15) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- ज्येष्ठांने नियत नित्य कर्म करने का गरजेचे आहे
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
ज्येष्ठांने नियत नित्य कर्म करने का गरजेचे आहे
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥3:17॥
संजय उवाच:
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥3:18॥
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पुरुषः ॥3:19॥
या भागात प्रत्येक मनुष्यासाठी काही अतिशय महत्वाची अशी कर्म विषयक माहिती दिली आहे. जो मनुष्य आत्म्यातच रममाण आहे व आत्म्यातच संतुष्ट आहे त्याला कोणतेही कर्तव्य राहत नाही. याचाच अर्थ असा आहे कि जी व्यक्ती स्वतःला प्राप्त चेतनेला ओळखून त्यानुसार कर्म करण्यात रममाण असते व स्वतःला कर्ता न मानता नियत कर्म करत राहते त्याला कोणतेही कर्म कर्तव्य राहत नाही. आणि या नियमानुसारच महापुरुषांना कोणतेही कर्म करणे अथवा न करणे बंधनकारक होत नाही आणि अश्या व्यक्तीचा इतर प्राणिमात्रांशी कोणताही स्वार्थपूर्ण संबंध देखील उरत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्यने आसक्ती रहित होऊन सतत नियत कर्म करत राहिले पाहिजे. आणि असा व्यक्ती परमात्माला म्हणजेच मनस्वास्थ आणि मनशांती सह प्रगतीला प्राप्त होतो.
वरील भागात एक प्रश्न निर्माण होतो कि जर संदर्भातील नियमानुसार महापुरुषांना कोणतेही कर्म करणे अथवा न करणे बंधनकारक होत नाही, तर मग कुणीही आणि विशेषतः महापुरुष, जेष्ठ, श्रेष्ठ व्यक्तींनी नियत कर्म का करावे? या स्वाभाविक प्रश्नाचे उत्तर देतांना भगवंत कृष्ण राजा जनक व स्वतःचे सुद्धा उदाहरण देतात आणि समाजातील प्रत्येक जबाबदार, जेष्ठ, श्रेष्ठ व्यक्तींनी या उदाहरणातून बोध घेऊन आपले नियत कार्य केले पाहिजे.
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।
लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥3:20॥
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥3:21॥
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥3:22॥
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥3:23॥
दि उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् ।
संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥3:24॥
जी व्यक्ती स्वतःला प्राप्त चेतनेला ओळखून त्यानुसार कर्म करण्यात रममाण असते व स्वतःला कर्ता न मानता नियत कर्म करत राहते त्याला कोणतेही कर्म कर्तव्य राहत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्याने आसक्ती रहित होऊन सतत नियत कर्म करत राहिले पाहिजे.
राजा जनक यांचे उदाहरण प्रस्तुत करत भगवंत एक अतिशय महत्वाचा संदेश देतात कि त्यांनी हाच मार्ग अवलंबवून परम सिद्धी ( मनस्वास्थ, मनशांती आणि प्रगती ) प्राप्त केली. इथे लक्षात ठेवण्यासारखा उपदेश हा आहे कि ज्याप्रमाणे श्रेष्ठ व्यक्ती आचरण करतात त्याच प्रमाणे सामान्य जण सुद्धा आचरण करत असतात आणि श्रेष्ठ व्यक्तीच्या आचरणाला प्रमाण मानून समस्थ मनुष्य समुदाय आचरण करतो. त्यामुळे जेष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींनी जबाबदारीने वागून आसक्ती रहित होऊन नियत कर्म केले पाहिजे.
भगवंत राजा जनकांचे उदाहरण देऊन थांबत नाहीत तर अर्जुनाला म्हणजेच तुम्हा-आम्हाला हि आठवण करून देतात कि सर्वोच्य शक्ती असल्यामुळे भगवंताला तिन्ही लोकात न तर कोणतेही कर्तव्य नाही, कोणती वस्तू किंवा ध्येय प्राप्त करायचे नाही आणि न तर भगवंताला कश्याची कमतरता आहे. तरी सुद्धा भगवंत सतत नियत कर्म करत असतात आणि त्याचे कारणही त्यांनी स्प्ष्ट केले आहे. ते असे कि, जर भगवंतांनी सावध राहून कार्य केले नाही तर विनाश होऊ शकतो कारण सर्व मनुष्य त्यांच्या मार्गाचे अनुसरण करतील आणि पद भ्रष्ट होईल, संकराच्या माध्यमातून समस्त मनुष्य नष्ट होतील आणि स्वतः भगवंत या विनाशाला कारणीभूत ठरतील. येथे पुन्हा एकदा हा मुद्दा समोर मांडावा वाटतो कि घरातील, ऑफिस मधील, शाळेतील, समाजातील आणि आणखी इतर प्रत्यक्ष ठिकाणच्या जेष्ठांची जबाबदारी आहे कि योग्य आचरण स्वतः करून योग्य पायंडा पाडावा
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।
कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम् ॥3:25॥
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङि्गनाम् ।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् ॥3:26॥
जेष्ठ-श्रेष्ठ व्यक्तींसाठी आणखी एक मार्गदर्शक तत्व भगवंत सांगतात कि जर अज्ञानी लोक आसक्ती पोटी कार्य करत असतील तर ज्ञानी व्यक्तींनी त्याच प्रमाणे अनासक्त राहून नियत कर्म करत राहिले पाहिजे जेणेकरून सामान्य जणांना (अज्ञानी लोकांना) यातून मार्गदर्शन तसेच प्रेरणा मिळेल. इथे एक महत्वाची सूचना अशी सुद्धा आहे कि अज्ञानी लोक जर चुकीचे कार्य करत असतील तर ज्ञानी लोकांनी त्यांना थांबवू नये जेणेकरून त्यांचे मन विचलित होणार नाही. याविरुद्ध ज्ञानी व्यक्तींनी अनासक्त राहून नियत कर्म करत राहिले पाहिजे जेणेकरून सामान्य जण (अज्ञानी लोक) यातून मार्गदर्शन तसेच प्रेरणा मिळेल व त्यांच्या अनासक्त होऊन नित्य कर्म करण्याच्या भावनेचा आणि कृतीचा टप्याटप्याने विकास होऊन ते योग्य मार्गावर येतील.
