19) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- कर्म विकर्म अकर्म आणि कर्मात अकर्म भाव, सुख-नैराश्य व यज्ञ याची व्याख्या
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
19) कर्म विकर्म अकर्म
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्॥१६॥
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥१७॥
कर्मण्य कर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥१८॥
या भागात भगवंत सांगतात कि कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी मनुष्याला आधी कर्म म्हणजे नेमके काय, अकर्म कह्णजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. अनेक बुद्धिमान व्यक्तीसुद्धा कर्म आणि अकर्म यातील भेद समजण्यात चूक करतांना दिसतात आणि म्हणूनच भगवंत कर्म आणि अकर्म यातील भेद नीट समजून घेण्यासाठी अर्जुनास ( वाचकास ) सूचना देत आहेत.
भगवंत सांगतात कि कर्माची गती अति गूढ आहे आणि कर्माचे स्वरूप, अकर्माचे स्वरूप आणि विकर्माचे स्वरूपसुद्धा व्यवस्थितपणे समजून घेतले पाहिजे. आणि जो मनुष्य कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तोच बुद्धिमान आहे आणि असा मनुष्य सर्व प्रकारचे कर्म करत असला तरी तो दिव्य स्तरावर स्थिर राहतो व कोणत्याही कर्मबंधनात अडकत नाही.
इथे, कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहणे म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे मनुष्याने कधीही स्वतःला कर्ता समजू नये. कर्मात अकर्म म्हणजे मी कर्म केले असले तरी ते भगवंताने माझ्याकडून करवून घेतेले आहे आणि त्या कर्मातून निर्माण होणारे फळ मी भगवंताला अर्पण करत आहे, म्हणजेच फळ प्राप्तीचे श्रेय किंवा अप्राप्तीची भावना दोन्ही भगवंताला समर्पीत करणे, हि भावना म्हणजे कर्मात अकर्म होय.
अकर्मात कर्म म्हणजे आपल्या आजूबाजूला होणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आपल्याला वाटते कि आपण केल्या नाहीत पण त्या आपल्याच पूर्वकर्माचे फळ म्ह्णून आपल्या आयुष्यात घडत असतात आणि असे कर्म न करता सुद्धा ते परमेश्वर इच्छेने आहेत हे जाणून ते माझेच कर्म म्हणून समभाव ठेवून स्वीकार करणे म्हणजेच अकर्मात कर्म पाहणे होय.
यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ॥१९॥
त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित्करोति सः ॥२०॥
निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥२१॥
यदृच्छालाभसंतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः ।
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥२२॥
गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥२३॥
कर्मात अकर्म भाव, सुख-नैराश्य व यज्ञ याची व्याख्या
जी व्यक्ती आपले सगळे नियत नित्य कर्म शास्त्रानुसार कुठलीही इच्छा किंवा संकल्प न करता करतात आणि ज्ञानाद्वारे जे जाणतात कि हे कर्म मी केलेलंच नाही अश्या महापुरुषांना ज्ञानी जणदेखील पंडित (महाज्ञानी) मानतात. जी व्यक्ती समस्त कर्म व त्यातून प्राप्त फळांविषयी आसक्तीचा त्याग करून कर्म आणि कर्मफळ यावर विसंबून राहत नाहीत. त्याऐवजी ते परमात्म्यात लिन होऊन कार्य करत असतात ते समस्त कार्य करूनसुद्धा कोणतेही कार्य करत नाहीत. ज्या व्यक्तीने दशेंद्रये आणि मन बुद्धी अहंकार यावर विजय प्राप्त करून समस्त भोगांचा परित्याग केला आहे असा आशाविरहित ( आसक्ती विरहित ) मनुष्य शरीरसंबंधी विविध कर्म करत असतांनाही कोठेही कर्म करत नाही आणि त्याला अश्या प्रकारच्या कुठल्याही कर्माचे पाप लागत नाही.
जी व्यक्ती विना इच्छा आपल्या कर्मानुसार प्राप्त फळात संतुष्ट राहते, ज्याच्या मनात कोणतीही ईर्षा नसते ( ईर्षा तुलनेतून जन्मते आणि तुलना इच्छेतून व संकल्पातून जन्म घेते), जो आनंद तथा दुःख अश्या द्वंद्वातून स्वतःला वेगळा ठेवतो आणि यश अपयशात सम भाव ठेवून कार्य करतो असा कर्मयोगी कर्म करत असूनही कर्मात कधीही बांधला जात नाही. ज्याच्या सर्व इच्छा नष्ट झाल्या आहेत जो देहभान, देह अभिमान, ममता यापासून अलिप्त झाला आहे अश्या केवल यज्ञ करणाऱ्या मनुष्याचे सगळे कर्म आणतात विलीन होतात आणि अशी व्यक्ती कधीही कर्मबंधनात अडकून राहत नाही.
।। जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 18)- भगवंत अवतार का घेतात, कधी घेतात व त्यातून आपल्याला काय शिकायला मिळते?
भाग 20)- फलासहित विविध यज्ञविधींचे वर्णन

सहजसुंदर वाचनीय लिखान
उत्तर द्याहटवाNice expanded
उत्तर द्याहटवा