2) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात - मांडणी, अभ्यासाची गरज आणि पात्रता
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात -
राजेश्वरी
2) मांडणी, अभ्यासाची गरज आणि पात्रता
मांडणी
परंपरा सोडून माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात ''राजेश्वरी" या विवेचनाच्या मांडणीचा एक वेगळा प्रयत्न करत आहे. या मध्ये कृष्ण-अर्जुन संवाद आणि त्याचा आजच्या काळातील अर्थ - संदर्भ अशी हि मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच एका वेळी एक पूर्ण संवाद हेरून अनेक श्लोक एकत्र करून त्यावर विवेचन प्रस्तुत केले आहे. मला आशा आहे कि भगवद्गीता या ग्रंथाला केवळ अध्यात्मिक ग्रंथ हेच स्वरूप न राखता “आधुनिक जीवनातील खरा जीवन मार्गदर्शक” अशी मांडणी करण्याचा प्रयास करत आहे. यात उदाहरणे आजच्या कालानुरूप दिली गेली आहेत. यात काही उदाहरणे सहज कळावी म्हणून कालानुरूप मिश्किलपणे मांडली आहेत. यात कुणाचाही उपहास करणे किंवा कुणाच्याही भावना दुखावणे हा उद्देश नसून केवळ सहज सुंदरपणे माझ्यासारख्या नव्या पिढीला जीवन मार्गदर्शन व्हावे हा उद्देश आहे.
अभ्यासाची गरज आणि पात्रता
भगवद्गीता कुणी ऐकावी, कुणी सांगावी यासाठी काही पात्रता आहे का? आणि असेल तर ती कशी समजून घेता येईल असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे आणि जेव्हा आपण भगवद्गीता वाचायला सुरुवात करतो तेव्हा पहिलाच शब्द भगवद्गीतेच्या अभ्यासाची सर्वाधिक गरज कुणाला आहे? याची प्रचिती देतो. गरज आणि पात्रता याचा श्लोकानुसार उल्लेख अध्याय १८ च्या शेवटी सुद्धा करण्यात आला आहे.
भगवद्गीता सुरुवात
"धृतराष्ट् उवाच"
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥1-1॥
संजय उवाच :
दृष्टवा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा । आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥1-2।।
अत्यंत विचारणीय अशी हि भगवद्गीतेची सुरुवात आहे जिथे अंध धृतराष्ट् भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकाची सुरुवात करतो आणि विचारतो कि धर्मक्षेत्र - कुरुक्षेत्र याठिकाणी जमलेल्या दोन विरोधी पक्षातील सदस्य काय करत आहेत. मित्रांनो इथेच खरी भग्वद्गीतेच्या अभ्यासाची गरज समोर येतांना दिसते. ज्यांच्या ज्ञानावर अज्ञानाचा (मोहाचा) पडदा पडला आहे व ज्यांची दृष्टी मोह व अहंकाराने भ्रमित झाली आहे असे लोक भगवद्गीतेला एक दोन पक्षातील युद्ध व या युद्धस्थळावरील संवाद समजतात.
केवळ विवेक जागृत असलेला संजयच आपल्या दिव्य दृष्टीने ज्ञानाने सत्य जाणून घेऊ शकतो आणि ते कथन करू शकतो.
पात्रता पहिली-
म्हणजेच भगवद्गीता समजून घ्यायची खरी गरज अज्ञानी लोकांना ज्यास्त आहे असे मानायला हरकत नाही, म्हणूनच पात्रता (गरज) पहिली श्रवण पात्रता. अज्ञानी व्यक्तीने समर्पित होऊन दिव्यदृष्टी असलेल्या (ज्ञान असलेल्या) पात्र गुरुकडे जाऊन श्रवण करणे आवश्यक आहे.
पात्रता दुसरी –
ज्यांचा विवेक जागृत झाला आहे व ज्यांना सत्य काय आहे याची अनुभूती झाली आहे अशाच संजय सारख्या व्यक्तींना भगवद्गीता अप्रत्यक्ष अनुभव, श्रवण व कथन पात्र मानावे. त्यांनाच भगवद्गीतेच्या श्रवण व अध्ययनाचा लाभ होतो. इथे हे जाणून घेणे आवश्यक आहे कि महर्षी वेदव्यास यांच्या कृपेने, म्हणजेच गुरुकृपेने प्राप्त दिव्यदृष्टीद्वारे संजय हीं पात्रता प्राप्त झाली.
पात्रता तिसरी: पार्थ -
भगवंताच्या कृपेने प्रत्यक्ष अनुभूतीने भगवदगीता समजण्यासाठीची पात्रता याबाबत स्वतः भगवान कृष्णांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे अध्याय ४ मधील श्लोक ३ मध्ये “स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः || भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्” ||४-३|| तू माझा भक्त तथा सखा असल्याने हे दिव्य ज्ञान मी तुला सांगतो (अश्या पात्रतेचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये अनेकदा आलेला आढळतो).
जो समर्पित होऊन शिष्य रूप घेतो व मित्र रूपात स्वीकार भाव ठेऊन हे मार्गदर्शन घेतो त्याला निश्चितच भगवद्गीता श्रवण, तसेच भगवद्गीतेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्य करण्याची प्रेरणा तथा सामर्थ्य प्राप्त होते.
कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ २-७ ॥
वर नमूद केलेल्या श्लोकानंतर भगवंताने भगवद्गीता प्रत्यक्ष सांगायलाची सुरुवात केली. या प्रसंगात अर्जुनाने आपल्या मनाची व स्वभावाची दुर्लबलता मान्य करून संपूर्ण समर्पण करून शिष्यत्व स्वीकार केले. म्हणजेच अर्जुनाने पूर्ण समर्पण करताच भगवंतांनी अर्जुनाला "त्याची गीता" सांगायला सुरुवात केली. माझे असे म्हणणे आहे कि, वाचक, श्रोता जेव्हा मी रूपी अहंकार बाजूला सारून संपूर्ण समर्पणाचा भाव ठेवून भगवद्गीतेचा अभ्यास करायला लागतो तेव्हा त्याला श्रीभगवान कृष्ण भगवद्गीतेचा माध्यमातुन उपदेश करतात आणि मग अशा व्यक्तील स्वतःची गीता समजायला लागते.
।। जय श्री कृष्णा ।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 1) मनोगत- https://nisha-channe.blogspot.com/2021/05/1.html?m=1
भाग 3) अध्याय एक- अर्जुन विषाद योग-http://nisha-channe.blogspot.com/2021/05/blog-post_7.html
#BHAGAVAD-GITA, #BHAGAVADGITA, #माझी_भगवद्गीता_आजच्या_संदर्भात, #मनोगत, #माझी_भगवद्गीता , #राजेश्वरी,

सहज सोप्या भाषेत निरूपण 🙏🙏सुरेख लिहिलंय निशा 👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम निशा!
उत्तर द्याहटवाखूप सुंदर विवेचन👍👍
उत्तर द्याहटवाWell done nisha
उत्तर द्याहटवाI know Bhagwatgita a bit.now I am reading these blogs and understanding it in more fantastic way
उत्तर द्याहटवाThank you for making it simple
खूप छान
उत्तर द्याहटवा