57) माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात- अध्याय १५ पुरुषोत्तम योग प्रारंभ- संसाररूपी शाश्वत वृक्ष
माझी भगवद्गीता आजच्या संदर्भात-
राजेश्वरी
57) अध्याय १५ पुरुषोत्तम योग
भूमिका
१४ व्या अध्यायात भगवंतांनी सुरवातीलाच ( श्लोक ३ ते ५) स्पष्ट केले कि जगाची उत्पत्ती हि माझ्याद्वारे भौतिक प्रकृतीच्या २४ गुणांच्या संगमातून झाली आहे आणि संयोगातून प्रकट होणाऱ्या सर्व जीवांचा बीज प्रदान करणारा परमपिता मीच आहे. भगवंत पुढे सांगतात कि केवळ त्रिगुणच प्रकृतीच्या संयोगातून कर्म करत असतात आणि आत्मा वास्तवात काहीच करत नाही. ( अ. १४. श्लोक १९ ). म्हणजेच कोणताही जीव स्वतः कोणतेही कर्म करत नाही. म्हणजेच मी कर्ता आहे हा भावचं मिथ्या आहे. आणि मी कर्ता नाही तर मग मी कोण आणि जगत कोण हे मुळ प्रश्न वाचकरूपी पार्थाच्या मनात उपस्थित होणे स्वाभाविकच आहे आणि याच प्रश्नाच्या उत्तरांसाठी अध्याय १५ मध्ये भगवंत मार्गदर्शन करतात.
"संसाररूपी शाश्वत वृक्ष"
श्रीभगवानुवाच;
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥ १५.१ ॥
अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः ।
अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके ॥ १५.२ ॥
श्रीभगवान कृष्ण म्हणाले, आदिपुरुष परमेश्वररूपी मूळ असलेला, ब्रह्मरुपी खोड असलेला हा संसाररूपी शाश्वत वृक्ष आहे. या संसाररूपी अश्वत्थवृक्षाचे मुळ वर आहे ( परमेश्वर ) आणि त्याच्या शाखा (भौतिक प्रकृती) खाली आहेत, वेदांचे मंत्र ही या वृक्षाची पाने आहेत. जो या संसाररूप वृक्षाला तत्त्वतः जाणतो, तो वेदांना जाणणारा आहे. म्हणजेच, जो हे जाणतो कि जगाचा मूलाधार परमेश्वर वर आहे आणि भौतिक प्रकृती खाली आहे तोच वेदांना जाणणारा म्हणजेच ज्ञानी आहे.
या संसाररुपी वृक्षाच्या फांद्या त्रिगुणांनी पोषित आहेत आणि सतो, रजो आणि तमो या त्यांच्या विविध प्रकृतीमुळे या फांद्या खाली, मध्ये तसेच वर देखील पसरलेल्या आहेत.
या वृक्षाच्या डहाळ्या ह्या इंद्रिय विषय आहेत आणि या वृक्षाची काही मुळे खालीही पसरलेली आहेत ती मुळे मानवाला या भौतिक प्रकृतीशी - विविध सकाम कर्माद्वारे बांधतात.
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा ।
अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ॥ १५.३ ॥
ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः ।
तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥ १५.४ ॥
या संसाररूपी अश्वत्थवृक्षाविषयी सांगतांना भगवंत सुरुवातीलाच स्पष्ट करतात कि या संसारवृक्षाचे जसे सांगितले आहे तसे स्वरूप जाणणे किंवा अनुभवने या जगात शक्य होत नाही. कारण याचा आदी, अंत आणि आधार समजणे जीवांच्या क्षमतेपलीकडील गोष्ट आहे.
वाह... किती सत्य आहे न आजच्या युगातील आधुनिक मनुष्य स्वतःला कितीही प्रगत समजत असला तरी त्याला अजून सूर्यमाला देखील कळली नाही. जगाच्या उत्पत्तीच्या शोधात विविध प्रयोग करू पाहणारा मानव आजच्या काळात प्रगत आहे कि अप्रगत याचा विचार होणे गरजेचे आहे. या विश्वात अस्तित्वात असलेली सध्याची मानवप्रजाती त्यांच्या पूर्वजांशी शारीरिक क्षमता, मानसिक स्थैर्य आणि
स्वास्थपूर्ण जीवन या मूळ मुद्यांवर तुलना केली तर मानवाची प्रगती झाली आहे का अधोगती या प्रश्नाचे उत्तर वाचकरूपी अर्जुनाने स्वताकडूनच प्राप्त करावे असे मला वाटते.
मानवाने हा वर मूळ आणि खाली फांद्या असलेला अश्वत्थवृक्ष जर कधी पाहिला असेल तर तो नक्कीच एखाद्या जलाशयाच्या पाण्यामध्ये पहिला असेल. जर तुम्हाला असा पाण्यातील वृक्ष आठवला असेल तर हे हि नक्कीच कि असा वृक्ष सत्य नसून एक भ्रम असतो आणि याबाबतच पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, भ्रमरूपी, मोहमय आणि बंधने निर्माण करणाऱ्या या वृक्षाची खोलवर गेलेली मुळे मनुष्याने अनासक्त भावाने छाटून टाकली पाहिजेत. असे केल्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे जिथून मनुष्याला परत यावे लागणार नाही. म्हणजेच नवे बंधन निर्माण होणार नाहीत. ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसारवृक्षाची उत्पत्ती आणि विस्तार झाला आहे त्याच मूळ तत्वाला म्हणजेच त्या आदिपुरुष नारायणाला, पुरुषोत्तमाला शरण गेले पाहिजे.
निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः ।
द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसञ्ज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥ १५.५ ॥
न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः । यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ १५.६ ॥
नवीन मोह निर्मिती त्यागून, भौतिक प्रकृतीचा संगझाल्याने निर्माण झालेले दोष त्याग आणि विरक्तीने मागे टाकून जे विविध भौतिक वासना आणि इच्छा पसरून मुक्त झाले आहेत तसेच सुखदुःखाच्या द्वंद्वातून मुक्त झाले आहेत आणि भौतिक जगातील सर्व मोह सोडून परमपुरुषाला शरण गेले आहेत, त्यांनाच शाश्वत धामाची प्राप्ती होते. म्हणजेच मनस्वास्थ, मनःशांती सह प्रगती साधता येते. आणि अश्या या स्वयंसिद्ध परमधामाला न तर सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी आणि वीजही नाही. जे या परम धामाला पोहचतात ते या सुखदुःखाच्या फेर्यात पुन्हा परतून येत नाहीत.
।।जय श्री कृष्णा।।
धन्यवाद🙏🏻😇
निशा सुजाता राजेश्वर चान्ने
भाग 56) जसे गुण तशी गती आणि आधुनिक मनुष्यासाठी गुण म्हणजेच सवयी ह्यावर भगवंताचे मार्गदर्शन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा