51) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय १३ क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग प्रारंभ
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
51) अध्याय १३ क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग
अर्जुन उवाच
प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च ।
एतद्वेदितुमिच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव ৷৷१३. १৷৷
श्रीभगवानुवाच;
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते । एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १३-२ ॥
क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।
क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥ १३-३ ॥
अध्य्याच्या सुरुवातीलाच अर्जुन म्हणाला हे भगवंत मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय विषयक माहिती जाणून घ्यायची आहे.
श्रीभगवान कृष्ण म्हणाले, हे कौंतेय , हे शरीर क्षेत्र जाणावे आणि शरीराला जाणणारा क्षेत्रज्ञ. हे भारता तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा मलाच जाण. आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांना तत्त्वतः जाणणे म्हणजेच ज्ञान आहे, असे माझे मत आहे.
तत्क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारि यतश्च यत् ।
स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु ॥ १३-४ ॥
ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ।
ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥ १३-५ ॥
आता तू माझ्याकडून क्षेत्र त्याचे स्वरूप, त्याची निर्मिती तसेच त्यामध्ये होणारे बदल याबाबत, तसेच क्षेत्राचा ज्ञाता म्हणजेच क्षेत्रज्ञ कोण आणि क्षेत्रज्ञाचा क्षेत्रावर होणारा परिणाम याबाबत आता ऐक.
हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्त्वज्ञान अनेक ऋषींनी वेगवेगळया वेदमंत्रांतूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे. तसेच याबाबत परिपूर्ण माहिती कारण आणि परिणामासह वेदान्तसूत्रामध्ये प्रस्तुत आहे.
महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च ।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ १३-६॥
इच्छा द्वेषः सुखं दुःखं सङ्घातश्चेतना धृतिः ।
एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥ १३-७॥
आता भगवंत क्षेत्राची परिपूर्ण व्याख्या करतात. परिपूर्ण केवळ आपल्यासाठी कारण क्षेत्राचे २४ मुद्दे संगितल्यावर भगवंत त्याला संक्षेपाने क्षेत्र असे म्हणतात. तर मग जाणून घेऊया क्षेत्र काय आहे ते.
भगवंत म्हणाले, पाच महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच दहा इंद्रिये, एक मन आणि पाच इंद्रियांचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धृती या सर्व इंद्रियांना त्यांच्या विकारांसहित थोडक्यात क्षेत्र असे सांगितले गेले आहे.
या अध्यायात (अध्याय १३. श्लोक ६ व ७ मध्ये) २४ विकारांनी युक्त शरीर म्हणजेच क्षेत्र आहे मग आता आपण समजू शकतो कि श्रीमदभगवद्गीता या महान ग्रंथाची सुरुवात ज्या दोन शब्दांनी झाली त्या शब्दांकडे लक्ष देऊया आणि "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" म्हणजेच ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार आणि त्यांचे विकार याचीच हि लढाई आहे आणि पुढील श्लोक (अध्याय १३. श्लोक ८ ते १२) मध्ये खरे ज्ञान काय आहे ज्याच्या उपयोगाने आपण जीवनात मनस्वास्थ, मनशांती आणि प्रगती करता येईल.
अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् ।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ १३-८ ॥
इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च ।
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ १३-९ ॥
असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु ।
नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥ १३-१० ॥
मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी ।
विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १३-११ ॥
अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।
एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा ॥ १३-१२ ॥
नम्रता, ढोंग न करणे, अहिंसा ( कोणत्याही सजीवाला त्रास न देणे) , क्षमा, सहनशीलता, साधेपणा, श्रद्धा व भक्तीसह अध्यात्मिक गुरूंची सेवा, पवित्रता, स्थैर्य आणि संयम व इंद्रियांविषयांपासून विरक्ती, निरहंकार, जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख व दोषांप्रति अनासक्ती, पुत्र, स्त्री, घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे व ममता नसणे तसेच आवड-नावड या बाबत समभाव, सदैव चित्त समतोल ठेवणे. एकांतात राहण्याची आवड, मज परमेश्वराची अनन्य भावाने भक्ती, विषय सुखात गुंतलेल्या व्यक्तींचा सहवास टाळणे, आत्मसाक्षात्काराचे महत्व जाणून त्यासाठी नित्य आध्यात्मज्ञानाची उपासना हे सर्व ज्ञान मी घोषित करतो आणि याव्यतिरिक्त जे काही आहे ते अज्ञान आहे.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 50) कोणता भक्त भगवंताला प्रिय आहे

खूप छान निशा
उत्तर द्याहटवा