27) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- योगी कोण आहे?
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
27) योगी कोण आहे?
सङ्कल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः । मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥२४॥
शनैः शनैरुपरमेद्बुद्धया धृतिगृहीतया।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत् ॥२५॥
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥२६॥
किती सुंदर अवस्था आहे हि कि मनुष्य मोठमोठया दुख्खाने विचलित होत नाही किंवा भौतिक क्रियाकालापाच्या संगतीमुळे निर्माण होणाऱया दुःखापासून कायम मुक्त राहतो. पण यासाठी काय करावे ते भगवंताने आता स्पष्ट केले आहे. मनुष्याने दृढनिश्चय करून व समर्पित भावाने स्वतःला योग अभ्यासात रममाण केले पाहिजे व कुठल्याही परिस्थिती किंवा कारणाने योगमार्गातून विचलित होऊ नये. मनाचे काम आहे विचारांच्या कोलांट्या उड्या मारणे आणि विविध तर्क करत राहणे. म्हणूनच योगी माणसाने मनाद्वारे उत्पन्न विविध तर्क आणि त्यातून उत्पन्न झालेल्या भौतिक कामनांचा त्याग करून किंवा त्याप्रती अनासक्त राहून मनाद्वारे सर्व इंद्रियांना संयमित केले पाहिजे. हि अवस्था टप्याटप्याने प्राप्त होते. जसा जसा योगी प्रगती करू लागतो तसा तसा त्याचा विश्वास दृढ होत जातो आणि अश्या दृढ बुद्दिद्वारे योगी समाधिस्थ झाला पाहिजे आणि त्याने केवळ आत्म्यावरच लक्ष केंद्रित करून इतर सर्व विचारांचा त्याग केला पाहिजे. यासाठी योगी व्यक्तीने आपल्या चंचल आणि अस्थिर मनाला ते एखाद्या बालकाप्रमाणे विविध ठिकाणी भटकत असतांना त्याला पुन्हा पुन्हा खेचून आणावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे.
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥२७॥
युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥२८॥
ज्या योगीचे मन स्थिर झाले आहे, त्याला दिव्य सुखाची प्राप्ती नक्कीच होते. तो रजोगुणाच्या पलीकडे असलेल्या ब्रह्म तत्वाशी गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि त्याद्वारे तो सर्व कर्मफळातून मुक्त होतो. बऱ्याच अवधीनंतर रजोगुणाचा उल्लेख आला आहे. आपण इथे राजोगुण आणि ब्रह्मतत्वाची गुणात्मक एकता बघूया. रजोगुण म्हणजे स्वतःला कर्ता समजून महत्वाकांक्षेने कार्य करणे. जिथे महत्वाकांक्षा आली तिथे जय पराजय सुख दुःख आले आणि मग आपोआपच सगळेच भौतिक क्रियाकलाप सुरु होतात. जेव्हा मनुष्य निष्काम कर्म करतो तेव्हा तो सर्व स्थितीत समभावात राहतो. आणि त्याने केलेल्या कर्माचा त्याच्यावर कोणताही साकारात्कम किंवा नकारात्मक प्रभाव पडत नाही. म्हणजेच तो व्यक्ती सुख दुःख, जय पराजय याच्यापलीकडे जाऊन स्थिर बुद्धी होतो. आणि त्यामुळे निरंतर योगाअभ्यास करणारा व्यक्ती सर्व भौतिक गुणदोषातून मुक्त होऊन आणि ब्रम्हर्षी संलग्न होतो. असा व्यक्तीच सुखाची परमोच्च अवस्था प्राप्त करतो. म्हणजेच मनस्वास्थ, मनशांती युक्त प्रगती साध्य करतो.
सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥२९॥
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥३०॥
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥३१॥
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥३२॥
योगी व्यक्ती सर्व जीवांना समभावाने पाहतो आणि प्रत्यक्ष जीवांमध्ये परमेश्वर आणि परमेश्वराला प्रत्यक्ष जीवांमध्ये पाहतो, आणि जो अश्याप्रकारे पाहतो त्याच्यासाठी परमेश्वर अदृश्य नसुन सर्वत्र प्रत्यक्ष प्रकट स्वरूपात असतात. आणि इथे आपल्याला देव कोण, कुठे राहतो कसा दिसतो अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष परमेश्वराच्या वाणीतून समजून येते. आणि वरील प्रकारे परमेश्वरचे रूप जाणनारा आणि त्यरूपात परमेश्वराला मानणारा पुरुष सदैव परमेश्वराला भजत असतो. आणि इथे भगवंत सांगतात कि हे अर्जुन खरा योगी तोच जो आपल्या स्वानुभवांच्या तुलनेने समस्त प्राण्यांना आणि त्यांच्या सुख दुःखांना समान दृष्टीने पाहतो.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 26) ध्यान साधकासाठी आवश्यक माहिती आणि समाधी ची व्याख्या
28) मार्गभ्रष्ट झालेल्या व्यक्तीसाठी मार्गदर्शन

पुन्हा पुन्हा वाचत रहावस वाटत रहातं
उत्तर द्याहटवा