हि शिकवण आयुष्यात अनेकदा आपल्याला अतिशय महत्वाची ठरते. बरेचदा आपण बोलून आणि मार्गदर्शन करून कधी कधी भाषण देऊन सुद्धा आपल्या पेक्षा कनिष्ठ व्यक्तीला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतो. पण यामुळे ती व्यक्ती विचलित होऊन काम बिघडण्याची शक्यता वाढते हे लक्षात घेऊन स्वतःच्या आचरणातून प्रेरणादायी कार्य करूनच आपल्या पेक्षा कनिष्ठांना योग्य मार्गावर घेऊन येणे हाच योग्य मार्ग आहे हेच भगवंत सांगतात.
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥3:27॥
तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥3:28॥
याभागात आपल्यासमोर मानवाच्या जीवनातील सगळ्यात मोठे सत्य समोर येणार आहे तसेच मानवी जीवनातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा देखील समोर येणार आहे. हेच ते कारण आहे ज्यामुळे कुणी व्यक्ती कुठलेही भौतिक साधन संपत्ती नसतांना सुद्धा अतिशय समाधानपूर्वक आनंदमय जीवन जगतांना दिसतो आणि याचा अभाव असेल किंवा या मुद्द्याचे ज्ञान नसेल तर ना ना प्रकारचे सुखसाधने व ऐश्वर्य असूनही अनेक लोक असमाधानी, दुखी खिन्न असे आयुष्य जगतांना दिसतात.
परम सत्य हे आहे कि प्रत्येक प्राणी हा प्रकृतीच्या तीन गुणाने बांधला गेला आहे आणि त्या गुणाला अनुसरूनच तो कार्य करत असतो. पण बहुतांश मनुष्य स्वतःला कर्ता समजतात आणि हे जगातील सर्वात मोठे अज्ञान आहे. प्रत्येक मनुष्य पाच कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये आणि मन बुद्धी अहंकार या १३ मूलभूत प्रवृत्तीच्या आधारे कार्य करत असतो आणि यालाच गुण असे म्हणतात आणि या १३ मूळ बाबींच्या संयोगातून उत्पन्न झालेल्या वेवेगळ्या प्रयत्नांना कर्म असे म्हणतात. आणि हे सगळे आपोआपच होत असते. याविषयी अधिक खोलात आपण अध्याय १४ मध्ये अभ्यास करणार आहोत. प्रकृतीचे गुण आणि त्याद्वारे होणारे कर्म हे अतिशय सहज होताना दिसते व कर्मावरून गुण आणि गुणांवरून कर्म याचा सहज योग्य अंदाज मांडणे सोपे आहे. कदाचित आधुनिक मानसशास्त्र यावर आधारित असेल किंवा कळत नकळत याच तत्वावर त्याचा पाया रचला गेला असेल. उदा. एखादी व्यक्ती जर अधिक रागीट आहे किंवा अधिक प्रेमळ आहे तर आपण वेगवेगळ्या परिस्थितीत त्यांचे आचरण कसे असेल याचा अंदाज मांडू शकतो. आणि जोपर्यंत ती व्यक्ती त्या गुणांच्या अधीन आहे तोपर्यंत अंदाज बरोबर येईल, त्या व्यक्तीचे गुण थोड्याफार प्रमाणात किंवा थोड्या वेळेसाठी बदलले कि मात्र त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या वर्तनावर / कर्मावर होणार हे हि निश्चित. याच प्रमाणे व्यक्तीचे कर्म बघून आपण त्याच्या गुणांचा अंदाज मांडू शकतो यातही काही शंका नाही.
महत्वाचे हे आहे कि आपण आपल्या गुण आणि कर्मांची निवड करू शकतो आणि त्याद्वारे उन्नती सुद्धा करू शकतो. ज्ञानी व्यक्ती हे जाणतो कि सगळा खेळ गुणांचा आहे आणि गुणच सगळे कार्य करवून घेतात त्यामुळे असा ज्ञानी व्यक्ती स्वतःला कर्ता समजत नाही. थोडक्यात सगळं खेळ परिस्थिती आणि मनस्थिती व त्याच्या मेलचा आहे आणि यातील एक किंवा दोन्हीही बदलले कि माणूस बदलला हे वेगळे सांगावे लागू नये.
।। जय श्रीकृष्णा ।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 14)- ध्येय आणि ध्येयप्राप्ती
भाग 16)-सर्व पापांचे मूळ असलेल्या इच्छा (काम) शत्रूला नष्ट करण्यासाठी मार्गदर्शन.

Best...
उत्तर द्याहटवाMi aajpasun yache chintan suru kele ahe....sorry.
Thanks.
If possible send on telegram pushp 1 to 14..which i don't receive