करत राहिले पाहिजे.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः ॥5॥
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 23) सांख्ययोगी आणि कर्मयोगी व्यक्तीची लक्षणे आणि त्यांची महिमा

खुप प्रसन्न वाटले वाचून
उत्तर द्याहटवाजय श्री कृष्ण