21) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- ज्ञानाचे महत्व आणि अर्जुनाला कर्म करण्याची प्रेरणा
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
21) ज्ञानाचे महत्व आणि अर्जुनाला कर्म करण्याची प्रेरणा
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ॥३४॥
यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भुतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥३५॥
सर्व कर्मयज्ञाचे पर्यवसान हे ज्ञानातच होते हे सांगून भगवंत लगेच अर्जुनाला ( वाचकाला ) सूचना करतात कि असे करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे मनुष्याने आत्मसाक्षात्कारी गुरुकडे जाऊंन समर्पित भावाने त्यांची सेवा करून त्यांच्याकडून हे ज्ञान मिळविले पाहिजे आणि ज्यांनी हे आधीच जाणले आहे तेच, हे ज्ञान तुला देऊ शकतात. या भागात ज्ञान मिळविण्यासाठी गुरुची निवड कशी करावी याबाबत मार्गदर्शन मिळते जे कि जीवनातील सर्वच भागात / बाबींमध्ये लागू करता येते. आत्मसाक्षात्कार व्यक्तीकडून ज्ञान मिळाल्यावर व्यक्ती पुन्हा मोहात पडत नाही किंवा भ्रमीतही होत नाही. आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर मनुष्य सर्व प्राणिमात्र आणि त्यांची चेतना हे परमेश्वराचेच अंश आहे हे सत्य ( परम सत्य ) जाणतो. आणि जो हे परम सत्य ( सांख्ययोग) अनुभवासहित जाणतो तो त्यक्ति पुन्हा कधीच भौतिक गोष्टीमध्ये आसक्त होत नाही.
अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि ॥३६॥
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥३७॥
अतिशय गहणतेने समजून घेण्यायोग्य असा हा संवाद आहे. इथे प्रभू सांगतात कि तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जरी समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरुपी नौकेत आरूढ होशील तेव्हा तू आपोआपच दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. ज्याप्रमाणे अग्नी सरपण जाळून भस्म करते त्याचप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी तुझी सर्व कर्मबंधनातून मुक्त होशील. या संवादात एक प्रश्न उत्पन्न होतो कि आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीला "सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी" का म्हणले जाऊ शकते? याचे कारण हे आहे कि, आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्ती ह्या समाजातील इतर सामान्य ( अज्ञानी ) व्यक्ती प्रमाणे आचरण करत नाहीत आणि अनेकदा समाज त्यांचे वर्तन समजून घेण्यास असमर्थ ठरतो व अनेकदा आपल्या अज्ञानामुळे ज्ञानी व्यक्तींना समाजविरोधी ( पापी ) ठरवितो.
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥३८॥
श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्धवा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥३९॥
अज्ञश्चश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥४०॥
ज्ञानकर्मसन्यासयोग अध्यायात शेवटच्या संवादात भगवंत दिव्यज्ञान प्राप्तीचे महत्व पुन्हा सांगतात कि या जगात दिव्य ज्ञानासारखे पावित्र्य आणि उदात्त इतर काहीही नाही आणि हाच महामार्ग आहे मनशांती, मनस्वास्थ राखून प्रगती करण्याचा. हेच सर्व सिद्धीचे परिपक्व फळ आहे आणि जो भक्तियोग आचरणामध्ये म्हणजेच स्वतःला कर्ता न मानता व कर्मफलाविषयी आसक्ती न बाळगता भगवंत भक्ती मध्ये समर्पित होऊन लोककल्याणार्थ कार्य करतात तेच खरे कर्मयोगी आहेत आणि ते योग्यसमयी ज्ञानाचे आस्वादण करतो. जो श्रद्धावान व्यक्ती विश्वासपूर्वक व समर्पण भावाने ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी इंद्रिय संयमन करून प्रयत्नरत राहतो तोच हे दिव्य ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्या व्यक्तीला अध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. परंतु जे लोक या प्रमाणित शास्त्राबद्दल संशयभाव ठेवून श्रद्धाहीन आचरण करतात त्यांना हि प्रेमशांती कधीही प्राप्त होत नाही. उलट त्यांचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होत नाही. तात्पर्य : असा श्रद्धाविहीन व्यक्ती सर्व परिस्थितीत असमाधानीच असतो.
योगसन्नयस्तकर्माणं ज्ञानसञ्न्निसंशयम् ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥४१॥
तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥४२॥
आपल्या कर्मफलांचा त्याग करून जो भक्तियोगयुक्त कर्म करतो आणि दिव्यज्ञानामुळे ज्याचे संशय नष्ट झाले आहेत असाच मनुष्य वास्तविकपणे आत्मस्थित होऊन आपले नियत कर्म करू शकतो आणि हे धनंजय अशी व्यक्ती कधीही कर्मबंधनांनी बद्ध होत नाहीत. म्हणून हे भरतश्रेष्ठ, मनातील सर्व संशय रुपी शत्रू दिव्यज्ञानाच्या शास्त्रांनी छाटून टाक आणि योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर.
योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर.अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे. युद्ध कर म्हणजेच नियत नित्य कर्म कर. योध्यासाठी युद्ध, विद्यार्थ्यांसाठी ज्ञानग्रहण आणि या प्रमानेच प्रत्येकाने नियत नित्य कर्म करत राहावे.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥4॥
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 20)- फलासहित विविध यज्ञविधींचे वर्णन

नियत नित्य कर्म यांचे महत्व छान पटते यातून
उत्तर द्याहटवाजय श्री कृष्ण!
अप्रतिम ,👋आणि केवळ रोजच्या चक्रांन मध्ये आज प्रत्येक जण इतका व्यापला आहे की या सुंदर, सोप्या आणि खऱ्या जीवनाची शिदोरी, अमृत असलेल्या ज्ञानाला मुकत चाला आहे. थोडा वेळ काढून या सुंदर लेखाचा लाभ प्रतेकाने घ्यावा. जय श्री कृष्णा
उत्तर द्याहटवा